विद्रोहाचा ज्वालामुखी : पद्मश्री नामदेव ढसाळ
पद्मश्री नामदेव ढसाळ यांनी १९७२ च्या काळामध्ये भारताच्या सामाजिक, राजकिय व साहित्य या महत्वपूर्ण क्षेत्रांमध्ये पदार्पण केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर नितांत श्रद्धा असलेले प्रखर आंबेडकरवादी पद्मश्री नामदेव ढसाळ हे जागतिक व सामाजिक दर्जाचे मराठी विद्रोही साहित्य परंपरेतील एक क्रांतीकारी कवी व विद्रोही लेखक म्हणून ओळखण्यात येतात. दलित व दुर्बल, शोषीत, पिडीत घटकांवर होणाऱ्या अन्याया बद्दल… Continue reading विद्रोहाचा ज्वालामुखी : पद्मश्री नामदेव ढसाळ
पद्मश्री नामदेव ढसाळ यांनी १९७२ च्या काळामध्ये भारताच्या सामाजिक, राजकिय व साहित्य या महत्वपूर्ण क्षेत्रांमध्ये पदार्पण केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर नितांत श्रद्धा असलेले प्रखर आंबेडकरवादी पद्मश्री नामदेव ढसाळ हे जागतिक व सामाजिक दर्जाचे मराठी विद्रोही साहित्य परंपरेतील एक क्रांतीकारी कवी व विद्रोही लेखक म्हणून ओळखण्यात येतात. दलित व दुर्बल, शोषीत, पिडीत घटकांवर होणाऱ्या अन्याया बद्दल त्यांना तीव्र चीड होती. दलितांवरील वाढत्या अन्याय-अत्याचाराचा प्रतिकार करण्यासाठी त्यांनी दलित पँथरची ९ जुलै १९७२ रोजी स्थापना करून अनेक तरुणांना संघटीत केले, व त्या माध्यमातून अन्याय विरुद्ध लढा दिला. त्यांच्या लेखन शैलीने भारतीय साहित्याला संपुर्ण बदलून परिवर्तीत केले. कारण जन्माला आल्यापासून त्यांना दु:खांनी घेरले होते. जात वास्तवाच्या जहराने त्यांना मोकळा श्वास घेवू दिला नाही आणि त्यांना मानसिक स्वस्थता लाभू दिली नाही. पद्मश्री ढसाळांचे आयुष्य असे जंगला सारखे पेटत होते आणि हे आयुष्य मराठी साहित्यात आपले उग्ररुप घेतले. एकुणच त्यांनी भारतातील साहित्याला परिवर्तीत केले. आपल्या लेखनशैलीने व्यवस्थेविरुद्ध बंड केले; समाजाप्रती असलेली आत्मीयता व न्यायाच्या बाजूने दिलेला लढा हे त्यांच्या लेखनशैलीचे वैशिष्ट्ये होते. ते मराठी साहित्याचे विद्रोही लेखक व कवी तसेच आक्रमक पँथर म्हणून ओळखण्यात येतात. कारण संत चोखामेळा, संत तुकाराम यांच्या विद्रोहाचे हत्यार घेऊन उतरणारा विसाव्या शतकातील एक विद्रोही कवी, साहित्यिक म्हणून गणला जातो. त्यांचे लिखाण हे मानवकेंद्रीत