साहित्य साहित्यिकाला जिवंत ठेवते युवा साहित्यिक अक्षय चंदेल
गोंडवाना विद्यापीठामध्ये राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनाचे उद्घाटन
On
आधुनिक केसरी न्यूज
गडचिरोली, ता. 05 : साहित्यिक आपल्या प्रगल्भ लिखाणामधून कथा, कविता, कादंबरी, ललीत, चरित्र ग्रंथ यासारखी साहित्य निर्मिती करतो. साहित्यिक केवळ साहित्यांची निर्मिती करतो, परंतु तेच साहित्य साहित्यिकाला जिवंत ठेवते अशी भावना युवा साहित्यिक अक्षय चंदेल यांनी व्यक्त केली. गोंडवाना विद्यापीठ आणि विदर्भ साहित्य संघ नागपूर शाखा गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून ते बोलत होते. गोंडवाना विद्यापीठामध्ये प्रसिध्द अभिनेते हर्षल पाटील यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर युवा अभिनेते हर्षल पाटील, स्वागताध्यक्ष गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, अधिष्ठाता डॉ. श्याम खंडारे, विदर्भ साहित्य संघ नागपूरचे अध्यक्ष प्रदीप दाते, अधिसभा सदस्य धर्मेंद्र मुनघाटे, विदर्भ साहित्य संघाचे सरचिटणीस विलास मानेकर, सामाजिक कार्यकर्ते अनिकेत आमटे, आमंत्रक डॉ. तीर्थराज कापगते, युवा साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष किशोर कवठे, डॉ. श्याम मोहरकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. श्री. चंदेल म्हणाले, आपली बोलीभाषा ही अभिव्यक्तीसाठी फार महत्त्वाची आहे. बोलीभाषेमुळेच आपल्या मराठी भाषेचे अभिजातपण टिकून आहे. संतांनी निर्माण केलेले साहित्य आजही समाजासाठी दिशादर्शक आहे. समाजाला समजेल अशा बोलीभाषेमध्ये साहित्य निर्माण होणे आवश्यक आहे.
उद्घाटक हर्षल पाटील म्हणाले, मोबाईल संस्कृतीमुळे आजची युवा पिढी आत्ममग्न झाली आहे. तीस ते साठ सेकंदाच्या रील्ससारख्या जगामध्ये आज आपली तरुणाई हरवली आहे. थिएटर, मैदान, ग्रंथालय यासारख्या सार्वजनिक ठिकाणी आजची युवा पिढी शोधून देखील सापडत नाही अशी परिस्थिती आहे.
स्वागताध्यक्ष डॉ. हिरेखण म्हणाले, युवा साहित्य संमेलनातून सामाजिक परिवर्तन होणे आवश्यक आहे. निर्भिड साहित्यिक समाजाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न करीत असतात. गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षेत्रातील आदिवासी तसेच ग्रामीण भागातील युवकांपर्यंत साहित्य पोहचावे व त्यांच्यामधून एक प्रतिभावंत साहित्यिक निर्माण व्हावा या हेतूने गोंडवाना विद्यापीठ साहित्य संमेनाचे आयोजन करीत आहे. यावेळी प्रदीप दाते, अनिकेत आमटे, डॉ. तीर्थराज कापगते, युवा साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष किशोर कवठे, यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक संमेलनाच्या समन्वयक डॉ. सविता गोविंदवार यांनी केले. परिचय डॉ. शिल्पा आठवले, डॉ. प्रशांत ठाकरे यांनी करुन दिला. सूत्रसंचालन प्रज्ञा जीवनकर यांनी केले तर आभार विदर्भ साहित्य संघ शाखा गडचिरोलीचे शाखाध्यक्ष डॉ. नरेंद्र आरेकर यांनी मानले. यावेळी प्रसिध्द साहित्यिक सदानंद बोरकर यांच्यासह राज्यातील साहित्यप्रेमी, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सुरुवातीस गोंडवाना विद्यापीठाच्या जुन्या इमारतीपासून ते विद्यापीठाच्या नवीन सभागृहापर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात आली. संमेलनामध्ये जिल्हा ग्रंथालय, सर्च, गोंडवाना विद्यापीठातील ज्ञान स्त्रोत केंद्र यांच्यावतीने भव्य ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
Tags:
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Latest News
01 Jul 2025 19:12:17
आधुनिक केसरी न्यूज लक्ष्मीकांत मुंडे किनवट : तीर्थक्षेत्र उनकेश्वरकडून सकाळी किनवटकडे येणाऱ्या किनवट आगाराच्या बसगाडीची क्रं. एम. एच. ४१ -...
Comment List