विज्ञानाचा आधार घेऊन अज्ञानाचा प्रचार..

विज्ञानाचा आधार घेऊन अज्ञानाचा प्रचार..

आधुनिक केसरी न्यूज 

भारताकडे सर्वकाही मुबलक प्रमाणात असूनही भारत मागे असण्याचे कारण म्हणजे देशात माणसा माणसात विषमता पाळून केलेला माणसाचाच द्वेष व स्वतःला शिक्षीत समजून ही प्रचंड  अंधविश्वास, पाखंड व भोंदूगिरी ला जोपासून त्याचा संबध थेट धर्माशी जोडून भावनिक होऊन अंधविश्वास पाखंड व भोंदुगीरी जोपासण्यासाठी सर्वतोपरी पणाला लावणे हेच कारणे आहेत.  विषमतेची घाण डोक्यात असल्याने गुणवत्ता, पात्रता यापेक्षा जातीला जास्त महत्त्व दिले जाते.
 याचे असंख्य उदाहरणे आपल्या देशात आजही ज्वलंत आहेत. वैयक्तिक प्रगती होत असताना देशात विज्ञानाचा आधार घेऊन अज्ञान व अंधविश्वास पसरवणाऱ्या लोकांची संख्या कमी नाही. शिक्षीत वर्गही अंधविश्वास, पाखंड व भोंदूगिरी मध्ये जास्त फसलेला असून अंधविश्वासाचा संबंध थेट धर्माशी जोडून स्वतः चे अज्ञान अजून मजबूत करतो. विज्ञानाच्या प्रगती मुळे मोबाईल हाती आला आणि या मोबाईल च्या माध्यमातून अंधविश्वास पाखंड यालाच खतपाणी घालणे सुरू केले. अमूक अमुक मँसेज एकवीस लोकांना फॉरवर्ड करा सांयकाळ पर्यंत चांगली बातमी ऐकायला मिळेल. अमुक अमुक जप करा, नाव उच्चारा अडचण दुर होईल. स्वतः ला शिक्षीत आणि गुणवान समजणाऱ्या लोकांनी असे केले तर अंगी गुणवत्ता आहे तरी कोणती हा प्रश्न सहज निर्माण होतो. भोंदूगिरी, जादुटोना यांच्या मार्फत अज्ञानाची जोपासना केली जाते आर्थिक, मानसिक, शारीरिक शोषण होते तरीही लोकांना ते हवे हवे वाटते. शिकलेल्या लोकांना सत्य कळत नसेल, तर्क करता येत नसेल तर त्या शिक्षणाचा व गुणवत्तेचा संबंध येतोच कुठे? महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले ज्यांनी आयुष्यभर एकाही व्यक्तीला न लुबाडता, किर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करताना एकही रुपया न घेता, कोणत्याही व्यक्तीला अंगारा, धागा दोरा न देता आणि अंगारा धागे दोरा याने आजार, समस्या दुर होतात असा कोणताही दावा न करतात येथे वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचे काम केले. डोक्यात अंधविश्वास व पाखंड, थोतांड जोपासणाऱ्या लोकांनी संताचे विचार वाचले तर नाही उलट संताना घरात सुद्धां आणले नाही. आजही अपवाद वगळता प्रत्येक घरात अंधविश्वास, पाखंड, थोतांड व भोंदूगिरी ला खतपाणी घालणाऱ्या अज्ञानाच्या अनेक गोष्टी मिळतील परंतू ज्यांनी डोक्यातील अज्ञान दुर करून अंधविश्वासाच्या चक्रातून बाहेर पडण्याची शिकवण दिली अशा वैज्ञानिक दृष्टिकोन असलेल्या संत महापुरुषांचे फोटो यांच्या घरात दिसत नाहीत. सार्वजनिक ठिकाणी अंधविश्वास, पाखंड आणि भोंदूगिरी सुरू असेल तर विज्ञानामुळे हाती आलेल्या मोबाईल च्या कँमेऱ्यातून अज्ञानाचा प्रचार केला जातो तेव्हा मात्र शिक्षणाचा अर्थच कळाला नाही याची खंत वाटून बौद्धिक पातळी सुधारली नाही याची काळजीही वाटते. कारण बौद्धिक पातळी सुधारली नाही