डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठात गैरकारभार ; SIT मार्फत चौकशी करा
अतुल लोंढे यांची मागणी
आधुनिक केसरी न्यूज
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ लोणेरे या विद्यापीठाच्या परीक्षा आणि निकालामध्ये मोठ्या प्रमाणात अनिमियतता आणि गैरप्रकार झाल्याच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत. या गैरप्रकाराचा हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर विपरीत परिणाम होणार आहे. विद्यापीठाचे ईआरपी पोर्टल ४ महिन्यांपासून बंद आहे, विद्यार्थी या ग्रेड सिस्टममधील गुण ओळखू शकत नाहीत असे अनेक प्रकार विद्यापीठात होत असून विद्यार्थ्यांना त्याचा मोठा फटका बसत आहे. विद्यापीठातील या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.
यासंदर्भात बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, लोणेरे येथील हे विद्यापीठ गैरकारभार व गैरव्यवस्थापनामुळेच सातत्याने चर्चेत असते. 100 पेक्षा जास्त दिवस उलटूनही अंतिम वर्ष आणि पुरवणी परीक्षेचे निकाल पूर्णपणे जाहीर केलेले नाहीत. यामुळे विद्यार्थीमध्ये चिंता वाढली असून नैराश्य पसरले आहे. अनेक विद्यार्थ्यांच्या नोकऱ्याही गेल्या आहेत. विद्यार्थी दिलेल्या गुणांबाबत असमाधानी आहेत आणि विद्यापीठाने ज्या पद्धतीने पेपर तपासणी प्रक्रिया केली आहे त्यात गैरप्रकार झाल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषाच्या नावाने लोणेरे येथे हे तंत्रज्ञान विद्यापीठ सुरु करण्यात आले आहे परंतु गैरव्यवहाराने या विद्यापीठाच्या नावलौकिकाला काळिमा फासला जात आहे. राज्य सरकार तसेच महामहिम राज्यपाल यांनी या प्रकरणी लक्ष घालून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा व विद्यापीठातील कारभार सुधारावा, असेही अतुल लोंढे म्हणाले.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List