‘एका लग्नाची गोष्ट’....अनाथ पूजाला मिळाले हक्काचे घर; जिल्हाधिकाऱ्यांनी केले कन्यादान

‘एका लग्नाची गोष्ट’....अनाथ पूजाला मिळाले हक्काचे घर; जिल्हाधिकाऱ्यांनी केले कन्यादान

आधुनिक केसरी

छत्रपती संभाजीनगर :- लग्नसराई सुरु आहे. अवतीभवती अनेक लग्न होत आहेत. त्यात ही आणखी ‘एका लग्नाची गोष्ट’…पण जराशी वेगळी!
    शासकीय सावित्रीबाई महिला राज्यगृहात राहणाऱ्या अनाथ पुजाचे आज अण्णासाहेब सातपुते या युवकाशी लग्न झाले. शासनाच्या अनाथाश्रमातली ही कन्या आज सातपुतेंच्या घरची सून झाली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी स्वतः या मुलीचे पालक म्हणून कन्यादान केले. एरवी रुक्ष भासणाऱ्या प्रशासनाची ही एक संवेदनशील किनार, कन्या पाठवणी करतांना पापण्यांच्या कडाही ओलावून गेली.
    चि. सौ. कां. पूजा, शासनाच्या सावित्रीबाई महिला राज्यगृहातली कन्या.आणि चि. अण्णासाहेब! सुंदरराव जनार्दन सातपुते यांचा सुपूत्र;यांचा शुभविवाह आज सिडको एन-४ मधील गोपीनाथ मुंडे भवनात मंगलाष्टकांच्या अभिवचनांच्या वर्षावात आशिर्वादरुपी अक्षदांचे शिंपण होऊन पार पडला. 
    जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी या विवाहप्रसंगी कन्यादान केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सौभाग्यवती करुणा स्वामी या सुद्धा या सोहळ्यात सहभागी झाल्या. कन्यादानाच्या सर्व विधीत त्यासहभागी होत्या. जिल्हा महिला बालविकास अधिकारी रेशमा चिमंद्रे आणि राज्यगृहाच्या अधीक्षक अपर्णा सूर्यवंशी. विभागीय उपायुक्त श्रीमती हर्षा देशमुख यांनी विवाहाच्या सर्व तयारीत मोलाची भूमिका बजावली. या विवाह सोहळ्यासाठी राजेंद्र झंवर, कांचन साठे, रश्मी कुमारी, कविता वाघ यांनी सहकार्य केले. 
*काळजीपूर्वक निवड आणि प्रक्रिया*
    या विवाहासाठी अण्णासाहेब सातपुते यांच्या आई वडीलांनी राज्यगृहात संपर्क केला होता. त्यानुसार वरवधु पसंती झाली. ‘वर; अण्णासाहेब जिल्हाधिकारी कार्यालयातील आधार नोंदणी केंद्रात व्यवस्थापक या कंत्राटी पदावर कार्यरत आहेत. तर ‘वधू’ पूजा ही १० वी उत्तीर्ण असून तिने फॅशन डिझायनिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. 
    एकंदर सगळी माहिती, कौटुंबिक पार्श्वभूमी, मानसिकता, जबाबदारीची जाण लक्षात घेऊन त्यांची निवड करण्यात आली. वर वधुंची आपापसात भेट; हितगुज झालं. दोघांची एकमेकांना पसंती आहे. हे लक्षात घेतल्यानंतरच स्थानिक व्यवस्थापन समिती ज्यात अशासकीय सदस्यही असतात हे सगळे जण वराच्या घरी गेले. सर्व परिस्थिती पाहुन मगच या विवाहाला संमती दिली. त्यानंतर विभागीय समितीने सगळी परिस्थिती पाहुन या विवाहास मान्यता दिली. आधी सोमवारी (दि.३) नोंदणी विवाह करण्यात आला. विवाहास पारंपरिक संस्काराचे स्वरुप मिळावे म्हणून छत्रपती संभाजीनगरमधील गोपीनाथ मुंढे मंगल कार्यालयात विधीवत समारंभ पार पडला.
*पुनर्वसनाचे यशस्वी उदाहरण*
