रिमझिम पाऊस...!

रिमझिम पाऊस...!

 

IMG-20220703-WA0009

आधुनिक केसरी

© कस्तुरी देवरुखकर , मुंबई , संपर्क - ८२९११४९९९२.

 

नभिस्त मेघांनी चढवला, 

शृंगाराचा अनोखा थाट..

मीलनाच्या सांजेत रंगली,

पावसाची पाऊलवाट..

मी असे नेहमीच म्हणते, "पावसाचे आणि माझे एक नाते आहे" कारण,आमचे एकमेकांकडे चिंब क्षणांचे खाते आहे. पाऊस माझा सखा, सोबती, प्रियकर आहे.  तो जेव्हा धुंवाधार कोसळत असतो तेव्हा माझ्या काळजाचे ठोके चुकायला लागतात. जीव कासावीस होतो. रिमझिम सरीत मात्र मन मोगरा फुलतो.

ग्रीष्मातल्या रखरखीत ऊन्हाने होरपळून निघालेल्या अवस्थेत अंगाची लाहीलाही झालेली असते. सुर्याच्या उष्णतेचा पारा भलताच चढलेला असतो. एव्हाना शाळकरी मुलांची उन्हाळी सुट्टी संपत आलेली असते. मिरच्या, सांडगे, पापड, मिरगुंड, कुरडया, फेण्या..इत्यादी वाळवणे घालून झालेली असतात. बैठ्या घरांच्या छतावर उन्हाळ्यात साठलेला पालापाचोळा साफ करून नवे कोरी ताडपत्री चढवली जाते. जेणेकरून पावसाची झड घरात येऊ नये. लहानथोरांपासून सर्वच "येरे येरे पावसा" म्हणून पावसाला आर्जवत असतात. अचानक भर दुपारी आकाशात ढग गर्दी करतात. जणूकाही पर्जन्य प्रस्तावावर मंजुरी मिळवण्याकरता अवकाशात ढगांची सभाच भरते. तुफानी वारा वरूणराजाच्या आगमनाची दवंडी देत खिडकीच्या काचांवर आदळतो. झाडांच्या फांद्यांवर  गिरक्या घेतो. मग, मोठ्या दिमाखात पावसाच्या सरी धरतीवर खेळू लागतात. 

माझ्या कवी मनाला पाऊस तीन अवस्थेत भेटतो. बाल्य, कौमार्य, वार्धक्य.. तो येताना बाल्यावस्थेत असतो. आपले पाऊल अलगद धरतीवर उतरवतो. ओल्या मातीच्या कुशीत शिरून मनमुराद हसतो. सृजनाच्या नवलाईचा मृदगंध सृष्टीच्या रोमारोमात भरतो. म्हणून तर या काळ्या मातीला पान्हा फुटून बीज अंकुरते. बळीराजाच्या स्वप्नांना आशेची पालवी फुटते. हा सुरूवातीचा पाऊस लहान मुलांमध्ये जास्त रमतो. शाळेचा पहिला दिवस त्यात सोबतीला पावसाची रिप रिप. शाळेचा नवा गणवेश घातलेली सानुली लेकरं त्यांच्या पाठीवर दप्तरांचे ओझे घेऊन तसेच रंगीत चकाकणारे,आकर्षक नक्षीचे रेनकोट परिधान करून रस्त्याने चालताना हा लबाड पाऊस त्या मुलांच्या हातात हात घालून शाळेत शिकायला चाललाय असा भास होतो. ओलसर गणवेश सावरत शाळेच्या वर्गात बिचकत ठेवलेले पहिले पाऊल, नव्या कोऱ्या वह्या पुस्तकांचा विशिष्ट गंध, मधल्या सुट्टीत खाऊच्या डब्यातील चटपटीत पदार्थांचा सुवास, आईची येणारी आठवण, वर्गातील सवंगड्यांचा कल्ला.. या वातावरणात पाऊस मात्र वर्गाबाहेर मनमुराद कोसळत असतो. शाळा सुटल्यावर कागदी होड्यांच्या शर्यतीत रममाण होणारा, शाळेभोवती तळे साचवून सुट्टी देणारा, चिमुकल्यांचा मनात घर करून रहाणारा तो बाल्यावस्थेतला, अल्लड पाऊस...!

झिम्माड धारांचा पाऊस येता,

हर्ष सागरा भरती येते..

एक चिमुकली बेभान होऊन,

थेंब सरींचे तळहाती घेते..

