छत्रपती शिवाजी महाराज; भारतीय स्वातंत्र्याची प्रेरणा
शिवराज्याभिषेक दिन विशेष
आधुनिक केसरी
- प्रा.बाळासाहेब बोराडे
शहाजीराजांनी स्वराज्याच स्वप्न पाहिलं,राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊंनी त्यास आकार दिला.आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे स्वप्न सत्यात उतरवलं. रयतेच सार्वभौम स्वराज्य निर्माण झालं. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीतील तरुणांना सोबत घेऊन स्वराज्याची संघटनात्मक बांधणी केली.सह्याद्रीच्या कुशीतील इवलसं स्वराज्य अटकपासून तर कटकपर्यंत विस्तारत गेलं.संपूर्ण भारत स्वराज्याच्या छत्रछायेखाली आला.स्वराज्याचे भगवे निशाण अभिमानाने फडकू लागले. दिल्लीची मान शेरमेन झुकली.जिजाऊंची दूरदृष्टी, शिवरायांचे अथक प्रयत्न आणि मावळ्यांच्या बलिदानातून स्वराज्य साकारलं.मराठा पातशहा छत्रपती बनला.ही बाब सामान्य नव्हती.परकीयांच्याअन्याय,अत्याचार आणि शोषणातून प्रजा मुक्त झाली.लोककल्याणकारी स्वराज्य जगाला कळावे म्हणून ६ जून १६७४ रोजी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा थाटामाटात संपन्न झाला.छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्यातून भारतीयांना स्वातंत्र्याची प्रेरणा मिळाली.
--------------------------------------------------------------
शिवजन्मापूर्वी देशात अन्याय,अत्याचाराने थैमान घातले होते.मानवीमूल्य पायदळी तुडवली जात होती. कायदा व सुव्यवस्थेचा केव्हाच मुडदा पडला होता. प्रजा भयभीत होती.शेतकरीराजा अस्मानी आणि सुलतानी संकटांमुळे उध्वस्त झाला होता.अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आली होती.रयत आत्मविश्वास गमावून बसली होती. महिलांची अब्रू लुटली जात असे.लाचारीचे जीवन जगावे लागत होते.जीवन अस्थिर होते. सर्वत्र काळोख पसरला होता. अशा बिकट परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने एक तेजस्वी सूर्य उगवला. रयतेला आशेचे किरण दिसला. शिवरायांनी मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्याची पताका अटकेपार फडकवली.६ जून १६७४ ला रायगडावर शिवराज्याभिषेक झाला.स्वातंत्र्य, समता,आणि बंधुत्वाच्या आधारावर सार्वभौम स्वराज्याची निर्मिती झाली. मराठा पातशहा छत्रपती बनला.जगभरातील विविध देशांचे प्रतिनिधी रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी आले होते.भारतीयांसाठी ही बाब गौरवपूर्ण ठरली.
भारतीय युवकांचे प्रेरणास्थान महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस शिवरायांना आदर्श मानत.मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन परकीय सत्तविरुद्ध शिवरायांनी बंड पुकारले होते.त्याप्रमाणे आझाद हिंद फौजच्या माध्यमातून नेताजींनी इंग्रजांना हादरे दिले.नेताजींनी शिवरायांची युद्धनीती अभ्यासली होती. शिवरायांच्या कार्यातून मातृभूमीसाठी समर्पणाची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली.बंगालमधील अनेक विचारवंतांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र लिहिल्याचे दिसून येते.रवींद्रनाथ टागोरांना 'स्वातंत्र्य आणि स्वदेशी'चळवळीची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यातून मिळाली.त्यांनी 'शिवाजी उत्सव','प्रतिनिधी' या कवितेतून शिवरायांचा गौरव केला आहे.
थोर क्रांतिकारक शहीद भगतसिंग,सुखदेव,राजगुरू, चंद्रशेखर आझाद यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरणास्थानी मानले होते.शहीद भगतसिंग यांनी शिवरायांचे चरित्र वाचले आणि कृतीतून आचरणात आणले. शिवरायांची शिवनीती जाणून घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांनी बादशहाच्या हातावर तुरी देऊन आग्रा येथून सुखरूप सुटका करून घेतली त्याचप्रमाणे वेषांतर करुन शहीद भगतसिंग,सुखदेव,राजगुरू,चंद्रशेखर आझाद हे इंग्रज पोलिसांना चकमा देऊन पसार झाले होते.फासावर जाताना शहीद भगतसिंगांनी'जिस चोले को पहने शिवाजी खेले अपनी जान से' हे देशभक्तीपर गीत म्हणत हसत हसत फासावर गेले.ही प्रेरणा त्यांना शिवरायांच्या जीवनातून मिळाली.स्वातंत्र्य लढ्यातील जहालवादी विचारक लाला लजपतराय यांनीदेखील शिवरायांच्या कार्याची प्रेरणा घेऊन उर्दू व पंजाबी भाषेत शिवाजी महाराजांचे चरित्र लिहिले आहे.