होते. त्यांनी भारतीय मानसिकतेची भेदनिती तंतोतंत ओळखली होती आणि ते त्यावर तुटून पडले होते. त्यांच्या कविता व साहित्य कल्पना विश्वात न अडकता वास्तवदर्शी असल्याने त्यांच्या सहित्याची जगाने दखल घेतली व ढसाळांच्या बंडखोरीने साहित्य विश्वाला एक वेगळीच दिशा दिली त्यांच्या जीवनातील अनुभवाने त्यांनी या समाजाची व व्यवस्थेत असलेली विषमता उघड केली त्यांच्या साहित्याने एक व्यवस्थे विषयी असलेला रोष प्रकट केला त्यांच्या कवितांनी प्रत्येक माणसाला एक विचार करावयास भाग पाडले, सामान्य माणसाच्या वेदनेचे साहित्य प्रकट करत असताना त्यांनी अनुभव मांडला त्यांचे साहित्य हे कल्पना विश्वात रमणारे नव्हते त्यांचे साहित्य सामन्याच्या वेदना प्रकट करणारे होते त्यांच्या साहित्याने जगाला भुरळ घातली त्यांच्या कविता व साहित्यातून प्रखर आंबेडकरवाद दिसून येतो, सर्व सामान्यांच्या आयुष्याला बदलवून टाकण्याची भाषा त्यांच्या साहित्यातून दिसून येते त्यांच्या आयुष्यात बुध्दाच्या अहिंसेचे आत्यंतिक महत्व होते परंतु ती अहिंसा दुबळ्या लोकावर दबाव तंत्र वापर करणाऱ्याच्या विरोधात होती व त्यांच्या कविता व साहित्य जागतिक वाङ्मयापर्यंत पोहोचले म्हणून त्यांच्या साहित्यकृतीसाठी अनेक पुरस्कार प्रदान देण्यात आले. पद्मश्री नामदेव ढसाळ यांची साहित्य संपदा व लेखन कार्य हे अत्यंत महत्वपुर्ण असे आहे.


” एक ज्वालामुखीची जन्मकथा “
” गोलपिठा ” (जून १९७२) – गोलपिठातून पद्मश्री नामदेव ढसाळांनी शोषित पिडीत स्त्रीयांची व्यथा जगापुढे मांडली. या काव्यसंग्रहाने मराठी साहित्याची दिशाच बदलवून टाकली.
” मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलविले ” (१९७५) – या संग्रहात त्यांनी स्पष्ट केलेली जाती व्यवस्थे बद्दलची भूमिका लक्षणीय म्हणावी लागेल.
” आमच्या इतिहासातील अपरिहार्य पात्र – प्रियदर्शिनी ” (२५ ऑगस्ट १९७६) – या मध्ये त्यांनी इंदिरा गांधी वर लिहिलेली दिर्घ कविता : आहे. बँकांचे राष्ट्रीयकरण, संस्थानिकांचे सामान्यीकरण अशा एका मागोमाग एक घेतलेल्या निर्णयाने समाजवादाकडे वाटचाल करणाऱ्या, पुर्व पाकिस्तानातल्या अन्यायाला विश्वभर वाचा फोडत लीलया युद्धं जिंकणार्या व्यक्तीमत्वाशी झालेली एकात्मता या दीर्घ काव्यात प्रकट झाली आहे.