मला आठवतय, आम्ही ज्या दिवशी शाळेत जाताना छत्री विसरायचो नेमका त्याच दिवशी हा पठ्ठा धो धो कोसळायचा. कदाचित त्याला आवडत असावं लहान मुलांना चिंब भिजवायला. पुढे महाविद्यालयीन शिक्षण घेताना ह्याच पावसाने माझ्यातील कवयित्रीला प्रेमाने साद घातली. म्हणूनच माझी पहिली कविता पावसावर होती. तेव्हापासून ते आजतागायत माझा सखा वरूणराजा मला सोबत करतोय. 

जसा हा पाऊस तरूणाईला भुरळ पाडतो त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक बालमनाचा ताबा घेतो. बालदोस्तांना तर तो त्यांचा लाडका मित्र वाटतो. "येरे येरे पावसा.." म्हणत ही मंडळी त्याचे हसतमुखाने स्वागत करतात. रिमझिम सरीत मनसोक्त भिजतात. असणारच लाडका हा पाहुणा कारण, कवीवर्य पाडगावकरांनी म्हटल्या प्रमाणे पावसाचा जोर वाढला की "शाळे भोवती तळे साठून सुट्टी मिळते ना.."! 

तसेच स्वयंपाक घरातून आजीने बनवलेली गरमा गरम खमंग कांदाभजी अन् आले घालून केलेला मसाला चहा आजी आजोबांच्या प्रेमाची लज्जत वाढवतोे. बाबांनी आणलेली भाजलेल्या मक्याची टपोरी कणसं पाहून तर चिल्या पिल्यांच्या तोंडाला पाणी सुटते.

पुढचा टप्पा म्हणजे शृंगाररसात न्हाऊन टाकणारा प्रेमी युगुलांचा चाहता पाऊस..

महाविद्यालयीन किशोरवयीन जोडपे ते थेट साठ सत्तरीच्या आजी आजोबा पर्यंत प्रेमाचा ऋतू खुलवणारा हा किमरागारच. तो आणि ती नाजूक भावबंधांनी गुंतलेले असताना "पाऊस" त्यांच्या भेटीतल्या अलवार अन् लडिवाळ क्षणांना उलगडतो. पावसातील पहिली भेट, रिमझिम सरींचा एक एक थेंब जणू दोघांच्या ह्रदयात सामावत असतो.

मंद धुंद आल्ल्हाददायक गारवा, ढगाळी  कुंद हवा आणि सरीवर सर.अशा वेळी किशोरवयीन ते दोघे दुचाकीवर स्वार होऊन निसर्गाच्या देखण्या अविष्काराला कवेत घेताना ओलेत्या टपोऱ्या थंडगार थेंबांचे रूणझुणणारे संगीत कानात साठवून त्यांना चेहऱ्यावर झेलत यथेच्छ भटकंती करत असतात. खट्याळ वारा तिच्या काळ्याभोर,मुलायम केसांची बट मोठ्या नजाकतीने उडवत असताना दुचाकीच्या आरश्यातून तिला न्याहळणारा तो कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या कवितेतील ओळी आपसुकच गुणगुणतो..

"जेव्हा तुझ्या बटांना, उधळी मुजोर वारा..

माझा न राहतो मी, हरवून हा किनारा "

असे भावविभोर करणारे शृंगारिक वातावरण.

तो ती आणि पाऊस… म्हणजे, 

त्याच्या आणि तिच्या नात्यातला तरूण पाऊस स्वप्नवत, उत्कट, रोमांचकारी, आनंदाची उधळण करणाराच असतो. हुरहुर लावणारा, आपल्याच ऐटीत दंग असणारा अन् विचारांच्या समाधीत चोर पावलांनी हजेरी लावून ध्यानस्थाची तपश्चर्या भंग करणाऱ्या मेनकेसारखा मदमस्त पाऊस. ह्या टप्प्यातल्या पावसाला अनेक नाजूक कंगोरे आहेत. 

तिची आणि त्याची अशाच चित्तचोर पावसात अचानक भेट होते. एका छत्रीतून प्रवास सुरू होतो. एकत्र घेतलेली गरमा गरम काॅफी, आठवणींच्या सरितेत मनसोक्त बुडालेले दोघांच्या मनाचे तट. ओलावल्या मिठीत, हातांच्या साखळ्यात दडलेला गोड स्पर्श. सारेच बेभान करणारे.

