भैय्यासाहेब कोठुळे आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते स्विकारला पुरस्कार
आधुनिक केसरी न्यूज
अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामविकास अधिकारी भैय्यासाहेब दिलीपराव कोठुळे यांना सन 2019-2020 या वर्षाचा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्रदान करण्यात आला. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते कोठुळे यांनी पुरस्कार स्विकारला.
शहरातील भिस्तबाग येथे पार पडलेल्या पर्यटन सांस्कृतिक कार्य विभाग तसेच जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महासंस्कृती महोत्सव कार्यक्रमात जिल्हा परिषदेचा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजी कर्डिले, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजीराव लांगोरे, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गुंजाळ आदी उपस्थित होते.
ग्रामविकास अधिकारी भैय्यासाहेब कोठुळे यांनी ग्रामपंचायत सालवडगाव व बेलगाव, ता. शेवगाव, जि. अहमदनगर या ग्रामीण भागातील शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी यशस्वीपणे केली. तर ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेचे रहाणीमान व अडचणी सोडविण्यात सर्वतोपरी सहाय्य केले. या उत्कृष्ट कार्यामुळे त्यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पालकमंत्री विखे पाटील यांनी पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायती तसेच ग्रामसेवकांचे अभिनंदन केले.
भैयासाहेब कोठुळे हे सध्या नेवासा तालुक्यातील गेवराई ग्रामपंचायत येथे कार्यरत आहेत. सदरील पुरस्कार मिळाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Comment List