नगर पालिका निवडणूक अहिल्यानगर जिल्ह्यात भाजपचं वर्चस्व

आधुनिक केसरी न्यूज

मिलिंद बेंडाळे

अहिल्यानगर : जिल्ह्यातील नगर पालिकांच्या निवडणूक निकालांवर राज्याप्रमाणेच भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व राहिले. सात नगरपालिकांत भाजपचे सात, शिवसेना शिंदे गटाचे २, कॉंग्रेसचा एक, तर स्थानिक आघाड्यांचे दोन नगराध्यक्ष निवडून आले. या निवडणुकीतही पुन्हा एकदा भाजपच्या विजयात काही लाडक्या बहिणींचा फॅक्टर प्रभावी ठरल्याचं स्पष्ट झालं आहे.

पाथर्डीत भाजपचे अभय आव्हाड विजयी

जातीय समीकरणं प्रभावी असलेल्या पाथर्डी शहरात नगराध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे भाजपचे अभय आव्हाड विजयी झाले. पाथर्डी पालिकेसाठी कालच (ता. २०) दहा प्रभागांत २० नगरसेवक व नगराध्यक्षपदासाठी ही निवडणूक झाली. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री राधाकृष्ण विखेंच्या सभा प्रभावी ठरल्या. आमदार मोनिका राजळे यांचं संपूर्ण तालुक्यावरील वर्चस्व पुन्हा स्पष्ट झालं. ही पालिकाही पुन्हा एकदा भाजपच्या ताब्यात आल्याचे दिसले. विरोधी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांनीही या निवडणुकीसाठी चांगला जोर लावला होता. परंतु, विकासकामांच्या जोरावर राजळे यांनी ही पालिका पुन्हा आपल्या ताब्यात ठेवण्यात यश मिळवलं.

श्रीगोंद्यात चौरंगी लढतीत नगराध्यक्षपदी भाजपच्या खेतमाळीस

श्रीगोंदे पालिकेच्या अत्यंत चुरशीच्या चौरंगी लढतीत भाजपच्या सुनीता खेतमाळीस यांनी बाजी मारली. शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शुभांगी पोटे यांचा या निवडणुकीत पराभव झाला. पहिल्यांदाच आमदार झालेल्या विक्रम पाचपुते यांच्यावर श्रीगोंदेकरांनी पुन्हा एकदा विश्वास ठेवल्याचं दिसत आहे. भाजपच्या सुनीता खेतमाळीस यांनी १०७५ मतांनी विजय मिळवला. या विजयामुळे श्रीगोंद्यातील जनतेने भाजपच्या विकासाभिमुख धोरणांवर आणि सक्षम नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे. नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांच्या नेतृत्वाखाली शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास आमदार विक्रम पाचपुते यांनी व्यक्त केला.

राहाता व शिर्डीत विखेंचाच प्रभाव

राहात्यात भाजपच्या विखे गटाचे डॉ. स्वाधीन गाडेकर नगराध्यक्षपदी मोठ्या मताधिक्क्यानं विजयी झाले. या पालिकेवर अपेक्षेप्रमाणे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पॅनेलनं २० पैकी १९ जागा जिंकून एकतर्फी विजय मिळवला. या विजयानं विखे गटानं अपेक्षेप्रमाणं पालिकेवरील सत्ता कायम राखली आहे. नगराध्यक्षपदासाठी भाजपचे डॉ. गाडेकर व लोकक्रांती सेनेचे धनंजय गाडेकर यांच्यात मुख्य लढत झाली. दोन्ही उमेदवारांनी निवडणुकीत आपली सर्व ताकद लावली. त्यात डॉ. स्वाधीन गाडेकर हे सुमारे ४६६० मतांनी विजयी झाले. विखेंनी पुन्हा आपल्या बालेकिल्ल्यात मोठी विजय मिळवला. सुरुवातीपासून ही निवडणूक एकतर्फी होईल, असा सर्वांचा अंदाज होता. तो खरा ठरला आहे.

शिर्डीत विखे गटाच्या जयश्री थोरात नगराध्यक्षा

साईबाबांच्या शिर्डीतही भाजपच्या जयश्री विष्णू थोरात ४९४० मतांनी विजयी झाल्या आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या माधुरी थोरात व शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या भाग्यश्री सावकारे उमेदवार होत्या. या निवडणुकीपूर्वीही जयश्री थोरात नगराध्यक्ष म्हणून कार्यरत होत्या. शिर्डीकरांनी थोरात व विखेंवर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. या निवडणुकीतून तालुक्याबरोबरच राहाता व शिर्डी शहरातही विखे पिता-पुत्रांचं एकछत्री वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.

