साहित्यकृतींतून जगण्यातील अस्वस्थतेची अभिव्यक्ती -‘लेखक संवाद’ कार्यक्रमात कवी-लेखक प्रभू राजगडकर यांचे प्रतिपादन -पदव्युत्तर मराठी विभागात लेखक संवाद कार्यक्रम
आधुनिक केसरी न्यूज
नागपूर : (२७-१-२०२६) साहित्यकृतींतून जगण्यातील अस्वस्थता अभिव्यक्त होत असल्याचे प्रतिपादन कवी-लेखक श्री. प्रभू राजगडकर यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर मराठी विभागात ‘मराठी भाषा पंधरवडा’ अंतर्गत मंगळवार, दि. २७ जानेवारी २०२६ रोजी ‘लेखक संवाद’ कार्यक्रम पार पडला. यावेळी श्री. राजगडकर बोलत होते. माननीय कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मराठी विभाग प्रमुख डॉ. शैलेंद्र लेंडे यांनी भूषविले, प्रमुख अतिथी म्हणून कवी लेखक श्री. प्रभू राजगडकर, कवी सुरेश रामटेके यांची प्रमुख उपस्थिती होती. संवादक म्हणून प्रा. समीर कुमरे आणि प्रा. तुलसीदास भोयर यांनी श्री. राजगडकर यांच्या लेखनावर तसेच काव्यसंग्रहांवर भाष्य केले. आदिवासी समाजातील बालविवाह, महिलांचे होणारे शोषण, शिक्षणापासून दूर राहिलेला आदिवासी, आदी संदर्भातील सामाजिक विषमता दर्शविणारे प्रश्न, तेथील जगण्यातील दाहकता दर्शवित असता आदिवासी समाजातील मोठ्या घटकापर्यंत अद्यापही न पोहोचलेल्या सुविधा अस्वस्थ करीत असतात, असे पुढे बोलताना प्रभू राजगडकर म्हणाले. या अस्वस्थतेची लेखनकृती आणि काव्याच्या माध्यमातून अभिव्यक्त होत असते. ‘गोंगलू’ या कवितेच्या निमित्ताने गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी जीवनाचे प्रातिनिधिक जीवनचित्रण उलगडले. तसेच ‘येथे आमचाही श्वास कोंडतो आहे’ या संग्रहातील शीर्ष कविता सादर करीत अमेरिकेतील जॉर्ज फ्लाइडच्या प्रतिकात्मक संदर्भ रूपाने वर्तमान समाजवास्तवाकडे श्री राजगडकर यांनी लक्ष वेधले.
अध्यक्षीय भाषणात मराठी विभाग प्रमुख डॉ. शैलेंद्र लेंडे यांनी, ‘कोणतीही साहित्यकृती ही जीवनाची अनूभुती देणारी प्रतिकृती असते. त्यामुळे प्रत्यक्ष जीवनातील अनुभवांचे दर्शन साहित्यातून घेता येते, याचा प्रत्यय ‘लेखक-संवाद’ कार्यक्रमाच्या निमित्ताने आला’, असे सांगितले. प्रश्नांच्या माध्यमातून उत्तराच्या दिशेने प्रवास करणे कोणत्याही कलाकृतीचे वैशिष्ट्य असते, याकडेही डॉ. शैलेंद्र लेंडे यांनी लक्ष वेधले. सूत्रसंचालन अंकिता बांडेबुचे यांनी केले तर मानसी नायबनकर यांनी आभार मानले. यावेळी विभागातील प्राध्यापक, विद्यार्थी तसेच संशोधकांची उपस्थिती होती.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List