आश्रमशाळेतील वसतिगृहात राहणाऱ्या ७६ विद्यार्थ्यांना जेवणामधून विषबाधा...
आधुनिक केसरी न्यूज
डहाणू : डहाणू तालुक्यातील रणकोळ येथे माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्गांची शासकीय आश्रम शाळा आहे. या आश्रमशाळेतील वसतिगृहात राहणाऱ्या ७६ विद्यार्थ्यांना काल रात्री (दि.५) जेवणामधून विषबाधा झाली. विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांना उपचारासाठी ऐने प्राथमिक आरोग्य केंद्र, कासा उपजिल्हा रुग्णालय, वानगाव ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी उपचारासाठी दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
काल रात्री रानशेत शासकीय आश्रमशाळेमधील विद्यार्थ्यांना जेवण झाल्यानंतर मळमळ उलटीचा त्रास सुरू झाला. सुरुवातीला २८ विद्यार्थ्यांना त्रास सुरू झाल्याने उपचारासाठी त्यांना रात्री अडीच वाजता कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले . त्यानंतरही बाकीच्या विद्यार्थ्यांनाही मळमळ उलटी जुलाब असा त्रास सुरू झाल्याने वानगाव ग्रामीण रुग्णालयात १६ विद्यार्थ्यांना तर ऐने येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ३० विद्यार्थ्यांना उपचारासाठी दाखल केले. सर्व विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. विद्यार्थ्यांना रात्रीच्या जेवणातून विषबाधा झाली असल्याची शक्यता आहे. आरोग्य विभागाने रात्रीचे जेवण तसेच पाण्याचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले असून प्रयोगशाळेत पाठवले जाणार आहेत.
शासकीय आश्रम शाळा रानशेत येथील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून नेमकी विषबाधा कशामुळे झाली याचे कारण शोधण्यासाठी शाळेतील पिण्याचे पाणी तसेच रात्रीच्या जेवणाचे नमुने ताब्यात घेतले असून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत. : संदीप गाडेकर, आरोग्य अधिकारी डहाणू.
Comment List