कधी हा पाऊस चक्क विवाहोत्सुक तरूणाईला मध्यस्थ करणारा पाहुणाच वाटतो. सासर माहेर यांच्यातील दुवाच. पावसासोबतच वरपक्षाकडून आलेला होकाराचा सांगावा वधुपक्षाला आनंदसरीत भिजवून टाकतो. मग याच मेघराजाच्या साक्षीने भेटीगाठींचे सुरेख सत्र रंगत जाते. प्रेमाच्या जाणिवेत गुंतलेले तरूण युवक युवती जेव्हा आयुष्याच्या वाटेवर एकमेकांचे जीवनसाथी होण्यास पसंती दर्शवतात तेव्हा पाऊस एखाद्या घनिष्ट मित्रा प्रमाणे 

प्रेमी युगुलांकरीता उत्साहाचे कारंजे फुलवतो.  

तर काही ठिकाणी नुकतेच विवाह बंधनात बांधले गेलेले ते दोघे. पावसाचे मनमोहक स्वरूप अनुभवताना त्यांच्या रेशमी नात्याचा धागा अधिकच मजबूत होतो. वटपौर्णिमेच्या दिवशी नखशिखांत नटलेल्या विवाहितेचा शृंगार थाट पाहून पावसाचेही मन गुलाबी होत असावे. म्हणून तर तो जलपुष्पांचा वर्षाव करत तिच्या सौंदर्याला दिलखुलास दाद देत असतो. तिच्या पैजणांचा छुमछुम आवाज आणि पावसाचे कर्णमधुर संगीत यांच्यातील जुगलबंदी ऐकताना तिचा सखा अक्षरशः भारावून जातो.

आषाढ पागोळीचा पाऊस सासरी गेलेल्या लाडक्या लेकीचा माघारी बनून जातो. तर याउलट आषाढी एकादशीला विठू माऊलीच्या दर्शनास जमलेल्या वारकरी मेळ्यात तल्लीन होऊन भजन, कीर्तनाचा नाद होतो. भक्तिरसाचा आस्वाद घेताना विठ्ठल नामाच्या गजरात जलवीणा वाजवत संत परंपरेचा वंशज होतो. गौरीगणपती च्या सणाला वाजत गाजत अहोरात्र जलनृत्य करणारा नटराज पाऊस अगदी नवरात्री, हातगा गाजवेपर्यंत विश्रांती घेत नाही. 

नव्या जोडप्याच्या संसाराची घडी बसवायला आलेला हा पाहुणा कधी त्यांच्या कुटुंबाचा महत्त्वाचा सदस्य बनून जातो ते कळत नाही.वर्षानुवर्षे सुख दुःखाचे अनेक प्रसंग चिंब स्मृतीत साठवून ठेवतो. 

कित्येक पिढ्या आल्या गेल्या. आचार विचार बदलले तरी पावसा विषयी वाटणारी आंतरिक ओढ प्रत्येक रसिक मनात कायम टिकून आहे. आत्ताची पिढी आधुनिकतेच्या धुंदीत असली तरी खेडे असो वा शहर, मानवी संवेदनांना जागृत करणारा पाऊस आजही तोच आहे. त्याचे उदाहरण म्हणजे आजच्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारी ही कविता..

आठवड्याचा पहिला दिवस,

सकाळी उठल्यावर,माझा मूड मस्त होता..तो मात्र,

कामाच्या व्यापाने त्रस्त होता..

त्याचे नेटवर सर्फिंग चालू होते, 

माझे दुपारच्या मेनूसाठी सर्चिंग चालू होते..

अचानक गार वारा वाहू लागला,

पावसाच्या सरी,खिडकीच्या काचांवर थेंबाच्या रुपात बरसू लागल्या..

मग,माझ्या मनाने उचल घेतली, 

त्याला म्हटलं ,आज सुट्टी घे ऑफिसला

काय फरक पडतो नाही गेलास,

एक दिवस कामाला ?

त्यावर तो म्हणाला,नको ग बाई !

उत्तर काय  देणार डोक्यावर बसलेल्या बापाला ?

तो म्हणाला,ही फाईल आज ,    

मला करायची आहे कंप्लीट

मी म्हणाले,अरे पण नुकतीच एक फाईल

माझ्या ह्रदयाच्या फोल्डर मधून ट्रान्स्फर  होते आहे ,

ती तर काॅपी करशील ?

मग,विजांचे कडकडाट झाले, 

ढग गडगडले..

