शेतकऱ्यांचा अपमान सत्ताधाऱ्यांनी केला, मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी विरोधकांची मागणी..!
विधानसभेच्या कामकाजावर पूर्ण दिवसासाठी टाकला बहिष्कार
आधुनिक केसरी न्यूज
मुंबई, दि. १- पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आज विरोधक आक्रमक झाले. कृषिमंत्री शेतकऱ्यांविरोधात विधान करतात, भाजपचे माजी मंत्री आणि आमदार बबनराव लोणीकर यांनी देखील शेतकऱ्यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केले यावर विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला.
शेतकऱ्यांचा वारंवार अपमान सत्ताधारी करत असल्याने मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी अशी मागणी महाविकास आघाडीच्या आमदारांनी केली. शेतकऱ्यांच्या विषयावर काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार, नाना पटोले विधानसभा अध्यक्षांच्या स्थानाजवळ गेले.या गोंधळामुळे विधानसभेचे कामकाज पाच मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर विरोधकांनी माफी मागा म्हणून घोषणाबाजी केली. त्यावेळी विधानसभा अध्यक्ष यांनी नाना पटोले यांच्यावर एक दिवसाच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली. महाविकास आघाडीच्या नेत्यांना सभागृहात बोलूच दिले जात नाही, उलट शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलल्यावर कारवाई करण्यात येते यावर महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला. विरोधकांनी पूर्ण दिवसाच्या कामकाजावर बहिष्कार टाकत सभात्याग केला.
राज्यात आज शक्तिपीठ महामार्ग विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन चालू आहे. बारा जिल्ह्यातील शेतकरी या महामार्गाला विरोध करत आहे, दुसरीकडे राज्याचे कृषिमंत्री शेतकऱ्याविरोधात विधान करतात, सत्ताधारी आमदार बबनराव लोणीकर शेतकरी आमच्या पैशावर जगतात अशी उपकाराची भाषा करतात.लोणीकर यांच्यावर कारवाई होत नाही यावरूनच त्यांचे समर्थनच सरकार करत आहे का? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
शेतकऱ्यांच्या विषयावर विरोधकांना सभागृहात बोलू दिले जात नाही,निलंबन करतात. शेतकऱ्यांच्या विषयावर आंदोलन करू ,तुरुंगात टाकले तरी चालेल पण शेतकऱ्यांसाठी आम्ही लढत राहू अशी आक्रमक भूमिका काँग्रेस विधिमंडळाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी घेतली.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List