ब्रह्मपुरी - नागभीड मार्गावर ‘बर्निंग टँकर’चा थरार
डिझेलने भरलेल्या टँकरला अचानक आग, सुमारे ६० लाखांचे नुकसान
आधुनिक केसरी न्यूज
ब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी - नागभीड राज्य महामार्गावर गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास डिझेल वाहतूक करणाऱ्या टँकरला अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. आगीचे प्रचंड लोळ आकाशात झेपावल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून काही काळ महामार्गावरील वाहतूकही ठप्प झाली होती.प्राप्त माहितीनुसार, ब्रह्मपुरी येथील साई पेट्रोलियम देलनवाडी यांच्या मालकीचा एम.एच. ३४ बी.जी. ७९७९ क्रमांकाचा डिझेल टँकर खडतकर कन्स्ट्रक्शन कंपनी येथे डिझेल पुरवठ्यासाठी जात असताना, कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच अचानक पेट घेतला. टँकरमधून धूर आणि ज्वाळा उसळू लागताच चालकाने प्रसंगावधान राखत तात्काळ टँकर रस्त्याच्या कडेला उभा करून स्वतःचा जीव वाचविला.
डिझेलने भरलेल्या टँकरला आग लागल्याने काही क्षणातच आगीने भीषण रूप धारण केले. आगीच्या उंच ज्वाळा दूरवरूनही दिसत होत्या. घटनेची माहिती मिळताच ब्रह्मपुरी नगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान मुकेश राऊत, आशिष मालोडे व पवन दिवटे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.
या टँकरमध्ये अंदाजे सहा हजार लिटर डिझेल असल्याची प्राथमिक माहिती असून, या घटनेत टँकरचे सुमारे ६० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच ब्रह्मपुरी पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
दरम्यान, महामार्गावर भररस्त्यात पेटलेला टँकर पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती. अनेकांनी हा थरार आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद करत सोशल मीडियावर व्हायरल केला. सुदैवाने या भीषण घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र काही क्षणांसाठी संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण पसरले होते.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List