काय करावे त्याला काही सुचेना

उठलेल वादळ शांत करणं त्याला काही जमेना

त्याने सुट्टीचा प्रस्ताव मान्य करण्याचे ठरविले

तेव्हा कुठे विचारांचे नेटवर्क एका जागी स्थिरावले 

फॅमिली ड्रामा ,प्रेमकथेवर येऊन थांबला

यांत्रिक जीवनावर आज त्यांने प्रेमाचा विजय होताना पाहिला..

तो, ती आणि पाऊस... या तिघांची मैफील जमल्यावर क्षणांची भन्नाट मालिका सुरू होते. जीवनपटात भूमिका वटवताना अकस्मात सुटलेला त्याचा वा तिचा हात,दाटून आलेला हुंदका,तिच्या आठवणीने व्याकुळ झालेले मन, सुकलेल्या अश्रूंचे कोरडे वार हे सर्व झेलताना सह्रदयी पाऊस त्यावर ओल्यावाचे शिंपण करतो.

पाऊस कवितेतून व्यक्त होताना,

पावसाच्या स्पर्शाने शब्दांचा शृंगार झाल्यावर कोऱ्या कागदाच्या दर्पणात माझी काव्य प्रतिमा उमटते ती अशी...

रिमझिम ओल्या सरी

साजणाची भेट स्मरली उरी..

आलास तू स्वप्न चिंब होऊनी

कोसळला मुग्ध पाऊस दारी..

कवेत भिजला आठवं मणी

शांत झाल्या एकांताच्या म्हणी..

स्पर्श ओला जाणवतो ओठांवरी

चिंब झाले ह्रदयाच्या पानोपानी..

तुझ्या सहवासात सखया

शतजन्माचे सौख्य मिळे जीवनी..

 शेवटच्या टप्प्यातला परतीचा पाऊस हा वार्धक्य रूपी भासतो. सलग तीन महिने रात्रंदिवस गाजवल्या नंतर काहीसा मंदावलेला परंतु, धरतीचे अंत:करण ओलावण्यास नव्या जिद्दीने सरसावलेला असा तो. त्याची ही अवस्था पाहून आभाळ गहिवरते व कडाडणाऱ्या विजेच्या, गडगडणाऱ्या ढगांच्या उद्रेकात टाहो फोडत असते. "हस्त" नक्षत्रात पडणाऱ्या ह्या पावसाला "हत्तीचा पाऊस" असेही म्हणतात. आपण बाळाच्या जन्माचे आनंदाने स्वागत करतो. बाल्यावस्था सहज स्वीकारतो. तितक्या सहजतेने वार्धक्य स्वीकारत नाही. त्यामुळे या वयोगटातील वृद्ध मंडळी लहान मुले व तरूणांच्या मानाने दुर्लक्षित राहतात. तसेच काहीसे परतीच्या पावसाच्या वाटेला येते. पाऊस येताना ओसंडून वाहणारा उत्साहाचा झरा मात्र परतीच्या पावसाला निरोप देताना आटतो. हा विरोधाभासच म्हणायचा. कदाचित, त्या नादावणाऱ्या जलधारांना निरोप देण्याच्या मानसिकतेत आपण नसतो. तरीही, सृष्टीला नवजीवन देणाऱ्या , शेतकऱ्याला पीकपाण्याने समृद्ध करणाऱ्या, प्राणी-पक्षी-झाडे-वेलींना तृप्त करणाऱ्या ,प्रेमाचे अंकुर रूजवणाऱ्या परतीच्या पावसाची तितक्याच कृतज्ञतेने पाठवणी करायला हवी.जेणेकरून तो हा जिव्हाळ्याचा वर्षाव पाहून विरहाचा काळ संपल्यावर लवकरात लवकर पुन्हा भेटीला येईल.

पावसाळा म्हणजे भटकंती साठी सांगावाच. या दिवसात वर्षासहलीच्या निमित्ताने निसर्गाच्या सान्निध्यात  यथेच्छ भ्रमंती होते. ओसंडून वाहणारे शुभ्र धबधबे पाहिले की वाटते, मेघराजाच्या आगमनाचा उत्सव चहूदिशांना सुरू आहे. अशा धुंद वातावरणात कवी मनाने उचल न घ्यावी तर नवलच..! काव्य निर्मितीला पोषक असणारा हा वर्षा ऋतु. चाकरमान्यांसाठी काहीसा गैरसोयीचा परंतु, शेतकऱ्यासाठी तर हा वरूणराजा देवदूतच. 

