दाजीपूर अभयारण्य सफारी अखेर सुरू! गोकुळचे संचालक अभिजीत तायशेटे यांच्या मागणीला यश
आजपासून पर्यटकांसाठी जंगल सफारी खुली
आधुनिक केसरी न्यूज
कुडूत्री : महाराष्ट्रात दिवाळीच्या सुट्टीत पर्यटन जोमात सुरू असतांना , कोल्हापूर जिल्ह्यातील रानगव्यांसाठी प्रसिद्ध असलेले दाजीपूर (राधानगरी) अभयारण्य सफारीसाठी बंद असल्यामुळे निर्माण झालेली तीव्र नाराजी अखेर दूर झाली आहे. गोकुळचे संचालक अभिजीत तायशेटे आणि स्थानिक पर्यटन व्यावसायिकांच्या मागणीला यश आले असून, उद्या शुक्रवार, दि.२४ ऑक्टोंबर पासून अभयारण्यातील जंगल सफारी पर्यटकांसाठी पुन्हा सुरू होणार आहे.
दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक कोल्हापूर जिल्ह्यात दाखल झाले होते. मात्र, दाजीपूर अभयारण्य बंद असल्याने स्थानिक पर्यटन व्यावसायिक आणि जीप चालकांचे मोठे आर्थिक नुकसान होत होते. या पार्श्वभूमीवर गोकुळचे संचालक अभिजीत तायशेटे यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. राज्यातील इतर पर्यटनस्थळे पूर्ण क्षमतेने सुरू असतांना , कोल्हापूरच्या पर्यटनाची 'लाईफलाईन' असलेले दाजीपूर अभयारण्य बंद ठेवणे अन्यायकारक असल्याचे तायशेटे यांनी म्हटले होते. त्यांनी वन विभागाने जंगल सफारी तात्काळ सुरू न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता.
अभिजीत तायशेटे यांच्या नेतृत्वाखालील या मागणीची दखल घेण्यात आली असून, उद्यापासून अभयारण्य सफारीसाठी खुले होणार आहे. जंगल सफारी सुरू होणार असल्याने स्थानिक व्यापारी, जीप चालक आणि पर्यटन क्षेत्रातील इतर घटकांनी वन्यजीव विभागाच्या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. यामुळे दिवाळीच्या सुट्टीत पर्यटकांची निराशा टळली असून, स्थानिकांच्या रोजगाराला मोठा हातभार लागणार आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List