शाळेवरून आलो घर पुरात; नोकरीवर गेलो घर पाण्यात: आयएएस कुलदीप जंगम म्हणाले पुराचं दुःख मला विचारा
आधुनिक केसरी न्यूज
महेश गायकवाड
सोलापूर : पूरग्रस्तांचे दुःख मला विचारा. लहानपणापासून मी हे अनुभवले आहे. दहावीला असताना एकदा शाळेतून घरी आलो तर माझे घर पुरात होते. आयएएस होऊन मी नोकरीवर रुजू झालो तर पहिल्याच दिवशी पुराच्या व्यवस्थेसाठी नदीकाठावर जावे लागले आणि इकडे माझे निवासस्थान पाण्यात गेले होते. पुरामुळे काय हाल होतात हे माझे मलाच माहित आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली आहे.
सिनेला आलेल्या महापुरामुळे पाच तालुक्यातील सुमारे 85 गावातील ग्रामस्थ बाधित झाले. पुरामुळे त्यांना घर सोडावे लागले. त्यानंतर निर्माण झालेली परिस्थिती भयावह होती. अशा परिस्थितीत पूर बाधितांना धीर देऊन त्यांना सुविधा देण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी मोठ्या नेटाने पार पाडली आहे. त्यामुळे पूरग्रस्तांना प्रशासनाविषयी आदरभाव निर्माण झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीनंतर जिल्हा प्रशासनाबरोबरच शेजारधर्म म्हणून शेजारच्या गावातील नागरिक, सामाजिक संस्था, राजकीय मंडळी यांनी चांगली भूमिका निभावली. प्रशासन म्हणून काम करताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी पूरग्रस्तांच्या सेवेला वाहून घेतले होते. करमाळा, माढा, मोहोळ, उत्तर तालुक्यातील पूरग्रस्तांसाठी त्यांनी फ्रंटलाईनवर जाऊन काम केले.
पुराचा पहिला फटका बसल्यानंतर पूरग्रस्तांना गरज होती ती जेवणाची. शासकीय यंत्रणेतून इतक्या वेगाने ही व्यवस्था करणे शक्य नव्हते. हे तातडीची गरज ओळखून पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सूचनेनुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या संघटना प्रमुखांची बैठक घेतली. कर्मचारी संघटना व पतसंस्थांना पूरग्रस्तांच्या जेवणाच्या व्यवस्थेसाठी तात्काळ मदतीचे आवाहन केले. सीईओ जंगम यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत शिक्षक, ग्रामसेवक, आरोग्य, कर्मचारी व अधिकारी आणि पतसंस्थांनी पुढाकार घेत मोठी आर्थिक मदत उभी केली. यातून सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पूरग्रस्तांना दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली. माढा व सोलापूर शहरात किचन सुरू करण्यात आले. त्यानंतर पूर ओसरल्यानंतर ग्रामस्थ घराकडे परतले. त्यावेळी या लोकांना गरज भासली ती रेशनची. जिल्हा प्रशासनानेही रेशनची व्यवस्था केली. पण सीईओ जंगम यांनी कर्मचाऱ्यांनी केलेल्या मदतीतून सुमारे 13000 पूरग्रस्तांना दहा दिवस पुरेल इतक्या रेशनची व्यवस्था केली.