राहुरीत पुन्हा तनपुरे गटाचे वर्चस्व; भाऊसाहेब मोरे नगराध्यक्षपदी

राहुरी नगर पालिकेच्या नगराध्यक्षपदी तनपुरे यांच्या विकास आघाडीचे भाऊसाहेब मोरे विजयी झाले. त्यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला. या निवडणुकीत विकास आघाडाने १७ जागांवर विजय मिळवला. तर भाजपला फक्त ७ जागा मिळाल्या. या निवडणुकीत राहुरीकरांनी पुन्हा एकदा तनपुरेंवर विश्वास दाखवल्याचे दिसले. आमदार शिवाजीराव कर्डिेल यांच्या निधनानंतर पालिकेवर कोणाची सत्ता येईल, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. तनपुरे गटाने राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना एकत्र करून ही निवडणूक लढवली. महाविकास आघाडी व भाजपमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत चांगलीच चुरस रंगली. परंतु या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने स्वतंत्र पॅनल केल्याने महायुतीची मते विभागली होती.

देवळाली प्रवराच्या नगराध्यक्षपदी सत्यजित कदम

राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा नगर पालिकेत पुन्हा एकदा भाजपची सत्ता आली आहे. नगराध्यक्षपदासाठी भाजपचे सत्यजित कदम यांच्यावर जनतेने पुन्हा विश्वास दाखवला. या निवडणुकीत भाजपचे १५ नगरसेवक निवडून आले. विरोधी काँग्रेसला अवघ्या ४ जागांवर समाधान मानावे लागले. वंचित बहुजन आघाडी व शिवसेनेचा एक-एक नगरसेवक निवडून आला. माजी आमदार चंद्रशेखर कदम यांच्यावर देवळाली प्रवरामधील  जनतेने पुन्हा एकदा विश्वास दाखवल्याचे या निकालानंतर स्पष्ट झालं आहे. देवळाली प्रवरा पालिकेसाठी दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच २० डिसेंबरला मतदान झालं.

जामखेडमध्ये रोहित पवार यांना धक्का; भाजपकडेच नगराध्यक्षपद

जामखेडमध्ये आमदार रोहित पवार यांचे वर्चस्व मोडून काढून भाजपच्या प्रांजल अमित चिंतामणी ३६८२ मतांनी विजयी झाल्या. त्यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या संध्या शहाजी राळेभात यांचा मोठा पराभव केला. या पराभवामुळे आमदार रोहित पवार यांना विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी मोठा धक्का दिल्याचे मानले जात आहे.

शेवगावमध्ये शिंदे गटाच्या माया मुंडे नगराध्यक्षपदी

शेवगाव पालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी झालेल्या अटीतटीच्या लढतीत शिवसेना शिंदे गटाच्या माया अरुण मुंडे विजयी झाल्या. राष्ट्रवादीच्या विद्या लांडे, भाजपच्या रत्नामाला फलके आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाच्या परवीन काझी यांना पराभवाचा सामना करावा लागला. शेवगाव पालिकेच्या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट व शिवसेना हे महायुतीतीत तिन्ही पक्ष समोरसमोर होते. राष्ट्रवादीचा शरद पवार गटही निवडणुकीच्या रिंगणात होता. भाजपचं नेतृत्व आमदार मोनिका राजळे, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेतृत्व माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी केलं. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात भाजपचे नेते अरुण मुंडे यांनी शिवसेना शिंदे गटाची वाट धरत नगराध्यक्षपदाची उमेदवारी आपल्या पत्नीला मिळवून दिली. ही त्यांची चाल यशस्वी ठरून माया मुंडे यांनी या निवडणुकीत बाजी मारली.

