पहिल्याच पावसात आयटीआयची संरक्षण भिंत कोसळली निकृष्ट बांधकामाचा पर्दाफाश; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, सार्वजनिक बांधकाम विभागाविरुद्ध संताप
आधुनिक केसरी न्यूज
लोहा : लोहा-लातूर राष्ट्रीय महामार्गालगत उभारण्यात आलेल्या शासकीय आयटीआय इमारतीच्या बांधकामातील कथित निकृष्ट दर्जाचा प्रकार पहिल्याच रिमझिम पावसात उघडकीस आला आहे. नव्याने उभारण्यात आलेल्या इमारतीची संरक्षण भिंत (कंपाउंड वॉल) कोसळल्याने बांधकामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून कंत्राटदारामार्फत हे बांधकाम करण्यात आले होते. मात्र काम सुरू असतानाच स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी बांधकामाच्या गुणवत्तेबाबत अनेकदा तक्रारी केल्याचे सांगितले जात आहे. तरीदेखील संबंधित विभागाने या तक्रारींची गांभीर्याने दखल घेतली नसल्याचा आरोप होत आहे.
पहिल्याच हलक्या पावसात संरक्षण भिंत कोसळल्याने भविष्यात मुसळधार पाऊस झाल्यास मुख्य इमारतीच्या सुरक्षिततेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. जर इमारतीच्या बांधकामातही अशाच प्रकारची हलगर्जीपणा किंवा निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आले असेल, तर भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, बांधकाम सुरू असताना अनेक वेळा लेखी व तोंडी तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने या तक्रारींकडे दुर्लक्ष करून कोणतीही सखोल चौकशी केली नाही. त्यामुळे आज उघड झालेल्या प्रकाराची जबाबदारी संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांवर निश्चित करावी, अशी मागणी होत आहे.
एका तक्रारदाराने सांगितले की, "कामाच्या गुणवत्तेबाबत वारंवार सूचना देऊनही विभागाने कोणतीही चौकशी केली नाही. आता संरक्षण भिंत कोसळल्यानंतर बांधकामातील त्रुटी स्पष्ट झाल्या आहेत. भविष्यात विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची राहील."
दरम्यान, कोसळलेल्या संरक्षण भिंतीची तातडीने तांत्रिक तपासणी करून संपूर्ण इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे, दोषी कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे. या घटनेमुळे सार्वजनिक निधीतून उभारण्यात येणाऱ्या शासकीय इमारतींच्या गुणवत्तेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबंधित विभागाच्या कार्यपद्धतीबाबतही नाराजी व्यक्त केली जात आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List