सीईओ कुलदीप जंगम इतक्यावरच थांबलेले नाहीत. पूर ओसरल्यानंतर ग्रामस्थ घराकडे परतल्यानंतर मोठ्या विदारक चित्र होते. घरात पुराचे पाणी शिरल्याने संसार उपयोगी साहित्याची धुळधाण झाली होती. त्यामुळे घरातील स्वच्छता महत्त्वाची होती. पूरग्रस्तांना घराची सफाई करण्यासाठी जिल्हा परिषद व ग्रामपंचायत यंत्रणेने मदतीचा हात दिला. पहिल्या दिवशी 28 दुसऱ्या दिवशी 25 अशाप्रमाणे प्रत्येक गावात टीम तयार करण्यात आली. या टीम मध्ये नगरपरिषदांच्या सफाई कामगारांचेही मदत घेण्यात आली. जेटिंग मशीनद्वारे घरांमधील घाण बाहेर काढण्यात आली. पुरच्या पाण्यामुळे घरातील साहित्य भिजून निर्माण झालेली दुर्गंधी दूर करण्यासाठी फिनेल चा वापर करण्यात आला. ग्रामस्थांबरोबरच गावातील शाळा व ग्रामपंचायत कार्यालय अशा पद्धतीने स्वच्छ करण्यात आली. पूरग्रस्तांना जेवण, रेशन व घराच्या सफाईसाठी मदत करण्यासाठी सीईओ कुलदीप जंगम यांनी गावागावांमध्ये ठाण मांडले.
पूरग्रस्तांसाठी केलेल्या कार्याबाबत प्रतिक्रिया विचारले असता कुलदीप जंगम म्हणाले पूरग्रस्तांचे वेदना काय असते याची मला जाणीव आहे. आयएएस जंगम हे आंध्र प्रदेशातील कर्नुल जिल्ह्यातील रहिवासी आहेत. यानिमित्ताने त्यांनी लहानपणीच्या आठवणी जागवल्या. मी दहावीत असेन त्या वेळची गोष्ट आहे. त्यावर्षी भरपूर पावसाळा झाला. एके दिवशी मी शाळेतून घराकडे परतल्यानंतर माझ्या गावा शेजारच्या नदीला पूर आल्याचे सांगण्यात आले. मला वाटेतच थांबवण्यात आले. घरी जाऊ दिले नाही. बाजूच्या निवारा शेडमध्ये मला नेण्यात आले. त्याकाळी इतकी साधने नव्हती. घरच्यांचे काय हाल आहेत हे मला समजेना. माझी माहितीही घरच्यांना कळत नव्हती. त्यामुळे निवारा शेडमध्ये मी या चिंतेत रात्र जागून काढली. दुसऱ्या दिवशी पूर ओसरल्यानंतर घराकडे परतलो. सुदैवाने माझ्या घराला पुराचा कोणताही फटका बसलेला नव्हता. पण ज्यांना फटका बसला त्यांच्या कहान्या ऐकून अंगावर शहारे आले. मी नशीबवान होतो. पुढे आयएएस झाल्यानंतर नांदेड जिल्ह्यात नियुक्ती मिळाली. प्रांत अधिकरी म्हणून हजर झाल्यावर पहिल्याच दिवशी ढगफुटी झाली. त्यामुळे मला पूरग्रस्त भागांच्या सोयीसाठी जावे लागले. मला जे निवासस्थान देण्यात आले होते तेही या पुराच्या पाण्यात अडकले. मी पूरग्रस्तांच्या सेवेत मग्न असतानाच मला फोन आला, रात्री आराम करण्यासाठी घरात येता येणार नाही. घरात पुराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे रस्त्यावरच रात्र काढली. दुसऱ्या दिवशी कर्मचाऱ्यांनी भिंतीला ड्रिलद्वारे छिद्र मारून पाणी बाहेर काढले. त्यानंतर घराच्या स्वच्छतेला जी यंत्रणा वापरावी लागली, त्यावरून लोकांना काय करावे लागते याची मला जाणीव झाली. सोलापूरला आलो आषाढीवारीचा अनुभव घेतला आणि त्यानंतर या पूरस्थितीला सामोरे जावे लागले आहे. सीनेच्या पुराने सोलापूरकरांना बरेच काही शिकवले आहे. हा पुर ऐतिहासिक होता. प्रशासनालाही आता याबाबत बरेच काही करावे लागणार आहे. सीना नदीच्या पूर क्षेत्रात येणारी गावे, शाळा, ग्रामपंचायत कार्यालय यांच्या पुनर्वसनाबाबत आता मोठे नियोजन करावे लागणार असल्याचे सीईओ कुलदीप जंगम यांनी सांगितले.