या अमृतधारात भिजून चिंब होणारे महिने सुध्दा तितकेच आनंददायी आहेत. त्यातीलच महत्वाचा महिना म्हणजे "श्रावण". 

श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे,

क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे"

बालकवींच्या काव्यातून उमटलेल्या या श्रावणसरी आजही मनामनात रूंजी घालतात.श्रावण म्हणजे सृष्टीसौंदर्याचा आरस्पानी खजिनाच म्हणावा लागेल. या महिन्यात धरती निसर्गाच्या विविध कलाविष्कारात नटलेली असते. ऊनपावसाचा तर पाठशिवणीचा खेळ सुरु होतो या हरितधरेच्या पटांगणात. लहानपणापासूनच श्रावण महिन्याविषयी विशिष्ट प्रकारचे आकर्षण आहे. या मासात हिरवळीच्या कुशीत डोंगरमाथ्यावर कडेकपारीतून वाहणाऱ्या झऱ्यांचा मधुर खळखळाट ऐकू आला की अस वाटत हरित वधू शृंगार करून हर्षाने मनमुराद हसतेय व चांदण रातीत तिचा चंदेरी शालू अधिकच चमकताना दिसतो.

माझ्या बालपणी श्रावण महिना आला की आमच्या निवासस्थानी विविध धार्मिक ग्रंथांचे पारायण सुरू व्हायचे. संपूर्ण श्रावण महिना हे पारायण चालायचे. मनाला एक प्रकारची प्रसन्नता अनुभवता यायची. खर तर श्रावण महिना म्हणजे सणांची रेलचेल. श्रावणी सोमवार, शनिवार, नागपंचमी, रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा, गोकुळाष्टमी वगैरे नुसता जल्लोषच. या, सणासुदीच्या लगबगीमुळे अनेक पंचपक्वांनाचा आस्वाद घेता येतो. श्रावणातील खास आकर्षण म्हणजे नवविवाहितेसाठी पर्वणी असणारी " मंगळागौर". हा मंगळागौर पूजनाचा कार्यक्रम व त्यायोगे माहेरी रात्र जागवून खेळले जाणारे पारंपरिक खेळ हे तर आपल्या संस्कृतीचे प्रतिकच. श्रावणसर जशी मनामनावर अधिराज्य गाजवते तशीच सृष्टीच्या पायघड्यांवर आपल सोनेरी पाऊलही उमटवते. या उल्हासमासाच्या निमित्ताने जनमानसाचे एकत्र येणे होते. आनंदाची देवाणघेवाण होते. निसर्ग आणि मानवाची मैत्री पुन्हा एकदा वृद्धिंगत होते.

शहरा पेक्षा गावाकडील पाऊस मला अधिक आकर्षित करत आलाय. दुपारचं ओसरत चाललेल ऊन हलकेच सावल्यांच्या थव्यांना बिलगून जाते ,अचानक ढगाळ वातावरण चहुबाजुला पसरते अन् त्या पाऊस नामक राजाची वर्दी घेऊन थंडगार वाऱ्याचा दूत मातीच्या घराच्या कौलारू खिडकीपाशी येतो. खेड्यामधली ती कौलारू घरे, अंगणात मोठ्या शिताफीने धपाधप ओघळणा-या पागोळ्या उल्हसित करतात. डोंगर माथ्यावरुन डौलात उतरणारे झरे, ऐटीत परंतु संथ गतीने वाहणारी नदी, रानावनात, शेतात हिरवळीला फुटलेले चैतन्याचे धुमारे...ह्रदयाचा कब्जाच करतात. गावकडील अर्धवट डांबरी रस्त्यावरून खड्डे चुकवत धावणारी व प्रवाशांनी खचाखच भरलेली लाल परी (एसटी) पाहताना जाणवते ती मानवाने निसर्गाच्या कुशीत घेतलेली  धाव.

हाच पाऊस उतारवयात मात्र आठवणींचे संदेश घेऊन येणारा पोस्टमनच वाटतो. बालपणात,कुटुंबासोबत, मित्रमैत्रिणी सोबत अनुभवलेले अनेक पावसाळे व त्यातल्या ओल्या सुगंधी आठवांचा दरवळ जणू भिजलेल्या मातीतून येतोय असे जाणवायला लागते. अन् मग आठवते ती आईच्या हातची गरमागरम कांदाभजी, कागदी नावांची लावलेली शर्यत, काँलेजमध्ये असताना एका छत्रीतून फिरण्यातली गंमत, बायकोच्या हातची गरमा गरम काँफी, मुलांसाठी आवडीने आणलेली मक्याची कणसे, अन् पावसाने रंगवलेल्या अनेक गप्पांच्या बैठका...एखाद्या ओल्या सांजवेळी हा जीवनपट डोळ्यासमोरून सरकत जातो आणि मग सुरू होते,पाऊस अन् त्या थकलेल्या परंतु चिरतरूण नयना मधील धुंवाधार सरी मध्ये जुंपलेली अनाकलनीय शर्यत..!

