राजकीय कविता : डिनर डिप्लोमसी..!
आधुनिक केसरी
संजय जेवरीकर , पत्रकार
काका पुतण्याच्या जाहीर पत्राने
बारामती तापली आहे..
काय खरे,काय खोटे हे मात्र
त्या दोघांनाच माहीत आहे..
आजपर्यंत बारामतीच्या करामतीने
महाराष्ट्राचे राजकारण चालायचे..
पुतण्यानेच खंजीर खुपसल्याने
सांगा कोण कुणाला दोष द्यायचे..
घरे फोडण्यात पटाईत असलेल्या काकांवर
आज तरी फडणवीसांनी मात केली आहे..
काकाप्रेमींचा जळफळाट पाहून
महाराष्ट्र गालातल्या गालात हसतो आहे...
आपले घर फुटताना होणाऱ्या वेदना
काका कश्याबश्या झाकत आहेत..
डिनर डिप्लोमसीच्या नावाखाली
आवतनावर आवतण धाडत आहेत..
एक काळ असा होता की
काका बोलले की महाराष्ट्र डोलायचा ..
त्यांच्याच मनातले सगळे वाक्य
महाराष्ट्र बोलत राहायचा...
आज मात्र तुतारीच्या प्रमोशनसाठी
गड किल्ल्यावर जावे लागत आहे..
ज्यांच्यासाठी जेवणावळी उठायच्या
त्यांनाच आवतण पाठवावे लागत आहे..
घर फिरले की घराचे वासे फिरतात
सगळे हिशोब डोळ्यासमोर होत असतात..
खंजीर खुपसणारे खुपसून मोकळे होतात
मात्र बदनाम सारे दुसरेच होत असतात..
आपल्याकडे एक म्हण आहे
ज्याचे खावे मीठ,त्याचे काम करावे नीट..
राजकारणात चालतात डिनर डिप्लोमसी
महाराष्ट्राला आलाय कुटनीतीचा खरंच वीट..
तुमच्या राजकीय स्वार्थासाठी
महाराष्ट्र जातीपातित पुन्हा अडकतो आहे..
बस करा माणसात माणूस राहिला नाही
तुमच्या राजकारणामुळे जातीविद्वेष वाढतो आहे..!
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List