मुंबईतील भूखंड लाडक्या शेठला कवडीमोल दराने देण्याचा भाजपा महायुती सरकारचा सपाटा
आधुनिक केसरी न्यूज
मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रातील घरांच्या किमती सर्वसामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. काँग्रेस सरकारने सुरु केलेली परवडणारी घरे योजना अत्यंत उपयुक्त असून ही योजना व्यापक प्रमाणात राबविली पाहिजे. गिरण्यांच्या जमिनीवर ३३/३३/३३ फार्म्युल्यातील ३३ टक्के सार्वजनिक उपक्रमावरील भूखंड उद्योगपतींच्या घशात घातले जात आहेत, हा प्रकार थांबवून या भूखंडावर परवडणारी घरे योजना राबवावी यासाठी काँग्रेस पक्षाने २५ विविध संघटनांसोबत एक अभियान हाती घेतले आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे.
गांधी भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, काँग्रेस सरकारने म्हाडाच्या माध्यमातून परवडणारी घरे योजना सुरु केली, पुढे गिरणी कामगारांना घरे देण्याचा निर्णयही झाला. १ लाख १० हजार गिरणी कामगांना घरे द्यायची असताना आतापर्यंत केवळ १५ हजार घरे देण्यात आलेली आहेत. गिरण्यांच्या जमिनी उद्योगपतींच्या घशात घातल्या जात आहेत. भाजपा महायुती सरकारने मुंबई विक्रीस काढली असून धारावी आंदण दिली आहे, विमानतळासह महत्वाचे व मोक्याचे भूखंड लाडक्या उद्योगपतीला दिले जात आहेत. दिल्लीवाल्यांनी त्यांचा लाडका शेठ उभा केला आहे त्याच धर्तीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कंभोज नावाचा नवा शेठ उभा करून त्याच्या घशात मुंबईतील भूखंड व एसआरएचे भूखंडही घातले जात आहेत.
या विरोधात रणनिती ठरविण्यासाठी रविवार दि. १२ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता टिळक भवन दादर येथे घर हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह माजी खासदार कुमार केतकर, प्रदेश काँग्रेसच्या अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख विश्वास उटगी, धर्मराज्य पक्षाचे राजन राजे, इंटकचे महाराष्ट्र सचिव गोविंद मोहिते, सर्व श्रमिक संघाचे शिशिर ढवळे, आयटकचे सुकुमार दामले, विजय कुलकर्णी, कॅा मिलिंद रानडे, श्रीपाद लोटलीकर, शैलेश सावंत आदि उपस्थित राहणार आहेत.
पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागला आहे हे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचे विधान अत्यंत बेजबाबदार व निर्लज्जपणाचे आहे. शेतकरी उद्ध्वस्थ झाला असताना असे विधान करून त्यांनी जखमेवर मीठ चोळले आहे. फडणवीस सरकार मधले मंत्री वाचाळ, बेशरम व बेताल आहेत, मंत्र्यांने असे विधान करून ते जुमलेबाजी करून सत्तेत आले आहेत हे स्पष्ट केले आहे, अशा बेताल मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली पाहिजे पण मुख्यमंत्री फडणवीस स्वतःच अशा मंत्र्यांना पाठीशी घालत आहेत, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे असे सपकाळ म्हणाले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची काँग्रेस पक्षाची तयारी सुरु असून राज्यतील सर्व जिल्ह्यांच्या आढावा बैठका झाल्या आहेत. मतदार याद्यांच्या पडताळणीचे काम सुरु आहेत. काँग्रेस पक्षाने इच्छुक उमेदवारांचे अर्जही मागवले आहेत. जिल्हा काँग्रेस कमिटीकडे हे जमा केले जातील त्यांच्याकडून ते प्रदेश काँग्रेसकडे येतील व प्रदेश काँग्रेस त्यावर निर्णय घेईल. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आघाडीचा निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जाईल असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, कबुतरांची चिंता करताना माणसाच्या आरोग्याचीही चर्चा केली पाहिजे तसेच कबुतरखान्यासाठी पुढाकार घेणारे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विशेष लोढा कबुतरखाना टॉवर उभे करावे यावरही चर्चा व्हायला हवी, असे सपकाळ म्हणाले. तसेच वराह जयंतीनंतर आता छटपूजेचा मुद्दा भाजपा आणत आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच भाजपाला जातीपातीची, धर्माची व सण उत्सवाची आठवण होते असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
या पत्रकार परिषदेला माजी खासदार कुमार केतकर, प्रदेश काँग्रेसच्या अर्थशास्त्र विभागाचे अध्यक्ष विश्वास उटगी, धर्मराज्य कामगार कर्मचारी संघटना महासंघाचे राजन राजे, इंटकचे गोविंदराव मोहिते, सर्व श्रमिक संघाचे शिशिर ढवळे, आयटकचे सुकुमार दामले, सर्व श्रमिक संघटनेचे विजय कुलकर्णी, मिलिंद रानडे, श्रीपाद लोटलीकर, शैलेश सावंत आदी उपस्थित होते.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List