नारळाच्या झावळीत,

लपले कोवळे ऊन..

आभाळाच्या गर्भात,

पावसाची ओली खूण..

 निसर्गाचा देखणा आविष्कार भासतो हा पाऊस. भावनांच्या हिंदोळ्यावर विराजमान असलेल्या सुप्त मानवी मनाला हेलकावे देण्याची एक प्रकारची आगळीच मोहमाया त्या गर्जणा-या वृष्टीमध्ये असते असे मला नेहमीच वाटते.शांत निजलेल्या विचारांचे वादळ देखील मेघगर्जना आली की भिरभिरायला लागते. काही वेळा तर विजांच्या कडकडाटात  मनावर विचित्र पडसाद उमटू लागतात. असा हा पाऊस विविध रूपात आपल्याला, सृष्टीला भिजवतो, रिजवतो, आनंद वर्षाव करतो. म्हणून तर...

पाऊस म्हणजे,

जंगलात मयुरनृत्याला ताल देणारा कलावंत, चकोराची तृष्णा भागवणारा दयावंत. कौलांच्या कोनाड्यातून झिरपणारा, पागोळ्यातून टपटपणारा, रात्रीच्या पदरात मुसमुसणारा, पहाटेच्या गर्भात धसमुसणारा मनमौजी बिलंदर. धबधब्यातून कोसळत येणारा, नदी ओहोळातून खळखळून वाहणारा, राना शेतातून भेटणारा रांगडा कलंदर. 

पावसाची महती किती वर्णावी..

घनघोर अंधाऱ्या रात्रीत गर्जणारी वृष्टी मात्र मनाच्या गाभाऱ्यात आठवणींचा  गलका करून जाते अन् दुपारची पावसाची रिपरिप शांततेच्या अंगणात हलकेच पाऊल वाजवत येते.

पावसाळा जरी चार महिन्यांचा असला तरी, पाऊसधारात चिंब न्हालेल्या मनात वर्षभर ओल्या आठवांची सर रूंजी घालत असते. म्हणून तर म्हणावसे वाटतेय.."रिमझिम पाऊस पडे सारखा..."

कितीही व्यवहारी जीवन जगलो तरी पावसाची भुरळ पाडणारे असे काही मौल्यवान क्षण प्रत्येकाच्या वाट्याला येतातच..

सरते शेवटी इतकच सांगेन,

ज्याला जसा हवा

तसा पाऊस दिसतो..

प्रत्येकाच्या आयुष्यात, 

पावसाने भिजलेला

एक तरी क्षण असतो..!

 

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

पावसामुळे मोहाडीत घराची भिंत कोसळली;  बांधकाम सभापती डॉ. लक्ष्मण भगत पोहोचले मोहाडी गावात पावसामुळे मोहाडीत घराची भिंत कोसळली;  बांधकाम सभापती डॉ. लक्ष्मण भगत पोहोचले मोहाडी गावात
आधुनिक केसरी न्यूज  गोंदिया भंडारा : सह पूर्व विदर्भात पाऊस संततधार कोसळत असून गेल्या दोन दिवसापासून गोंदियात पावसाचा जोर कायम...
त्या गरोदर मातांना ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले 
दौंडच्या स्वामी चिंचोली प्रकरणात दाजी व मेहुण्याच्या जोडीला पाच दिवस पोलीस कोठडी,पठाणवर आतापर्यंत 17 गुन्हे
जिल्हा प्रशासनाच्या तत्काळ मदतीवर प्रवाशांच्या प्रतिक्रिया
गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसाने अनेक मार्ग वाहतुकीसाठी झाले बंद ; राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळली..!
आर्थिक परिस्थितीवर मात करत सुभाष बारसे सी.ए. परीक्षा उत्तीर्ण 
पारनेर तालुक्यातील निघोज मध्ये सुगंधी तंबाखू आणि गुटखा पकडला ४,८६,१०६ लाखाचा मुद्देमाल हस्तगत..!