शेततळ्यात बुडून १३ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू ; अंबड तालुक्यातील माळेवाडी शिवारातील धक्कादायक घटना
आधुनिक केसरी न्यूज
अनिस कुरेशी
पाचोड : अंबड तालुक्यातील माळेवाडी शिवारात शेततळ्यात बुडून १३ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी (दि. १०) सकाळी उघडकीस आली. तन्मय सोमनाथ गाडेकर (वय १३) असे मृत मुलाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अधिक मासानिमित्त तन्मयचे वडील सोमनाथ गाडेकर आणि आई पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी गेले होते. घरातून निघताना त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना घरीच राहण्याची सूचना केली होती. मात्र आई-वडील गावाबाहेर गेल्यानंतर तन्मय आपल्या भावासोबत शेतात गेला.
गाडेकर कुटुंबाच्या शेतात पाण्याने भरलेले शेततळे आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्याकडे आकर्षित झालेल्या तन्मयला पोहण्याचा मोह आवरता आला नाही. त्याने शेततळ्यात उडी घेतली. मात्र त्याला व्यवस्थित पोहता येत नसल्याने तो पाण्याच्या खोल भागात गेला आणि बुडू लागला. काही क्षणातच तो पाण्याखाली गेला. ही घटना पाहून त्याच्यासोबत असलेल्या भावाने घाबरून मोठ्याने आरडाओरडा केला. त्याचा आवाज ऐकून नातेवाईक आणि परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले. त्यांनी तत्काळ शेततळ्यात उडी घेऊन तन्मयचा शोध घेतला. काही वेळाने त्याला पाण्याबाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्याला तातडीने उपचारासाठी पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रम ठाकरे यांनी तपासणी करून तन्मयला मृत घोषित केले. डॉक्टरांनी मृत्यूची खात्री दिल्यानंतर कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. आई-वडील देवदर्शनासाठी गेले असताना त्यांच्या लाडक्या मुलाचा अशा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाल्याची बातमी समजताच त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला.या घटनेमुळे माळेवाडीसह परिसरात शोककळा पसरली आहे. तन्मय हा शांत व मनमिळावू स्वभावाचा असल्याने गावातील नागरिकांनी त्याच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. दरम्यान, या घटनेची नोंद अंबड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून मृत्यूबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास अंबड पोलीस करीत आहेत.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List