” तुही यत्ता कंची? तुही यत्ता ” (१९८१) – हा पद्मश्री नामदेव ढसाळ यांचा नवा चौथा काव्यसंग्राह ५१ कवितांच्या ह्या संग्रहात ढसाळांच्या सर्वगामी प्रवासाचे विविध समृद्ध रंग प्रकट झाले आहेत. स्वत:च्या अनोख्या ढंगाने आणि शैलीने उपरोक्त संग्रह संस्मरणीय असाच झाला आहे. (तुही यत्ता कंची? तुही यत्ता – पान क्र.७)
” खेळ ” (१९८३) – यामध्ये हा सर्वात ‘हटके’ काव्यसंग्रह आहे आणि हा पद्मश्री ढसाळांने ‘समस्त स्त्रीपुरुषांच्या कामविलासां’ ना अर्पण केलाय! कवितेला न पद्मश्री ढसाळांना कुठला विषय वर्ज्य नव्हताच! यातील प्रतिमाशैली वेगळी दिसते व अत्यंत तरल आणि कल्पनेहून भिन्न अशा प्रतिमा आणि त्यासाठी कवितेमध्ये एक कुसुमाग्रज वगळता अत्यंत वाईट रोमँटिसिझमचा भ्रष्ट अवतार होता त्यालाही प्रथमच पद्मश्री ढसाळांनी उडवून लावला ही या कविता संग्रहातील वेगळी बाब कुणाही समीक्षकानं लक्षात घेतली नाही हे खेदजनकच, रोमँटिसिझम मॅच्युअर्ड आणि एक मुग्ध बाजातली कविता या कवितासंग्रहात प्रथम दिसून आली. (समग्र नामदेव ढसाळ भाग-१ पान क्र.१२)
” गांडू बगीचा ” (१९८७) – यातील प्रतिमा – शैली कमालचे वेगळे पण सिद्ध करते. पद्मश्री नामदेव ढसाळ यांची ही जी काही तडफड आहे ही
ढसाळांच्या कवितेत शोषित समाजाची गर्जना होती, आक्रोश होता व तो आक्रोश असह्यतेकडे न जाता एक निश्चीत पर्यायकडे, एका उत्तराकडे जाणारा दिसतो. (समग्र नामदेव ढसाळ भाग-१ पान क्र.१३)
” या सत्तेत जीव रमत नाही ” (६ डिसेंबर १९९५) – हा अगदी वेगळ्या धाटणीचा संग्रह आहे. मानवाच्या एकूण अस्तित्वाचा विचार या कवितांत अभिव्यक्त झाला आहे. मानवी जीवनातील अटळ वेदनाभोगाचा ते तळस्पर्शी विचार करीत असल्याचे जाणवते, डॉ. बाबासाहेब आंबेडकरा बद्दल असलेले निस्सिम प्रेम या शब्दातून प्रकट करतात.
” डॉ. आंबेडकरांना
आज आमचे जे काही आहे
ते सर्व तुझेच आहे
हे जगणे आणि मरणे
हे शब्द आणि ही जीभ
हे सुख आणि दु:ख
हे स्वप्न आणि वास्तव
ही भूक आणि तहान
सर्व पुण्याई तुझीच आहे “
अशा शब्दातून डॉ.बाबासाहेब आंबेडकरावरील अपार निष्ठा दिसून येते.
” मी मारले सूर्याच्या रथाचे सात घोडे ” (१५ फेब्रुवारी २००५) – पद्मश्री नामदेव ढसाळांनी सत्य परिस्थितीवर आपल्या लेखणीतून आसूड ओढले आहेत. त्यांचे शब्दही थेट ह्रदयात घाव घालतात.
” निर्वाण अगोदरची पीडा ” (१४ एप्रिल २०१०) या संग्रहात त्यांचे मन विश्वचिंतेने संपुर्णपणे ग्रासलेले दिसते. काय जणू काही विश्व नाशाकडे जात असल्याची प्रचिती या संग्रहातील कवितांतून येते. नव्या काव्यप्रवाहातील याच्या त्या आशयाच्या सर्व चौकटींतून मुक्त होऊन विश्वमानवाचाच ते विचार करीत असल्याची प्रचिती येते.
” नवीन अप्रकाशित कविता ” – (यात एकूण ४४ कविता आहेत) पद्मश्री नामदेव ढसाळांना आजार बळवला असतानाही लिहिलेल्या काही अप्रकाशित कविता आहे.