तर अशा लोकांकडून चुकिच्या गोष्टी करून घेणे सोपे जाते. आणि आज तेच होत आहे. शिकलेल्या लोकांकडून चुकिच्या गोष्टी करून घेऊन अडाणी भोंदु बुवा ने लुबाडल्याचे समोर आले. अर्थात अडाणी भोंदू करून पुजा हवन करण्यासाठी त्याला लाखो रुपये द्यायचे याला अज्ञान नाही तर बौद्धिक गुलामी म्हणतात. जर पुजा होम हवन करून घरात सुख शांती समृद्धी येत असेल तर पुजा करणारा पैसे घेऊन पुजा का करतो? त्याच पुजा हवन मधून त्याला ही सर्व काही मिळायला पाहिजे ना? अंधविश्वासाचा संबंध धर्माशी जोडून अंधविश्वासाला चिकटून बसतात. आणि अंधविश्वास, पाखंड भोंदूगिरी वर बोलले की यांना धर्म विरोधी वाटतात. अनेक भोंदु लोकांनी अंधविश्वास पसरवून लोकांचा पैसा, बायका लुटून अत्याचार केले तरीही लोक त्यांना दैव पुरुष,  देवाचा अवतार, देवाची कृपा मानतात. या सर्व अंधविश्वास थोतांड, भोंदुगीरीचा संबंध धर्माशी जोडून त्याचे जतन करण्यात धन्यता मानणाऱ्यांनी धन्यता मानावी यामध्ये काहीही शंका नाही. परंतु धर्माच्या नावाखाली पोसली गेलेला अंधविश्वास, पाखंड, थोतांड हे धर्मापुरतेच मर्यादित ठेवावे त्याला सार्वजनिक करू नये. सार्वजनिक केले तर प्रश्न उपस्थित होणारच. सार्वजनिक म्हणजे काय तर जसे देशाचे संरक्षण करण्यासाठी राफेल हजारो करोडो रुपये खर्च करून विकत घेतले. आणि राफेल ची पुजा करून त्याला निंबु मिरची बांधण्यात आली. आता निंबु मिरची बांधून नेमकं काय साध्य करायचे हा प्रश्न तर उठणारच ना? राफेल कोणाच्या वैयक्तिक मालकीचे, वैयक्तिक धर्माचे आहे का? मग तेथे अंधविश्वास व पाखंड कसा पसरवला जातो? देशाच्या संसद भवनाचे उद्घाटन करताना होम हवन करण्या मागचा काय उद्देश? काय साध्य झाले? सध्या चा ज्वलंत मुद्दा तो म्हणजे जागतिक क्रिकेट चषक स्पर्धेमध्ये बीसीसीआयचे प्रतिनिधित्व करणाऱ्या टिम जिंकण्यासाठी देशात अनेक ठिकाणी होम हवन करण्यात आले, अनेकांनी भविष्य वाणी केली आहे बिसीसीआय टीम जिंकेल असे भाकीत वर्तवले गेले. ह्या गोष्टी विज्ञानाच्या प्रगती मुळे तयार झालेल्या कँमेरा, सँटेलाईट च्या माध्यमातून टीव्ही, व सोशल मिडियावर मोठ्या उत्साहाने शेअर करण्यात आले. परंतु टीम हरली. होम हवन करून ही टीम हरत असेल तर होम हवन पुजा करून काय फायदा? पुजा होम हवन करून जर पाहिजे ते मिळत असेल तर मेहनत कशाला करायची हा प्रश्न साहजिकच उभा राहतो. परंतु विज्ञानाच्या माध्यमातून तंत्रज्ञानाचा वापर अज्ञानाचा प्रचार करण्यासाठी केला जातो आणि बहुसंख्य लोक त्यावर विश्वास ठेवतात तेव्हा कळते देशात बहुतांश गुणवत्ता कोणती आहे? विज्ञानामुळे हातात कँमेरा, माईक असणाऱ्या एकाही पत्रकाराने एकही प्रश्न विचारला नाही की होम हवन पूजा भविष्य वाणी करूनही जर बीसीसीआय ची टीम हरलीच तर हे सर्व अंधविश्वास व पाखंडाचा भाग आहे असे म्हणावे का? पुजा होम हवन करून जर कप किंवा यश मिळाले असते तर भारतात सर्वच कप आणि सर्वच यश असते. असा एकही प्रश्न कोणी विचारला नाही. यालाच माणसिक गुलामी