विशेष लेख : नीट परीक्षेतील अनियमितता
आधुनिक केसरी
डॉ.शरद दुधाट, श्रीरामपूर, भ्रमणध्वनी -९८३४१३२१३८
नीट, सीईटी, जेईई वा इतर तत्सम परीक्षा म्हटले की विद्यार्थ्यांच्या बौद्धिकतेची कसोटी. विद्यार्थी जिवाचे रान करून या परीक्षांना सामोरे जातात. ते त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि आयुष्याच्या यशस्वीतेसाठी. या सर्व परीक्षा त्यांच्या जीवनातील यशाची पहिली पायरी असतात. पुढेही एक-एक पायरी चढताना त्यांचा जीवनप्रवास हवा तेवढा सुखकर नसतो. रस्त्यांवरील स्पीडब्रेकर प्रमाणे असंख्य अडथळ्यांना तोंड देत सोशिकतेने आणि सहनशीलतेने त्यांना यशाचे शिखर गाठायचे असते. देशसेवा, रुग्णसेवा हा त्यांच्या जीवनाचा ध्यास असतो. हा या ध्येयाच्या ध्यासातला इयत्ता बारावीनंतरचा त्यांचा जीवनप्रवास हा तसा दिव्यच.
देशभरात नीट ही वैद्यकीय प्रवेश पूर्वपरीक्षा तेरा प्रादेशिक भाषांमधून घेतली जाते. त्यात हिंदी, इंग्रजी, मराठी, उर्दू, तमिळ, तेलगू, मल्याळम, ओरिया, कन्नड, गुजराती, आसामी, बंगाली या प्रादेशिक भाषांचा समावेश आहे. ही भारतातील सर्वात मोठी पदवीपूर्व वैद्यकीय प्रवेश परीक्षा पेपर वर्क म्हणजे ऑफलाईन पद्धतीने घेतली जाते. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी विद्यार्थ्याला चार गुण दिले जातात आणि प्रत्येकी चुकीच्या उत्तरासाठी एक गुण वजा केला जातो. म्हणजेच उत्तर बरोबर आले तर चार गुण मिळतात आणि उत्तर चुकले तर पाच गुण कमी होतात. ही या परीक्षेची गुण योजना आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांमध्ये या विद्यार्थ्यांना किमान ५० टक्के गुण आवश्यक असतात. या विद्यार्थ्यांची वयोमर्यादा १७ ते २५ या वयोगटातील असते. या परीक्षेसाठी विद्यार्थी रात्रीचा दिवस करून खूपच परिश्रमाने या परीक्षेला सामोरे जातात. ही परीक्षा त्यांच्यासाठी उज्ज्वल भविष्याचा किरण असते की ज्यातून त्यांच्या भविष्याला आकार मिळणार असतो. या परीक्षेची तयारी म्हणजे विद्यार्थी आणि पालकांची प्रचंड तारेवरची कसरत असते. मुळातच विद्यार्थी बारावीला गेला की विद्यार्थी, पालक आणि कुटुंबात खूपच ताणतणावाचे वातावरण असते. बऱ्याच वेळा विद्यार्थी आणि पालकांना आपण कोणत्या दिशेने जावे हे माहिती नसते. बारावीनंतर पुढे काय करायचे ? हेच निश्चित नसते. बहुतांशी विद्यार्थी दिशाहीन असतात. निकाल लागल्यानंतर पाहू. असे त्यांचे बिनबुडाचे उत्तर. विद्यार्थी व पालक मोठ्या संभ्रमात असतात. योग्य वेळी योग्य ते मार्गदर्शन लाभलेले विद्यार्थीच आपली दिशा निश्चित करतात. इयत्ता बारावी नंतरच्या नीट, सीईटी जेईई आदी स्पर्धा परीक्षांना सामोरे जाताना त्यांना शारीरिक, मानसिक तणावाबरोबर आर्थिकतेचा सामना करावा लागतो. अभ्यास कोणता आणि कसा करावा याबाबत अनभिज्ञता असते. कोणता क्लास? कोठे जायचे? तेथील पूर्वनिकाल काय? क्लास, वसतिगृह आणि मेसची भरमसाठ फी हे सगळे अवाक् करणारे. एवढा वेळ, पैसा, श्रम खर्च करून पदरात काय पडेल? त्याचीही अनिश्चितता. योग्य रँक मिळाली नाही की निराशा. पुन्हा परीक्षा, तोच अभ्यास. यातून विद्यार्थ्यांची खूपच हेळसांड होते. खूप कमी वयात या मुलांची मने कोमेजून जाणार.या विद्यार्थ्यांच्या अंगी खूपच सोशिकता आणि सहनशीलता हवी असते; परंतु याच परीक्षा त्यांच्या भविष्यातील स्माईल स्टोन ठरतात. काही लोक स्वतःच्या फायद्यासाठी मात्र या खडतर तपश्चर्या आणि परिश्रम घेणाऱ्या उज्ज्वल विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळत असतात. स्वतःच्या स्वार्थापोटी इतर प्रामाणिक कष्टाळू, अभ्यासू विद्यार्थ्यांचा विचार न करता गुण वाढविण्यासाठी, रँक मिळविण्यासाठी गैरमार्गाने गुण मिळविण्याचा प्रयत्न करतात.