” हाडकी हाडवळा ” (कादंबरी १९८१) – ‘हाडकी हाडवळा’ म्हणजे महारांनी मिळालेली सामुहिक इनामी जमीन. या इनामांची मुळे थेट निजामशाहीच्या अमलापर्यंत पोहोचतात. हाडकी हाडवळा या शिर्षकाखाली हे जे लेखन आता ग्रथंरुपाने प्रसिद्ध आहे. त्याची जात ‘ऑटो नॉव्हेल’ या नव्याने रुढ होत चाललेल्या लेखनप्रकाराशी मिळती जुळती आहे. या लेखनातील कालखंड ढसाळांच्या लहानपणाशी निगडीत आहे. पद्मश्री ढसाळांच्या आयुष्यातील या महत्त्वाच्या कालखंडात त्यांच्याभोवती वावरणाऱ्या महार कुटुंबातील आणि महारांशी संबंधीत अशा अन्य जातींमधील स्त्री-पुरूषांचे, त्यांच्या रागा-लोभाचे, विकार-विकासाचे, द्वेष-जिव्हाळ्याचे, त्यांच्यातील मनमेळाचे आणि प्रसंगी अंतर्विरोधाचेही प्रत्यक्ष चित्रण म्हणजे हे लेखन. (समग्र नामदेव ढसाळ भाग – १ पान क्र.५२९)
” निगेटिव्ह स्पेस ” (कादंबरी १९८७) – यामध्ये पद्मश्री नामदेव ढसाळ यांनी त्यांच्या शहराचे मांडलेले प्रत्यक्ष चित्रण म्हणजे हे लेखन होय.
” माझं शापित बालपण ” – आत्मकथनामध्ये दारिद्र व दैन्यवस्था मांडली आहे.
” तुझे बोट धरुन चाललो आहे ” – या संग्रहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयीचा श्रद्धाभाव, आदर व आदर्श वेगवेगळ्या पद्धतीने अभिव्यक्त झालेला आहे. विभिन्न काळात लिहिलेल्या कवितांत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या प्रेरणा त्यामुळे संघर्षशील झालेल्या मनाला, कवीचे त्यांच्याशी असणारे आंतरिक नाते, त्यांच्याविषयी वाटणारी अपार कृतज्ञता ह्यांचे या तून दर्शन घडते.
” आंधळे शतक ” (१९९५) – ही दोन्ही पुस्तके (आंधळे शतक व सर्व काही समष्टीसाठी) वर्तमानपत्रातील सदर लेखनाचा भाग आहे. ही ललित लेखा बरोबरच वैचारिक लेखांचा हा संग्रह आहे. आपल्या चिंतनशील ललित गद्याद्वारे ढसाळांनी मराठी ललित गद्यामध्ये वस्तूत: स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे; पण त्याची पुरेशी दखल घेतली गेली नाही. या दोन्ही पुस्तकातील काही वैचारिक लेखन विविध सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक वाङ्मयीन विषयांना आपल्या स्वतंत्र दृष्टीतून भिडणारे आहेत. परंतू त्यामध्ये विषयनिष्ठा याबरोबरच आत्मनिष्ठही डोकावते. मग विषय वास्तवाची वस्तूनिष्ठ तर्कनिष्ठ मांडणी जी वैचारिक लेखनात अभिप्रेत असते. त्या अपेक्षांना ते लेख छेद देताना दिसतात. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे हे सर्वच लेख स्फुट लेखांच्या स्वरुपातील आहेत. त्यामुळे संगतवार सुसूत्र एखाद्या विषयाची मांडणी त्यांनी अपवादानेच केली आहे. म्हणून या सर्व विस्कळीत पसाऱ्यातून हे सर्व चिंतन निवडून त्यांची मांडणी करावी लागते. या मध्ये ” पद्मश्री ढसाळांनी शिवसेना आणि त्यांचे हिन्दुत्व शिवशाही आणि शिवाजीचे केलेले उपयोजन यावर टिका केली. शिवसेनेची धोरणे ही जमातवाद, मुस्लिमद्वेष, प्रांतवाद, भाषावादावर अधिष्ठित असल्याने ते एक प्रकारे शिवशाहीचे विडंबन आहे असे म्हणतात. पण पुढे ‘सर्व काही समष्टीसाठी’ या लेखन संग्रहात ही भूमिका बदलली असून तिथे मात्र शिवसेनेचे समर्थन केलेले आढळते. (नामदेव ढसाळ यांचे चिंतन पान-क्र.१८, लेखक- डॉ.निळकंठ शेरे “) (सर्व काही समष्टीसाठी-भाग १ व भाग २)