म्हणतात. देशात अंधविश्वास पाखंड थोतांड व भोंदूगिरी यावर जास्त विश्वास ठेवून ते पैसा कमवण्याचे माध्यम असल्याने देशात पाखंड पसरवणाऱ्या भोंदुची संख्या जास्त आहे. जगाच्या पाठीवर सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या देशात आणि अनेक दैवशक्ती, देवाचे दुत, चमत्कार असलेल्या देशात विज्ञानाच्या जोरावर किती जगविख्यात शास्त्रज्ञ झाले? अज्ञान परसवणारे भोंदु हजारो करोडेचे मालक झाले,. परंतु चंद्रयान बनवणारे शास्त्रज्ञ उपाशी आहेत. त्यांना पगारही नाही मिळाला. हि वस्तू स्थिती आहे. आपण वापरत असलेल्या मोबाईल, टीव्ही, रेडिओ, घड्याळ फँन, फ्रीज, मोटारसायकल, कार, एसी, विद्युत, बल्ब, लँपटॉप, संगणक यापैकी किती उपकरणाचा शोध भारतीय लोकांनी लावला? इतरांनी विज्ञानाची केलेली प्रगती आपण पैसे देऊन खरेदी करतो आणि त्यावरही अज्ञानच पसरवतो म्हणजे आपण कीती विद्वान आहोत? भारतात जसे भोंदू, होम हवन, चमत्कार, पाखंड आहे तसे इतर कोणकोणत्या देशात आहे? पण भोंदुगीरी, पाखंड, अंधविश्वासावर देशात धंदा सुरू आहे, आणि हा धंदा दिर्घकाळ सुरू राहण्यासाठी धंदा चावलणारे मालक अंधविश्वास पाखंड भोंदुगीरीला मजबूत करत आहेत. आणि बौद्धिक विकास न झालेले लोक लवकर आकर्षित होऊन फसत आहेत. अज्ञान आणि अंधविश्वास जोपासल्या मुळे आपण वैज्ञानिक क्षेत्रात पाहिजे तसी प्रगती करू शकलो नाही. आणि आजही आपण बाहेरच्या प्रगत राष्ट्राकडून आदर्श घेऊन जागृत होत नाही तर देशातील भोंदु अडाणी जो शिकलेल्या लोकांना अज्ञानाचा आधार घेऊन लुबाडतो अशा लोकांकडे जाऊन जिवनात सुख, यश, अपत्य प्राप्ती साठी याचना करतो. आणि हे सर्व विज्ञानाच्या मोबाईल मध्ये बंध करून आपले अज्ञान दाखवण्यासाठी विज्ञानामुळे तयार झालेल्या सोशल मिडियावर शेअर करतो. म्हणून देश वैज्ञानिक दृष्टीने मागास तर आहेच पण वैज्ञानिक दृष्टिकोन न स्विकारल्याने बौद्धिक दृष्टीने ही मागास आहे. डोक्यात अंधविश्वास, पाखंड भोंदुगीरी जोपासणारे आणि विज्ञान व सत्य नाकारणारे लोक कोणत्या बाबतीत बुद्धीजीवी, हुशार व गुणवंत होतील हा संशोधनाचा विषय असेल.

--विनोद सदावर्ते

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

... मग राज्य शिक्षण मंडळ बंद करणार का? ... मग राज्य शिक्षण मंडळ बंद करणार का?
आधुनिक केसरी मुंबई  : राज्य सरकार राज्यातील शाळेमध्ये सीबीएसई सुरु करणार आहे मग राज्य शिक्षण मंडळ बंद करणार का? मराठी...
वारकरी परतीच्या प्रवासात ...सकाळीच कालावाटुन केली षष्ठीची सांगता
पिंपरी-चिंचवड शहर पोलिस आयुक्तालयासाठी १५ एकर भूसंपादनाचा शासननिर्णय
तंत्रज्ञानामुळे मानसिक तणाव वाढला : प्रा.डाॅ.सुरेश मोनी
शेतकऱ्यांना सरकार घाबरले ;पोलिसांनी दंडुक्याच्या बळावर संवैधानिक आंदोलन चिरडले 
जय हो....बिल गेट्स यांच्याकडून छत्रपती संभाजीनगरच्या नियो फार्मटेकच्या नाविन्यपूर्ण स्प्रेअर्सची दखल
उष्माघाताच्या लाटेपासून स्वत:चे संरक्षण करा : जिल्हाधिका-यांचे नागरिकांना आवाहन