लोकशिक्षणाचे विद्यापीठ: संत गाडगेबाबा
आधुनिक केसरी न्यूज
महाराष्ट्रात "गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला..." असे भजन कीर्तन करीत जनजागृतीचे महत्वपूर्ण कार्य करणारे आणि विज्ञाननिष्ठ समाजासाठी प्रबोधनाचा जागर करणारे संत गाडगेबाबा खऱ्या अर्थाने लोकशिक्षणाचे विद्यापीठ होते. जवळपास पन्नास वर्ष महाराष्ट्रात अंधश्रद्धेवर काम करणाऱ्या या संतांने समाजाला समजेल या भाषेत भजन कीर्तन करून महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीत एक लोकशिक्षकाची खंबीर भूमिका निभावणारे ते प्रतिभावंत म्हणून नावारूपास आलेले होते. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील शेंडगाव (अमरावती) येथे दि. 23 फेब्रुवारी 1836 रोजी झाला. त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर असे होते. त्यांनी आपले जीवन स्वच्छतेचा प्रसार आणि सामाजिक न्याय यासाठी शेवटपर्यंत घालवले.
समाजप्रबोधनाचा ध्यास घेतलेल्या बाबांनी आपले संपूर्ण जीवन बहुजन समाजाच्या उध्दारासाठी व्यतीत करताना माणुसकीचा एक नवा विचार दिला. गाडगेबाबा स्वतः अशिक्षित असतानाही शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे ते सातत्याने सांगायचे. सोबतच समाजातील अंधश्रध्दा, बुवाबाजी आणि दांभिकतेवर कीर्तनातून सडेतोड बोलत जायचे. म्हणूनच त्यांचे विचार समाजप्रबोधनासाठी प्ररेक राहिले. त्यांनी सर्वसामान्य जनतेसाठी एक साधा, सरळ विचार देताना एकप्रकारे लोकसेवकाची भूमिका बजावण्याचे कार्य केले ते अफलातून राहिले. त्यासाठी स्वतःच्या संसाराकडे त्यांनी पाठ फिरवली. ते कायम फकीर राहिले. आणि त्यांच्या रूपाने महाराष्ट्राला एक अद्वितीय सामाजिक भान देणारे व्यक्तिमत्व मिळाले. एक अशिक्षित व्यक्ती आणि संत विज्ञानावादी विचारातून
समाजप्रबोधन करीत राहतो यातून समाजाला एक ऐतिहासिक दृष्टी लाभत जाते. यातून मानवता धर्माची पताका सतत फडकत राहते. स्वच्छतेचा मूलमंत्र मनामनांत रुजविण्यासाठी गाडगेबाबांनी जी साधना केली त्याचे मूल्यमापन करताच येत नाही. कारण ते समाजासाठी तावूनसुलाखून निघालेले एक विलक्षण संत होते. लोकांच्या समस्यांचे निरीक्षण करण्याची एक अदूभूत शक्ती त्यांना लाभली. माणसेच माणसांचे शोषण करतात हे त्यांना चांगलेच कळले होते. म्हणून या विषयावर ते कीर्तनातून प्रहार करायचे तेव्हा लोकांनाही ते विचार पटत असायचे. त्या काळात महाराष्ट्रात अवघड कर्मकांड, अघोरी अंधश्रध्दा यांचे पेव फूटले होते. यात समाज भरडला जात होता. तेव्हा ग्रंथ, पोथ्या, आणि अघोरी अंधश्रध्दा यावर जोरकस प्रहार करत एक ज्ञानप्रसार करण्याचे कार्य केले महत ठरले.
जनमानसात भजन करताना ते नेहमी म्हणायचे,
" बाबांनो देव मंदिरात नाही आणि मूर्तीत नाही, तर माणसांत आहे.,भूक लागलेल्या जीवाला अन्न द्या, अडाणी माणसांना ज्ञान द्या, येथेच परमेश्वर आहे..." गाडगेबाबांचे हे आवाहन त्याकाळी सामाजिक न्यायाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे ठरले होते. ते नवस या विषयावर देखील कडाडून विरोध करायचे. नवसासाठी मुक्या कोंबड्या बक-यांचा बळी दिल्याने माणूस कधीच सुखी होणार नाही हे आतून व्यक्त होत सांगायचे. ते जेथे जातील तेथे त्यांनी सहज सोप्या भाषेचा वापर आणि विविध संतांचे छोटे छोटे विचार देत आपल्या कीर्तनातून सामाजिक जनजागृती करायचे. समाजाला आपल्या कीर्तनातून संदेश देणाऱ्या गाडगेबाबांचे
एकूणच सामाजिक कार्य दखल घेण्यासारखेच राहिले. त्यांचे 20 डिसेंबर 1956 रोजी निधन झाले.
.............................
- बाळासाहेब जोगदंड
- छ.संभाजीनगर
- मोबाईल-9423051246
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List