असा अधिकारी पाहिला नाही…
पूरग्रस्तांसाठी सीईओ कुलदीप जंगम यांनी केलेल्या कामाबाबत पूरग्रस्तांनी आपल्या भावना नोंदवल्या आहेत. फ्रंट लाईनवर येऊन काम करणारे सीईओ जंगम यांच्यामुळे आमचा संसार सावरण्यास मोठी मदत झाली. सरकारची मदत मिळेलच पण जिल्हा परिषदेने केलेले ऋण विसरू शकणार नाही. मदत करताना सीईओ कुलदीप जंगम यांना भेटलेल्या आजीला तिच्या मागणीनुसार साडी मिळाली आहे. त्याचबरोबर सीईओ जंगम यांनी त्या आजी बरोबर साधलेला संवाद सोशल मीडिया मधून प्रचंड वेगाने व्हायरल होताच सामाजिक कार्यकर्त्या प्रांजली मोहीकर यांनीही त्या आजीची भेट घेऊन साडी देण्याची इच्छा व्यक्त केली.
मंद्रूपकर ठरले दानशूर..
सीनेच्या पुराने वांगी, वडकबाळ, अकोले मंद्रूप, तेलगाव, गावडेवाडी, होनमुर्गी, औराद परिसरातील पूरग्रस्तांना मंद्रूप नागरिकांनी मोठी मदत केली. सरपंच अनिता कोरे, माजी कृषी सभापती आप्पाराव कोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य गुरुसिद्ध म्हेत्रे, मळसिद्ध मुगळे, ग्रामसेवक नागेश जोडमोठे यांनी सुमारे दोन हजार लोकांच्या दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था केली. इतकेच नव्हे तर नदीपलीकडील लोकांना वाहन व बोटीद्वारे अन्न व पाणी पोहोचवले. हनुमाननगर व परिसरातील वस्त्यांवरून डबे पोहोचवण्यात आले. त्यामुळे मंद्रूपकरांचे ऋण पूरग्रस्त विसरणार नाही अशा प्रतिक्रिया पुरात बाधित झालेल्या लोकांनी व्यक्त केल्या. आपले शेजारी संकटात आहेत या जाणिवेतून मंद्रूपकरांनी केलेले मदत कोणीही विसरणार नाही. माणुसकीचे दर्शन घडविणाऱ्या या शेजारधर्माची आता जिल्ह्यात चर्चा सुरू झाली आहे.
ठळक मुद्दे
🔹सीईओ कुलदीप जंगम यांना भेटलेल्या आजीला तिच्या मागणीनुसार साडी मिळाली आहे. त्याचबरोबर सीईओ जंगम यांनी त्या आजीबरोबर साधलेला संवाद सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचंड वेगाने व्हायरल होताच सामाजिक कार्यकर्त्या प्रांजली मोहीकर यांनीही त्या आजीची भेट घेऊन साडी देण्याची इच्छा व्यक्त केली.
🔹सोलापुर जिल्हा परिषदेचे कर्मचारी व अधिकाऱ्यांनी केलेल्या आर्थिक मदतीतून जेवणानंतर आता पूरग्रस्तांना रेशनकिटची मदत करण्यात येत आहे
🔹सीईओ कुलदीप जंगम यांनी तत्परता दाखवत कर्मचाऱ्यांच्या मदतीतून पूरग्रस्तांना तातडीने जेवण व अन्नधान्याची व्यवस्था केली त्यांचे मिशनचे आता कौतुक होत आहे
सीनेच्या पुराने बाधित झालेल्यांचे दुःख व वेदना मी शब्दात मांडू शकत नाही. मी जे प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन पाहिले ते खूप वेदनादायी होते. मला जे शक्य होते ते मी करण्याचा प्रयत्न केला. लोकांचे झालेले नुकसान न भरून येणारे आहे.
कुलदीप जंगम,
मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद सोलापूर
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List