शब्द काय सांगतात? भाग (१९): चारू
चारु म्हणजे प्रिय, अनुकूल, सुंदर, देखणा, केशर आणि कुंकू.जेथे जेथे सौंदर्य आहे तेथे तेथे ‘चारु’ शब्दाचा वापर केलेला दिसतो.शीला म्हणजे दगड. पण चारुशीला म्हणजे रत्न. रत्न हा दगडच असतो, पण सुंदर दगड.हरणाचे डोळे सुंदर असतात म्हणून त्याला चारुनेत्र, चारुलोचन असे म्हणतात. मृच्छकटिक नाटकाचा नायक ‘चारुदत्त’ म्हणजे देखणा दत्त. ज्याचे अवयव सुंदर आहे तो ‘चारुगात्र’. याचे… Continue reading शब्द काय सांगतात? भाग (१९): चारू
चारु म्हणजे प्रिय, अनुकूल, सुंदर, देखणा, केशर आणि कुंकू.
जेथे जेथे सौंदर्य आहे तेथे तेथे ‘चारु’ शब्दाचा वापर केलेला दिसतो.
शीला म्हणजे दगड. पण चारुशीला म्हणजे रत्न. रत्न हा दगडच असतो, पण सुंदर दगड.
हरणाचे डोळे सुंदर असतात म्हणून त्याला चारुनेत्र, चारुलोचन असे म्हणतात. मृच्छकटिक नाटकाचा नायक ‘चारुदत्त’ म्हणजे देखणा दत्त. ज्याचे अवयव सुंदर आहे तो ‘चारुगात्र’. याचे स्त्रीलिंगी रूप ‘चारुगात्री’. जिचे केस सुंदर आहे ती चारुकेशी. याच नावाचा संगीतात एक रागही आहे. द्राक्षाच्या वेलीला चारुफला म्हणतात.
अमृतानुभवात ‘जो आत्मबुद्धी शरीरी चारुस्थळी’ अशी ओळ सापडते. ‘जो घनश्याम चारुगात्र’ असे वर्णन श्रीरामविजय ग्रंथात आहे. कृष्णाने नंदाच्या देव्हार्यातला शालिग्राम गिळला तेव्हा ‘नंद म्हणे राजीवनेत्रा, शालिग्राम देई चारुगात्रा।’ असा संवाद हरिविजय ग्रंथात आहे.
‘चारुचंद्र की चंचल किरणे खेल रही थी जल थल में।’ अशी मैथिलीशरण गुप्त यांची एक कविता आहे. ‘चारुचंद्र की चंचल चितवन’ असे एक गाणे ‘मनपसंद’ या चित्रपटात आहे. (अनिल अंबानी यांची पत्नी) टीना मुनीम यांनी ते पडद्यावर सादर केले आहे.
एखादे काम नीट चालत असेल तर ‘सुचारु रूप से कार्य चल रहा है।’ असे हिंदीत म्हणतात.
याशिवाय चारुअंगी, चारुवर्णा, चारुवर्धना, चारुहास, चारुता असे असंख्य शब्द आजही आपण तयार करू शकतो. संस्कृत भाषा शिकताना शब्दांची ही रहस्ये उलगडत जातात. शब्दांकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलते. आपण जाणीवपूर्वक शब्द वापरू लागतो.
म्हणून प्रत्येकाने आयुष्यात संस्कृत भाषा शिकलीच पाहिजे.

About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List