देशात विविध शासकीय नोकऱ्यांकरीता आणि विविध व्यावसायिक सामूहिक परीक्षांतील घोटाळे आणि मूल्यमापनातील दोष ही काही नवीन नाही. गेल्या दहा वर्षात शासकीय यंत्रणांनी यासंबंधी ठोस उपाययोजना केली असली तरी त्यांचा कायमचा बंदोबस्त करणे मात्र अवघड आहे. हे घोटाळे भारतासमोरील आव्हाने अधोरेखित करतात. या प्रक्रियेमध्ये शिक्षण आणि भरती प्रणालीची निष्पक्षता आणि पारदर्शकता सूचित करणे आवश्यक आहे. लोकसभेने भरती परीक्षांमधील गळती आणि गैरप्रकारांना आळा घालण्याच्या उद्देशाने पब्लिक एक्झामिनेशन्स (अनफेअर मीन्स प्रतिबंध) विधेयक २०२४ मंजूर केले आहे. या विधेयकामध्ये केंद्रीय लोकसेवा आयोग, कर्मचारी निवड आयोग, रेल्वे, बँकिंग भरती परीक्षा आणि राष्ट्रीय चाचणी एजन्सीद्वारे आयोजित केलेल्या संगणकीकृत परीक्षांचा समावेश आहे. सप्टेंबर २०२१ मधील तामिळनाडू राज्यातील नीट घोटाळा प्रकरण फार जुने नाही. या प्रकरणातून अनेक विद्यार्थ्यांना नाराजी आणि नैराश्याला सामोरे जावे लागले होते. काही विद्यार्थ्यांनी या नैराश्यातून आत्महत्या केल्या. याचे पडसाद तेथील विधानसभेत उमटल्यामुळे राज्यात नीट परीक्षा नको, अशी भूमिका असणारे विधेयक तेथील विधानसभेत संमत करण्यात आले. २०२२ मधील वैद्यकीय परीक्षा घोटाळा, २०१३ मधील मध्य प्रदेशातील व्यापम घोटाळा, तेलंगणातील परीक्षा घोटाळा अशा असंख्य घोटाळा प्रकरणात यावर्षीच्या नीट परीक्षेची अनियमिततेची अधिक भर पडली आहे. दि. ५ मे २०२४ रोजी देशभरातून झालेली वैद्यकीय पदवीपूर्व अभ्यासक्रम प्रवेश परीक्षा एनईईटी-युजीच्या ४ जून २०२४ च्या निकालावरून वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. देशभरातील ५५७ शहरांमध्ये आणि परदेशातील १४ शहरांमध्ये एनईईटी-युजीच्या माध्यमातून ५ मे रोजी ही सामूहिक पूर्वपरीक्षा घेण्यात आली. देशातून आणि परदेशातून या परीक्षेसाठी २४ लाख विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी करून जातीनिहाय प्रवेश फी परीक्षा यंत्रणेकडे भरली आहे. या परीक्षेत सरकारी चांगली महाविद्यालय मिळण्यासाठी प्रचंड चढाओढ असते. श्रीमंत लोक मुलांना डॉक्टर करण्यासाठी लाखो रुपयांची देवाणघेवाण करतात. अन्य मार्गाने चांगली रँक, चांगले सरकारी कॉलेज मिळविण्यासाठी प्रचंड धडपड करतात. मग सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे काय? त्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहणार का? शिक्षक म्हणून नोकरीला लावण्यासाठीचा संस्थाचालकांचा भ्रष्टाचार सर्वश्रुत आहे; परंतु वैद्यकीय परीक्षेत रँक व चांगले कॉलेज मिळावे यासाठीचा घोडेबाजार असाच सुरू राहणार का? हा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे. दिल्लीच्या एम्समध्ये टॉप वन रँक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ४६ जागा राखीव असतात. यावेळी टॉप वन रँकचे ६७ विद्यार्थी आहेत. मग यात कोणाची बाजी लागणार. ७१५ पेक्षा अधिक गुण मिळवणारे असंख्य विद्यार्थी आहेत. मग एवढे गुण मिळूनही प्रवेश कोठे मिळणार? हा अंधारच आहे. प्रविष्ट झालेल्या एकूण विद्यार्थ्यांच्यामध्ये दहा लाख मुले तर चौदा लाखांच्या घरात मुलींची संख्या होती. देशभरात ७०६ वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसच्या १,०९,१४५ जागा आहेत. तर डेंटलच्या २७ हजार जागा आहेत. या जागांमध्ये नव्याने सुरू होणाऱ्या महाराष्ट्र आदी राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील जागा असणार आहेत. एमबीबीएस, बीडीएस, आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी आणि पशुवैद्यकीय या सर्व अभ्यासक्रमांचे प्रवेश केंद्र नीट ही वैद्यकीय पदवीपूर्व अभ्यासक्रम परीक्षा आहे. या परीक्षेचा निकाल ४ जून रोजी जाहीर झाला होता. त्यात ६७ विद्यार्थ्यांना ऑल इंडिया रँक वन म्हणजे ७२० पैकी ७२० गुण मिळाले आहे. तर १५६३ विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण (ग्रेसमार्क) मिळाले आहेत. त्यापैकी ७९० विद्यार्थी सवलतीच्या गुणांनी पात्र ठरले आहेत. उर्वरित विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये उणेपणा राहिल्यामुळे ते विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. हे गुण देताना त्यात अनियमितता आली आहे, असा आरोप देशभरातील विद्यार्थ्यांकडून केला जात आहे. बिहारमधील पेपरफुटी प्रकरण, ठराविक विद्यार्थ्यांना दिलेले अतिरिक्त गुण आणि एकाच केंद्रावरील अनेक विद्यार्थ्यांना मिळालेले पैकीच्या पैकी गुण, अंतिम उत्तर सूची जाहीर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तातडीने निकाल जाहीर करणे अशा विविध कारणांमुळे ही परीक्षा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. नीट युजीच्या विश्वासहार्यतेविषयी शंका उपस्थित झाल्याने देशभरातून ही परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी विद्यार्थ्यांमधून होऊ लागली आहे.
