रामभाऊ म्हळगी प्रबोधिनीचा ४२ वा वर्धापन दिवस आणि आयआयडीएल 8 वा दीक्षांत सोहळा उत्साहात संपन्न
आधुनिक केसरी न्यूज
चंद्रपूर : रामभाऊ म्हळगी प्रबोधिनीचा 'प्रबोधिनी दिन' १९ ऑक्टोबर रोजी संपन्न झाला. त्यानिमित्ताने रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, उत्तन, भाईंदर पश्चिम येथे सकाळी १० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि प्रबोधिनी गीताने झाली. सोहळ्याचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री जनरल व्ही.के. सिंग आणि उत्तर प्रदेश चे विधान परिषद सदस्य डॉ. महेंद्र सिंग यांच्या हस्ते झाले.प्रबोधिनीचे उपाध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे, कार्यकारी संचालक डॉ. जयंत कुलकर्णी, व्यवस्थापन समिती सदस्य रेखाताई महाजन, प्रदीप पांडे, श्रीकांत बडवे आदींची यावेळी उपस्थिती होती.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी लष्करप्रमुख तसेच माजी केंद्रीय राज्यमंत्री जनरल व्ही. के सिंग यांची तर सन्माननीय अतिथी म्हणून रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष डॉ.विनय सहस्रबुद्धे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले.
यावेळी बोलतांना डॉ.विनयजी सहस्रबुद्ध यांनी रामभाऊ म्हाळगी, प्रमोद महाजन आणि पूर्वअध्यक्षांचे स्मरण करत बाळासाहेब आपटे यांच्यामुळे संशोधन हे सूत्र रुजले तर प्रमोदजी महाजन यांनी 'थिंक बिग' हा मंत्र दिला असे आपल्या मनोगतात सांगितले.
जनरल व्ही के सिंग यांनी राजकारणाबद्दल जनतेमध्ये नकारात्मक भावना असून या पार्श्वभूमीवर प्रबोधिनीचे कार्य महत्त्वाचे ठरते. उद्दिष्टे साध्य करण्यासाठी जे प्रेरणा देते आणि विजय व पराभव या दोन्हींची जबाबदारी स्वीकारते, ते खरे नेतृत्व असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.सेनाप्रमुख असतानाच्या काळातील आणि लष्करी प्रशिक्षणातील अनुभव त्यांनी सांगितले. प्रेरणेचा संबंध केवळ विचार व भावनेशी नाही, तर प्रेरणेचा संबंध कृतीशीही आहे, हा विचार त्यांनी मांडला. भारतीय सेना देश सर्वप्रथम आणि एकता या तत्त्वांवर चालते. समाजानेही हा आदर्श ठेवावा ही अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. प्रबोधिनीचा 42 वा स्थापना दिन प्रबोधिनी दिन म्हणून हा उत्सव साजरा करण्यात आला. नेतृत्व साधना प्रशिक्षण शृंखलेच्या गेल्या १५ कार्यक्रमांतील सुमारे 75 प्रतिनिधी याला उपस्थित होते. IIDL च्या ८ बॅचेसमधील सुमारे ७० विद्यार्थी उपस्थित. आय आय डी एल च्या सातव्या तुकडीचा दीक्षांत समारंभ आणि आठव्या तुकडीचा स्वागत समारंभ सुद्धा या मोहोत्सवात पार पडला.
सातव्या तुकडीतील 16 विद्यार्थ्यांना जनरल व्ही के सिंग आणि डॉ. महेंद्र सिंग यांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली. भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांनी आभासी पद्धतीने उपस्थित तरुणांशी संवाद साधला. सोशल मीडियावर व्यक्त होताना विचारधारेशी आणि तत्त्वांशी सातत्याने प्रामाणिक राहणे आवश्यक आहे. राजकीय क्षेत्रामध्ये ढोंगीपणा, दांभिकता, खोटेपणा याला स्थान नसावे. 'जनता सब जानती है'.
राजकारण किंवा राजकीय क्षेत्र याला पैसे कमावण्याचे साधन मानू नये. तरुण कार्यकर्त्यांनी स्वतःच्या आयुष्याचे आर्थिक नियोजन करून, कौटुंबिक जबाबदारींचे संतुलन साधून राजकीय कार्य करावे. 'प्रयत्नांमधील सातत्य' हा सर्वांत महत्त्वाचा मुद्दा कायम लक्षात ठेवावा. एका रात्रीत नेता किंवा लोकप्रतिनिधी बनण्याची स्वप्ने पाहू नका. असे मार्गदर्शन तेजस्वी सुर्या यांनी केले.उपस्थितांनी याला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.नेतृत्व साधना आणि आय आय डी एल यांच्या विविध गटांतील चर्चेनंतर डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी उपस्थित तरुण सहभागींना भविष्यकालीन नियोजनाविषयी मार्गदर्शन केले. अनेक ठिकाणचे प्रबोधिनीचे हितचिंतक आणि प्रबोधिनी संस्था यांच्या समन्वयातून विविध कार्यक्रम योजण्याविषयी विचार मांडले. त्याचबरोबर मानवी हक्क, पर्यावरण, तापमानातील बदल, समाजातील असंघटित घटकांच्या समस्या अशा विषयांवर संशोधनात्मक अभ्यास आणि कार्य करण्याचे आवाहन डॉ. सहस्रबुद्धे यांनी उपस्थित सहभागींना केले. समारोप सत्रात डॉ. महेंद्रसिंग यांनी भारताचा इतिहास, भूगोल, प्राचीन भारतीय ज्ञानपरंपरा आणि राष्ट्रभावना या मुद्द्यांच्या आधारे आपल्या ओघवत्या शैलीत विचार मांडले. त्यांन उपस्थित तरुणांना राष्ट्रविकासाच्या प्रवाहामध्ये संशोधन आणि ज्ञान यांच्या आधारे सहभागी होण्याचे आवाहन केले.
Comment List