महापौर मुनगंटीवार गटाचा, उपमहापौर व गटनेतेपद जोरगेवार गटाकडे
आधुनिक केसरी न्यूज
चंद्रपूर : महानगरपालिका महापौर निवडणुकीची उत्सुकता सर्वदूर, सर्वत्र लागली असतानाच भाजपने मनपामध्ये सत्ता बसल्यास चंद्रपुरातील भाजपाचा अंतर्गत वाद क्षमावा या दृष्टिकोनातून महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीमध्ये संतुलन साधून वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो आहे.
भाजपामध्ये मुनगंटीवार जोरगेवार वाद विकोपाला गेलेला आहे. तर काँग्रेसमध्ये धानोरकर वडेट्टीवार वाद विकोपाला पोहोचलेला आहे. त्यामुळे चंद्रपूर मनपा महापौर निवडणुकीमध्ये नेमकी कोणाची सत्ता बसेल आणि महापौर पदावर कोण आरूढ होईल हे गुलदस्त्यात असून दहा तारखे कडे होणाऱ्या महापौर पदाच्या निवडणुकीकडे केवळ चंद्रपूरचेच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. या पृष्ठभूमीवर भाजपाने शांततेने एक एक मोहरा पुढे नेत आपले महापौर आणि उपमहापौर पदाचे उमेदवार जाहीर केले आहेत. काँग्रेसमध्ये मात्र अजूनही धानोरकर आणि वडेट्टीवार यांच्यामध्ये श्रेयवाद आणि वर्चस्वाची लढाई सुरू असून दोन पैकी कोणत्या गटाचा उमेदवार महापौर होईल हे अजूनही अनिश्चित आहे.
भाजपच्या मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या भारतीय जनता पक्षाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत महापौर व उपमहापौर पदांबाबत अंतिम निर्णय घेण्यात आला. या बैठकीतील ठरावानुसार भाजपच्या महापौर पदाचा उमेदवार अधिकृतपणे जाहीर करण्यात आला आहे. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या समर्थक सौ. संगीता खांडेकर यांची महापौर पदाच्या उमेदवार म्हणून निश्चिती करण्यात आली आहे. यामुळे महापौर पद मुनगंटीवार गटाकडे जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, उपमहापौर पद आमदार किशोर जोरगेवार समर्थक संजय कंचर्लावार यांना देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे महापौर पद मुनगंटीवार गटाकडे, तर उपमहापौर पद जोरगेवार गटाकडे अशी पदांची विभागणी करण्यात आली आहे.
यापूर्वीच आमदार किशोर जोरगेवार यांच्या समर्थक शेखर शेट्टी यांची भाजपच्या गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे गटनेतेपद आणि उपमहापौर पद जोरगेवार गटाकडे राहणार असल्याने पक्षातील सामंजस्य आणि संतुलन साधण्यात आल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. या निर्णयामुळे महापालिकेत भाजपचे संघटन अधिक बळकट होणार असून आगामी काळात शहर विकासासाठी समन्वयाने काम केले जाईल, असा विश्वास पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केला आहे.
आता धानोरकर वडेट्टीवार वाद क्षमणार काय आणि काँग्रेसची सत्ता बसल्यास महापौर कोणत्या गटाचा हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या सगळ्यांमध्ये किंग मेकर असणारे उबाठा गटाचे संदीप गिऱ्हे मात्र चांगलेच कैचीत पकडल्या गेले आहेत. कारण त्यांना चंद्रपूरमध्ये काँग्रेस सोबत जाण्यात इंटरेस्ट नाही. परंतु, संजय राऊत यांनी सांगितल्याप्रमाणे मात्र त्यांना काँग्रेस सोबतच चर्चा करून निर्णय घ्यावा लागणार आहे. संदीप गिऱ्हे यांनी मात्र जो आम्हाला महापौर पद देईल त्यांच्यासोबत जाऊ असे वक्तव्य करून सत्ता स्थापनेतील आपली भूमिका किती महत्त्वाची आहे हे दाखवून दिले आहे. सहा उमेदवार निवडून आणत त्यांनी आपली *बार्गेनिंग पॉवर* वाढवल्यामुळे चंद्रपूर मनपा महापौर निवडणुकीत संदीप गिऱ्हे हे आता नेमके कोणत्या गटाकडे जाणार याकडेही चंद्रपूरकरांचे लक्ष लागले आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List