इराण–इस्रायल युद्धाची झळ भिगवणच्या स्वयंपाकघराला; घरगुती गॅससाठी नागरिकांच्या पहाटेपासून रांगा
आधुनिक केसरी न्यूज
निलेश मोरे
भिगवण : दि११इस्रायल–इराण युद्धाचा परिणाम आता हळूहळू देशात जाणवू लागला असून त्याची झळ भिगवण परिसरातील नागरिकांनाही बसू लागली आहे. भिगवणमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गॅस बंद होणार असल्याच्या अफवेमुळे नागरिक पहाटेपासूनच गॅस एजन्सीसमोर रांगा लावत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
सध्या मागणीच्या तुलनेत गॅसचा पुरवठा कमी होत असल्याने अनेक घरांमध्ये गॅस संपल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना कडक उन्हात तासन्तास रांगेत उभे राहून गॅस सिलिंडरची वाट पाहावी लागत आहे. पाय पोळणारी जमीन आणि डोक्यावर रणरणते ऊन अशा परिस्थितीत महिलांसह नागरिकांना मोठी कसरत करावी लागत असल्याचे दिसून येत आहे.
युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅसचा तुटवडा रोखण्यासाठी केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात सुमारे ६० रुपयांनी वाढ केली असून गॅस बुक केल्यानंतर २५ दिवसांनंतरच सिलिंडर मिळणार असल्याचा नवा नियम लागू करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या निर्बंधांमुळे सामान्य गृहिणींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, गॅस उपलब्धतेबाबत खात्री करण्यासाठी अनेक नागरिक थेट गॅस गोडाऊन किंवा एजन्सीमध्ये जाऊन चौकशी करत आहेत. काही ठिकाणी संतप्त ग्राहक आणि कर्मचाऱ्यांमध्ये वादावादी झाल्याच्या घटनाही घडत आहेत. गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याने सिलिंडर उपलब्धतेत घट झाली आहे. परिस्थिती सुरळीत होईपर्यंत नागरिकांनी संयम बाळगावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ?
गॅसचा तुटवडा कायम राहिला आणि वेळेत सिलिंडर उपलब्ध झाले नाहीत तर अनेक कुटुंबांना पर्याय म्हणून इलेक्ट्रिक शेगडीचा वापर करावा लागण्याची शक्यता आहे. मात्र ग्रामीण भागात वीजपुरवठ्याच्या अडचणी लक्षात घेता काही महिलांवर पुन्हा एकदा पारंपरिक चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ येऊ शकते. आधुनिक सुविधांच्या युगात पुन्हा धुराच्या चुलीकडे वळण्याची वेळ येऊ नये, अशी अपेक्षा गृहिणींकडून व्यक्त होत आहे.
सौ. शुभांगी जगदाळे, तक्रारवाडी
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List