जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने फेसबुकवर बनावट प्रोफाइल; नागरिकांना आर्थिक व्यवहारासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न, सायबर तपास सुरू
आधुनिक केसरी न्यूज
चंद्रकांत पतरंगे
गडचिरोली : जिल्ह्यात सायबर गुन्हेगारांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करत फसवणुकीचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या नावाने फेसबुकवर बनावट खाते तयार करून नागरिकांना आर्थिक व्यवहार करण्यास प्रवृत्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.
माहितीनुसार, अज्ञात व्यक्तींनी जिल्हाधिकाऱ्यांचा फोटो व नाव वापरून फेसबुकवर खोटे प्रोफाइल तयार केले. या खात्यावरून ओळखीच्या व्यक्तींना मेसेज पाठवत “बदली प्रक्रियेत असल्याने घरातील साहित्य विकायचे आहे” असे सांगण्यात आले. त्यानंतर फर्निचर व इतर वस्तू स्वस्त दरात देण्याचे आमिष दाखवत ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी प्रवृत्त करण्यात आले.
विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी संबंधितांनी स्वतःला सीआरपीएफमध्ये कार्यरत असल्याचेही भासवले. काही नागरिकांना संशय आल्याने त्यांनी थेट खातरजमा केली आणि हा प्रकार उघडकीस आला.
सजगतेमुळे फसवणूक टळली
जिल्हाधिकाऱ्यांच्या ओळखीतील व्यक्तींनी असे मेसेज मिळाल्यानंतर तात्काळ संपर्क साधला. प्रशासकीय अधिकारी अशा प्रकारे सोशल मीडियावरून व्यवहार करत नाहीत, हे लक्षात येताच त्यांनी ही बाब पुढे आणली. त्यामुळे संभाव्य फसवणूक टळली.
पूर्वीही घडला होता प्रकार
जिल्हाधिकारी पंडा यांच्या नावाने बनावट खाते तयार होण्याची ही पहिलीच घटना नसून यापूर्वीही अशाच प्रकारे गैरवापर झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकारीदेखील सायबर गुन्हेगारांच्या निशाण्यावर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सायबर पोलिसांचा तपास सुरू
प्रकरणाची माहिती मिळताच जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने पोलीस विभागाला कळवले. गडचिरोली सायबर पोलिसांकडून तांत्रिक तपास सुरू असून संबंधित बनावट खाते कोणत्या ठिकाणाहून चालवले जात आहे, याचा शोध घेतला जात आहे.
नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना सोशल मीडियावर येणाऱ्या संदेशांबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही प्रकारच्या ऑनलाईन व्यवहारापूर्वी खातरजमा करावी. शासकीय अधिकारी वैयक्तिक कारणांसाठी अशा पद्धतीने संपर्क साधत नाहीत, याची जाणीव ठेवावी, असे सांगण्यात आले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने फेक फेसबुक प्रोफाइल
आर्थिक व्यवहारासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न
सजग नागरिकांमुळे प्रकार उघड
सायबर पोलिसांकडून तपास सुरू
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List