छत्रपती शाहू महाराज थोर समाजसुधारक होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा व विचारांचा वारसा त्यांनी चालवला.शिवरायांना अभिप्रेत असलेले राज्य शाहू महाराजांनी निर्माण केले.एकदा शाहू महाराज नाटक पहाण्यासाठी गेले असता त्या नाटकात एका मुलाने बाल शिवाजीची भूमिका केली होती.बाल शिवाजीचे नाट्यमंचावर आगमन होताच शाहू महाराज ताडकन उभे राहून बाल शिवाजीला वाकून मुजरा केला.यावरून छत्रपती शाहूंना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल किती आदर होता हे लक्षात येते.
थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिवरायांच्या समाधीचा शोध लावून जीर्णोद्धार केला. शिवजयंती साजरी केली.शिवरायांच्या कार्यावर आधारित पुस्तकही लिहिले. एक हजार ओळीचा दीर्घ पोवाडा रचला. शिवरायांना त्यांनी 'कुळवाडी भूषण' ही उपाधी दिली. त्यांच्यामते छत्रपती शिवाजी महाराज इतके महान आहेत की त्यांची तुलना इतरांशी होऊच शकत नाही.महात्मा फुले यांच्यावर शिवरायांच्या विचारांचा फार मोठा प्रभाव होता.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पत्राची सुरुवात 'जय शिवराय' या नावाने करत असत.मुंबई येथील शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष स्थानही त्यांनी भूषविले होते.डॉ. आंबेडकर म्हणतात मला राज्यघटना लिहितांना कोणती चिंता वाटली नाही कारण शिवरायांनी उभे केलेले स्वराज्य माझ्या डोळ्यासमोर होते.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातही शिवरायांना आदरयुक्त स्थान दिले आहे. 'निवडणूका'या प्रकरणाच्या सुरवातीस शिवरायांचा फोटो आणि पाठीमागे दिल्लीचा लाल किल्ला दाखवला आहे. स्वतंत्र भारताचा राज्यकारभार छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी चालावा हा त्यामागचा हेतू होता.
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी विद्यार्थीदशेत असताना शिवरायांच्या जीवनावर आरती लिहिली.क्रांतिकार्य आणि सामाजिक समता हे विचार त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातून घेतल्याचे दिसून येते.लोकमान्य टिळकांनीही दैनिक 'मराठा'मधून छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय थोर पुरुष नाहीत का?या मथळ्याखाली लेख लिहिला होता.त्यांच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय इतिहासातील थोर पुरुष आहेत.शिवरायांच्या स्वराज्य या संकल्पनेतूनच टिळकांनी 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच' असा नारा दिला होता.
शाहीर अमर शेख यांनी शिवरायांच्या जीवनावर पोवाडा रचला.शिवरायांच्या कर्तबगारीची वर्णन त्यांनी पोवाड्यातून केले आहे.साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांनीही पोवाड्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती सातासमुद्रापार पोहोचविली.अण्णा भाऊ साठे रशियन भ्रमंतीवर असतांना रशियातील लेनिन चौकात राष्ट्राध्यक्षांसमोर पोवाडा सादर करून मराठीबाणा दाखवून दिला.रशियन भाषेत 'छत्रपती शिवाजी महाराज की जय'अशी घोषणा दिली.अण्णा भाऊ साठे सारख्या मावळ्यानी रशियन लोकांना शिवरायांच्या कार्याची जाणीव करून दिली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले. शिवरायांचे तपस्वी कार्य भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी प्रेरणादायी ठरले.शिवरायांच्या विचारांचे अवलोकन भारतीय विचारवंतांनी केले.आधुनिक भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात इंग्रजांना हाकलून लावण्यासाठी क्रांतिकारक,विचारवंत,समाजसुधारकांनी शिवरायांचे बुद्धिचातुर्य व युद्धनीतीचा अवलंब केला.त्यामुळे शिवरायांचे महानकार्य राष्ट्रीय लढ्यातील प्रेरणाचे प्रतीक बनले होते.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List