गोंदियात मोठी कारवाई: मध्य प्रदेशातून दारूची तस्करी रोखली, आरोपी फरार
आधुनिक केसरी न्यूज
देवरी : आगामी नवीन वर्ष व निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू तस्करांविरुद्ध कंबर कसली आहे. आमगाव तालुक्यातील बाम्हणी रेल्वे फाटकाजवळ सापळा रचून विभागाने मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात येणारी विदेशी दारू आणि एक आलिशान कार असा एकूण ११ लाख ३२ हजार १०८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई रविवारी (२१ डिसेंबर) दुपारी करण्यात आली.
अशी झाली कारवाई
राज्य उत्पादन शुल्क विभागाला गुप्त माहिती मिळाली होती की, मध्य प्रदेशातून एका पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा एक्सयुव्ही ५०० (क्रमांक CG 08 LN २५२०) मधून विदेशी दारूची तस्करी केली जाणार आहे. या माहितीच्या आधारे देवरी आणि गोंदिया येथील पथकाने बाम्हणी रेल्वे फाटकाजवळ नाकाबंदी केली. संशयित वाहन येताच त्याची झडती घेतली असता, त्यात केवळ मध्य प्रदेशात विक्रीसाठी असलेल्या विविध नामांकित कंपन्यांच्या दारूचा मोठा साठा आढळून आला.
जप्त केलेला मुद्देमाल..
या कारवाईत पथकाने खालील मुद्देमाल हस्तगत केला आहे:
* महिंद्रा एक्सयुव्ही ५०० कार: किंमत ८,५०,००० रुपये.
* विदेशी दारू व बिअर: यात गोवा व्हिस्की, रॉयल स्टॅग, मॅकडॉवेल नंबर १, ओल्ड मंक रम आणि किंगफिशर बिअरच्या एकूण १५०० हून अधिक बाटल्या व कॅनचा समावेश आहे. (किंमत अंदाजे २.८० लाख रुपये).
* इतर साहित्य: एक जिओ भारत मोबाईल, ३ एटीएम कार्डे आणि रोख रक्कम.
मुख्य सूत्रधार फरार
या प्रकरणातील मुख्य सूत्रधार नितीन निर्मल धमगाये असून, कारवाईदरम्यान आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला. राज्य उत्पादन शुल्क विभागाने महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेतला जात आहे.
यांनी केली कारवाई
ही धडक कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, विभागीय उपायुक्त गणेश पाटील आणि अधीक्षक मनोहर अंचुळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात देवरीचे निरीक्षक अ. ओ. गभणे, दुय्यम निरीक्षक ए. ए. सडमेक, आर. एम. आत्तेलवाड आणि भरारी पथक गोंदियाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक ए. ए. सडमेक करीत आहेत.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List