एमबीबीएस, बीडीएस, पशुवैद्यकीय आदींच्या प्रवेश परीक्षेसाठी एकेका गुणांची विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा असते. कमालीची चढाओढ असते. लाखो विद्यार्थी वैद्यकीय व्यवसायात प्रवेश करण्याच्या हेतूने अहोरात्र परिश्रम घेऊन ही परीक्षा देतात. या विद्यार्थ्यांमध्ये नियमित आणि रिपीटर विद्यार्थ्यांचाही समावेश असतो. अनेक दिवसांची मेहनत, खर्च आणि अथक परिश्रमातून या परीक्षेसाठी विद्यार्थी सामोरे जातात. प्रचंड शारीरिक, मानसिक आणि आर्थिक बाबीतून हे विद्यार्थी आपली दिशा निश्चित करत असतात. अशातच या परीक्षेसंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले की विद्यार्थ्यांचे परिश्रम, खर्च वाया जाणार आणि मनोबलही खचले जाणार. ही परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी होत असली तरी एनईईटी युजीला ही बाब इतकी सोपी नाही. एनईईटी युजीने स्थापन केलेल्या प्राथमिक समितीच्या अहवालानुसार परीक्षेतील अनियमिततेची बाब केवळ सहा केंद्र आणि १५६३ विद्यार्थी यांच्या पुरती मर्यादित आहे; परंतु यावर आता पुन्हा एक नवीन उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष आणि अन्य तज्ज्ञांचा समावेश आहे. ही समिती आधीच्या समितीच्या निर्णयानुसार अहवालाचे अध्ययन आणि सत्यता पडताळून सरकारला एक आठवड्यात आपला अहवाल सादर करणार आहे. सरकार यावर निश्चित काय तो ठोस निर्णय घेणार आहे. ज्या केंद्रांमध्ये विद्यार्थ्यांचा वेळ वाया जाण्याच्या निकषावर भरपाईसाठी गुण दिले आहेत, ही सहा केंद्रे आणि १५६३ विद्यार्थ्यांची ही अनियमिततेची बाब आहे. त्यामुळे उच्चस्तरीय समितीचा निर्णय हा याच वलयाशी निगडित असणार आहे. ही परीक्षा परत घेतली जाणार नसल्याचा एनईईटी युजीचा निर्णय जवळजवळ निश्चित आहे; परंतु अन्य केंद्र आणि विद्यार्थी यांच्या निकालावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे दिसते. फेरपरीक्षेची गरज भासली तर केवळ सहा केंद्रांवर ती घेतली जाईल, असे स्पष्ट संकेत शिक्षण सचिव के. संजय मूर्ती यांनी दिली आहेत.
भावी आयुष्यात पांढरा कोट नि गळ्यात स्टेथोस्कोप अडकून रुग्णसेवा करण्याची स्वप्न बघणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हातात आज मात्र या अनियमिततेमळे निषेधाचे फलक आणि तोंडात जोरदार घोषणा, मनात चीड, आक्रोश आणि अन्यायाची भावना आहे. तसे पाहता या परीक्षेचा स्तर उच्च काठिण्य पातळीवर असतो; परंतु यावर्षीचे निकाल आणि विद्यार्थ्यांची रँक पाहता उच्चांकी गुण अवाक करतात. या परीक्षेतील अनियमिततेमुळे निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे अखेर विद्यार्थ्यांना केव्हा मिळणार? आणि ते उत्तर काय असणार? यातून त्यांचे समाधान होणार का? याची आता प्रतीक्षा करावी लागणार आहे. परीक्षा प्रक्रियेतील घोटाळे आणि ही अनियमितता कधी संपणार? हाच प्रश्न सर्वसामान्य विद्यार्थी आणि पालकांच्या समोर आहे. हे हवालदील झालेली विद्यार्थी आणि पालक कधी स्थिरावणार? काय डॉक्टर होण्याची स्वप्न यावर्षी धुळीस मिळणार? हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.
Comment List