” आंबेडकरी चळवळ आणि सोशालिस्ट , कम्युनिस्ट ” (१९९४) – या पुस्तकापासून पद्मश्री ढसाळांची, डाव्या तथा कम्युनिस्टांच्या व्यवहारावरील टिका तीव्र झालेली आहे. ही मार्क्सवादी विचारांपेक्षा कम्युनिस्ट नेतृत्व, कार्यकर्ते आणि कार्यक्रमावरील टीका आहे. कम्युनिस्टांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील टीकेचा प्रतिवाद करणारी आहे. या पुस्तकेमधून वैचारिक, तात्विक चर्चा करणारे, भूमिका मांडणारे पद्मश्री ढसाळ दिसतात. ( नामदेव ढसाळ यांचे चिंतन पान क्र.१४, लेखक – डॉ. निळकंठ शेरे)
” सर्व काही समष्टीसाठी ” भाग १ (२००१ पासून सामना दैनिकात स्तंभलेखन सलग दहा वर्ष केले, नंतर पुढे पुस्तक रुपान परममित्र प्रकाशन २००५ मध्ये प्रकाशित केले.)
” सर्व काही समष्टीसाठी ” भाग २
” निवडक लेख जानेवारी ते नोव्हेंबर ” – २०१२
” चिंध्यांची देवी आणि इतर कविता ” – मार्च २०१२
” मुक्त संवाद ” (मुलाखत अनुष्टुभ दिवाळी)
” माझी सिमाँ द बूव्हॉ!- प्रहार दै.२०११ जानेवारी
” बुद्धधर्म : काही शेष प्रश्न “
” दलित पँथर एक संघर्ष ” ( १ मे २०१४) – मृत्यूशय्येवर लिहिलेला अखेरचा दस्तऐवज ही त्यांची साहित्यसंपदा होय व त्यांच्या साहित्य संपदेसाठी खालील पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आले.
- महाराष्ट्र राज्य पुरस्कार गोलपिठा – १९७२, सोव्हिएत लँड नेहरु पुरस्कार १९७५-७६, महाराष्ट्र राज्य कवी केशवसुत पुरस्कार – १९८३, पद्मश्री पुरस्कार – १९९९, बहिणाबाई चौधरी पुरस्कार, पद्मश्री सहकार महर्षी विखे पाटील साहित्य पुरस्कार, साहित्य अकादमी सुवर्ण जयंती जीवन गौरव पुरस्कार – २००५, गंगाधर गाडगीळ साहित्य पुरस्कार – २००६, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार, बुद्ध रोहिदास विचार गौरव इ.स.२००९, मारवाडी फाउंडेशन डॉ.आंबेडकर पुरस्कार – २०१०, पुणे विद्यापीठ जीवनसाधना गौरव पुरस्कार – २०१०, भारतीय विद्यापीठ जीवनगौरव पुरस्कार – २०११ ने पद्मश्री नामदेव ढसाळांना सन्मानित करण्यात आले होते.
अशा प्रकारे त्यांचे साहित्य वृत्तीत वेदना, विद्रोह आणि व्यवस्थेविरुद्ध नकार दिसतो. भारतातील प्रस्थापित पांढरपेशे लेखक आणि रसिक यांना आपल्या अनोख्या शैलीने हादरा देणारे साहित्यिक व विद्रोहाचा ज्वालामुखी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या साहित्य कृतीस आणि त्यांच्या समतेच्या विचारास व त्यांच्या त्र्याहत्तर व्या जयंतीदिनानिमीत्त विनम्र अभिवादन ! - अमरदिप रमाबाई हिवराळे
मो.९९२३८३७०६०
(संशोधक, एम.फिल जनसंवाद व वृत्तपत्र विद्या विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद)
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List