नांदेड हादरले : एकाच कुटुंबातील चौघांचा संशयास्पद मृत्यू आई-वडिलांचा गळफास; दोन मुलांनी रेल्वेखाली देत संपवले जीवन
आधुनिक केसरी न्यूज
नांदेड : जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात एकाच कुटुंबातील चौघांचा एकाच दिवशी संशयास्पद मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आई-वडिलांचे मृतदेह घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले, तर दोन तरुण मुलांनी धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही दुर्दैवी घटना मुदखेड तालुक्यातील जवळा मुरहार गावातील लखे कुटुंबात घडली. मृतांमध्ये वडील रमेश सोनाजी लखे (वय ५१), आई राधाबाई रमेश लखे (वय ४५) तसेच त्यांचे दोन पुत्र उमेश लखे आणि बजरंग लखे यांचा समावेश आहे.
प्राथमिक माहितीनुसार, लखे कुटुंबातील दोन्ही मुलांनी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना समजताच गावकऱ्यांनी त्यांच्या घरी धाव घेतली असता, आई-वडील घरातील पलंगावर मृतावस्थेत आढळून आले. त्यांच्या गळ्याभोवती दोरी असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी गळफास घेतल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. एकाच कुटुंबातील चार जणांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात खळबळ उडाली असून, विविध चर्चांना उधाण आले आहे. मुलांनी आत्महत्या केली असली तरी आई-वडिलांनी आत्महत्या केली की त्यांचा घातपात झाला, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. या सर्व प्रकरणाचा सखोल तपास पोलीस करत आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून, चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या कुटुंबावर आलेल्या संकटामागचे नेमके कारण काय, आर्थिक अडचण, कौटुंबिक तणाव की अन्य काही कारण आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.
या हृदयद्रावक घटनेमुळे जवळा मुरहार गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List