पूजा ही एक अनाथ मुलगी. पैठण येथील बालगृहात तिचे बालपण गेले. तेथेच तिचे प्राथमिक शिक्षण झाले. वयाच्या १८ व्या वर्षानंतर ती महिला बालविकास विभागाच्या छत्रपती संभाजीनगर येथील सावित्रीबाई राज्यगृहामध्ये आली. येथे महिलांच्या पुनर्वसनासाठी विविध उपक्रम राबवले जातात. पूजाने येथे फॅशन डिझायनिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केला असून, ती आता आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याच्या मार्गावर आहे. ‘मला आता हक्काचे कुटुंब मिळाले आहे. या क्षणी मी अतिशय आनंदी आहे,’ अशी भावना पूजाने व्यक्त केली.
*समाजासाठी संदेश*
हा विवाह केवळ दोन जीवांचे मिलन नव्हते, तर तो समाजासाठी एक सकारात्मक संदेश होता. अनाथ मुलींना पुनर्वसनाच्या माध्यमातून एक नवीन जीवन मिळू शकते, हे या विवाहाने अधोरेखित केले. प्रशासनाच्या संवेदनशीलतेने आणि सामंजस्यपूर्ण प्रयत्नांनी एक नवा आदर्श निर्माण केला आहे. शासकीय सावित्रीबाई महिला राज्यगृहातील ‘पूजा’ हिचा विवाह आज अण्णासाहेब सातपुते या होतकरु युवकाशी करण्यात आला. हा विवाह दोन जीवांचे मिलन तर होताच त्यासोबतच अनाथाश्रमात लहानाची मोठी झालेल्या पूजा ला हक्काचं घर मिळवून देणाराही ठरला.   
*समाजाची जबाबदारी*
अनाथ मुलींना सक्षम आणि सुरक्षित आयुष्य देण्यासाठी केवळ सरकारी यंत्रणाच नव्हे, तर समाजानेही पुढाकार घ्यायला हवा. पूजाच्या विवाहाने दाखवून दिले की योग्य प्रयत्न आणि संवेदनशील दृष्टीकोन असेल, तर अनाथ मुलींनाही आपले हक्काचे घर आणि कुटुंब मिळू शकते. हा विवाह सोहळा समाजासाठी प्रेरणादायी ठरला आहे. प्रशासनाच्या या अनोख्या उपक्रमामुळे अनेक अनाथ मुलींच्या भविष्यासाठी नवी दिशा मिळू शकते. भविष्यात अशा उपक्रमांना आणखी व्यापक स्वरूप मिळावे, अशीच समाजाची अपेक्षा आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

भिगवण मध्ये चादरीत गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आला गर्भवती महिलेचा मृतदेह ; उडाली एकच खळबळ भिगवण मध्ये चादरीत गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आला गर्भवती महिलेचा मृतदेह ; उडाली एकच खळबळ
आधुनिक केसरी न्यूज निलेश मोरे इंदापूर : तालुक्यातील मदनवाडी गावाच्या हद्दीत पुलाखालील पाण्यात एका महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला...
भिगवण पोलिसांची दिपावलीपूर्वीची धडाकेबाज कारवाई! अट्टल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या, 1 लाख रुपयांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत
धक्कादायक : पोषण आहाराच्या पॅकेटमध्ये सापडला मेलेला उंदीर - देवरी तालुक्यातील अतिदुर्गम धवलखेडी येथील धक्कादायक प्रकार..!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंचाहत्तरीनिमित्त एसटीचा अनोखा उपक्रम!
लहान भावाच्या स्टेम सेल्स दानातून वाचले मोठ्या भावाचे प्राण
आरपीआय आंबेडकर पक्षाचे  जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन 
Breking News : एसटी कर्मचाऱ्यांना ६ हजार रुपये दिवाळी भेट