देवाभाऊ" साठी ठाण्यात शिवप्रतिमेचा अवमान ! काँग्रेसने पोलखोल करीत केली कडक कारवाईची मागणी
आधुनिक केसरी न्यूज
ठाणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या छायाचित्रासोबत ‘देवाभाऊ’ असा उल्लेख आणि शिवमुद्रा तसेच देवेंद्र फडणवीस छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पांजली अर्पण करतानाच्या चित्ररूपी जाहिराती ठाणे शहरातील विविध भागांत भिंतींवर रंगविण्यात आल्या होत्या. या जाहिरातबाजीमुळे सुशोभीकरण केलेल्या ठाण्याचे विद्रुपीकरण झाले. यातील कळवा रेल्वे स्टेशन परिसरात रंगविलेला चित्राच्या ठिकाणी अज्ञातांनी छत्रपती शिवरायांची प्रतिमा व शिवमुद्रेवर रंग फासून झाकले, आणि "देवाभाऊ" मात्र शिल्लक ठेवले आहे. अशा प्रकारे महाराष्ट्राच्या आराध्यदैवताचा घोर अपमान झाल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.
या गंभीर प्रकाराची दखल घेत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने कळवा पोलिस ठाण्यात धडक दिली. यावेळी धार्मिक आणि ऐतिहासिक भावना दुखावणे, समाजात वैमनस्य पसरवणे, कटकारस्थान, तसेच बदनामी अशा गंभीर गुन्ह्या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 295A, 153, 153A, 500, 501, 298, 120B अन्वये गुन्हा नोंदविण्याची औपचारिक मागणी केली.
यासंदर्भात काँग्रेसने उपस्थित केलेले प्रश्न तितकेच गंभीर आहेत. महापालिकेच्या माध्यमातून शहर सुशोभिकरण केलेल्या भिंतीवर फडणवीस यांनी स्व:प्रसिद्धीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून काढलेल्या भित्तिचित्रांवर नेमके कोणी रंगकाम केले ? या रंगकामासाठी महापालिकेने कोणती परवानगी दिली होती का? परवानगी नव्हती तर महापालिकेने स्वतःहून गुन्हा का नोंदवला नाही ? यासारख्या मुद्द्यांची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यावेळी ब्लॉक अध्यक्ष राजू शेट्टी, निलेश पाटील, ॲड जावेद शेख, सेवादल अध्यक्ष रवींद्र कोळी, नुर्शिद शेख, मनोज डाकवे, वैशाली भोसले, विजय खेडेकर, दयानंद पवळ, पद्मिनी खराडे, कृष्णा म्हासने, राजू ढवळे, नियाझ कुरणे आदी मोठ्या संख्येने काँग्रेसचे पदाधिकारी आणि शिवप्रेमी उपस्थित होते. ठाण्यात या प्रकरणाची मोठी चर्चा असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
विनापरवानगी भिंतीवर गलिच्छ ठिकाणी महापुरुषांची रंगचित्रे काढणाऱ्यांवर शहर विद्रूपिकरणाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे व “छत्रपतींच्या प्रतिमेवर रंग फासणे म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीवर थेट हल्ला आहे. हे करणारे कोणीही असले तरी त्यांना कायद्याचा हिसका दाखवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही.”
- राहुल पिंगळे (प्रवक्ता काँग्रेस ठाणे)
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List