आखाती संघर्षाची झळ गडचिरोलीपर्यंत; दुबईत अडकलेल्या बुरेवार कुटुंबासाठी तातडीच्या हस्तक्षेपाची गरज
आधुनिक केसरी न्यूज
गडचिरोली : इस्रायल–इराण संघर्षामुळे मध्यपूर्वेतील परिस्थिती तणावपूर्ण बनली असून त्याचे पडसाद आता गडचिरोलीपर्यंत उमटले आहेत. पर्यटनासाठी दुबईला गेलेले गडचिरोलीतील बुरेवार कुटुंब विमानसेवा रद्द झाल्याने तेथेच अडकले असून सुरक्षित मायदेशी परतीसाठी शासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नील बुरेवार हे आपल्या वडील सुनील बुरेवार, आई मेघा बुरेवार आणि बहीण मयुरा बुरेवार यांच्यासह २५ फेब्रुवारी रोजी दुबई येथे गेले होते. ५ मार्च रोजी ‘इंडिगो’च्या नियोजित उड्डाणाने हैदराबादमार्गे नागपूरला परतण्याचे त्यांचे वेळापत्रक होते. मात्र आखाती देशांमधील वाढत्या तणावामुळे अनेक आंतरराष्ट्रीय विमानफेऱ्या रद्द करण्यात आल्याने हे कुटुंब सध्या दुबईतील Avani Deira Dubai Hotel येथे मुक्कामी आहे.कुटुंबीयांनी प्रशासनाशी संपर्क साधून आपण सध्या सुरक्षित असलो तरी उड्डाणांची अनिश्चितता आणि वाढती तणावपूर्ण परिस्थिती यामुळे मानसिक चिंता वाढत असल्याचे कळविले आहे. लवकरात लवकर भारतात परतण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी त्यांची विनंती आहे.
दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक ती माहिती संकलित करण्याची प्रक्रिया सुरू असून संबंधित बाब पुढील कार्यवाहीसाठी शासन स्तरावर पाठवण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणात Ministry of External Affairs तसेच दुबईतील भारतीय दूतावासामार्फत मदत मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे. बुरेवार कुटुंबाच्या सुरक्षित आणि लवकर परतीसाठी केंद्र व राज्य शासनाने तातडीची पावले उचलावीत, अशी सर्वसामान्यांची भावना आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List