नेवासेच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेचे डॉ. करणसिंह घुले

नेवाशातील चुरशीच्या लढतीत शिवसेना शिंदे गटाचे डॉ. करणसिंह घुले यांनी बाजी मारली. या विजयामुळे नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत, शिवसेनेचे आमदार विठ्ठलराव लंघे यांनी पुन्हा एकदा माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्यावर मात केली. गडाख यांनी क्रांतीकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातून या निवडणुकीत आपली आपली ताकद पणाला लावली होती. शिवसेनेचे घुले यांनी क्रांतीकारी शेतकरी पक्षाच्या नंदकुमार पाटील यांचा पराभव केला.

संगमनेरमध्ये पुन्हा थोरात-तांबे यांचे वर्चस्व

गेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या पराभवामुळे राज्यभर लक्ष असलेल्या संगमनेर नगर पालिकेच्या निवडणुकीत अखेर थोरात-तांबे या मामा- भाच्यांनी  अखेर विजय मिळवला आहे.  या ठिकाणी संगमनेर सेवा समितीच्या उमेदवार आणि सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे विजयी झाल्या आहेत. यातून त्यांनी विधानसभेला बाळासाहेब थोरात यांचा पराभव करणाऱ्या जायंट किलर अमोल खताळ यांचा वचपा काढला आहे.

संगमनेर विधानसभेसाठी दिग्गज अशा थोरात यांनी खताळ यांनी पराभवाचं पाणी चाखायला लावलं होतं. त्याची राज्यभर चर्चा झाली होती. कारण नवा चेहरा असणारे शिवसेनेचे खताळ यांनी थेट कॉंग्रेसकडून मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतील नेते राहिलेल्या बाळासाहेब थोरात यांचा पराभव केला होता. हा पराभव थोरात आणि तांबे घराण्याच्या जिव्हारी लागला होता. त्यांनी त्याचा वचपा या निवडणुकीतून काढला आहे. सत्यजीत तांबेंच्या पत्नी मैथीली यांनी अमोल खताळ यांच्या भावाच्या पत्नी असलेल्या सुवर्णा खताळ यांचा पराभव केला आहे.

अटीतटीच्या लढतीत श्रीरामपूरमध्ये करण ससाणे विजयी

श्रीरामपूरमध्ये प्रतिष्ठेच्या व अटीतटीच्या निवडणुकीत कॉंग्रेसचे करण ससाणे यांनी नगराध्यक्षपदी विजय मिळवला. ससाणे यांच्या विजयासह कॉंग्रेसला जिल्ह्यात अधिकृतपणे आपले अस्तित्व राखता आलं आहे. ससाणे यांनी राष्ट्रवादीच्या अनुराधा आदिक यांचा पराभव केला. भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. पण,  श्रीरामपूरमध्ये पक्षाला मोठा पराभव स्वीकारावा लागला आहे.

कोपरगावात भाजपचे पराग संधान विजयी

कोपरगावच्या नगराध्यपदीही भाजपचे पराग संधान यांनी विजय मिळवला आहे. नगर पालिकेतही भाजपलाच बहुमत मिळाले आहे. कालच येथे मतदान झाले. संधआन यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे ओमप्रकाश तथा काका कोयटे यांच्यावर संधान यांनी चारशे मतांनी विजय मिळवला. पालिकेतील ३० पैकी १९ जागा भाजप, तर ११ जागा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला मिळाल्या.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

चंद्रपूर  जिल्ह्यातील नगरपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर चंद्रपूर  जिल्ह्यातील नगरपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
आधुनिक केसरी न्यूज चंद्रपूर : दि.२१ आज चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण १० नगरपरिषद व १ नगरपंचायतीचा निकाल जाहीर करण्यात आला. जिल्ह्यात...
कमळाची हॅटट्रिक : गडचिरोली जिल्ह्यात तीनही नगरपालिकांवर भाजपचा निर्विवाद झेंडा
नगर पालिका निवडणूक अहिल्यानगर जिल्ह्यात भाजपचं वर्चस्व
वरोडा नगरपरिषदेवर काँग्रेसची सत्ता अर्चना ठाकरे २७८५मतांनी विजयी..!
सिंदखेडराजा नगरपरिषद निकाल जाहीर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचा नगराध्यक्ष पदावर निर्णायक विजय १५८ मतांनी सौरभ विजय तायडे विजयी
महाराष्ट्र ट्रेड फेअर" प्रदर्शनात "पंचम दा" च्या सांस्कृतिक कार्यक्रमाने आणली रंगत
लोकशिक्षणाचे विद्यापीठ: संत गाडगेबाबा