पालकमंत्र्यांकडून इरई नदी खोलीकरण कामाची पाहणी : कामाची गती वाढविण्याचे निर्देश
आधुनिक केसरी न्यूज
चंद्रपूर, दि. 11 मे : चंद्रपूर शहराची जीवनवाहिनी असलेल्या इरई नदीच्या खोलीकरणाचे काम सर्वांच्या सहकार्याने हाती घेण्यात आले आहे. या कामाच्या प्रगतीची पाहणी करण्याकरिता राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी प्रत्यक्ष खोलीकरण होत असलेल्या ठिकाणी भेट दिली. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., महानगरपालिका आयुक्त विपिन पालीवाल, उपविभागीय अधिकारी संजय पवार, तहसीलदार विजय पवार तसेच संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.
चंद्रपूर शहराला 9 कि.मी. समांतर वाहणा-या इरई नदीच्या खोलीकरणाच्या कामाचा शुभारंभ 25 एप्रिल 2025 रोजी करण्यात आला, असे सांगून पालकमंत्री डॉ. उईके म्हणाले, जिल्हा प्रशासनाने इरई नदीच्या खोलीकरण कामाचे योग्य नियोजन केले असले तरी कामाची गती वाढविणे आवश्यक आहे. चालू महिन्याअखेर पर्यंत सर्व नियोजित काम पूर्ण करावे. तसेच नदीतील गाळ शेतकऱ्यांना विनामूल्य देण्यात येत आहे. आतापर्यंत 400 ब्रास गाळ मोफत वाटप करण्यात आला असून अर्ज केलेल्या सर्व शेतकऱ्यांना गाळ प्राधान्याने द्यावा, अशा सूचना त्यांनी केल्या.
पहिल्या टप्प्यात राम सेतु ते चौरळा पूल दरम्यान अमुजमेंट पार्क जवळ व महर्षी शाळेमागे सध्या काम सुरू आहे. आतापर्यंत अमुजमेंट पार्क जवळ 350 मीटर व महर्षी शाळेमागे 120 मीटर एकूण असे एकूण 470 मीटर अंतरावरचे खोलीकरण करण्यात आले आहे. सद्यस्थितीत कामावर 8 पोकलेन मशीन, 13 हायवा/ टिप्पर, 20 ट्रॅक्टर, 1 जे.सी.बी कार्यरत असून नदी पात्रातून आतापर्यंत 7500 ब्रास गाळ करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांना 400 ब्रास गाळ
वाटप करण्यात आले आहे.
चंद्रपूर शहर ते इरई – वर्धा नदी संगमापर्यंतच्या 17 कि.मी. लांबीत इरई नदी पात्रातील वाढलेली झाडेझुडपे, गाळ काढून नदी पात्राचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे नदी पात्राची पूर वहन क्षमता वाढण्यास मदत होईल व शहराला दरवर्षी पडणारा पुराचा वेढा कमी होईल. तीन टप्प्यात खोलीकरण करण्यात येणार असून पहिला टप्पा रामसेतू ते चौराळा पुल, दुसरा टप्पा माना टेकडी (लालपेठ कॉलरी) आणि तिसरा टप्पा इरई ते वर्धा नदी संगमापर्यंतचा आहे.
*पत्रकारांना ठेवले दूर*
स्थानिक वन अकादमी येथे पालकमंत्री अशोक उईके यांनी पत्रकारांनाही सोबत घेऊन इरई नदीची पाहणी करता येईल असा विषय समोर ठेवला. जिल्हा माहिती अधिकाऱ्यांना सुद्धा पत्रकारांना बोलवा असे स्पष्टपणे सर्वांच्या समोर सांगितले होते. परंतु पालकमंत्र्यांनी इरई नदीकडे जात असताना मात्र पत्रकारांना दूर ठेवले. शिवाय ज्या ठिकाणी रेतीच अवैधरीत्या उत्खनन केलं आहे त्या भागापर्यंत ही पालकमंत्री पोहोचणार नाही याची काळजी अधिकाऱ्यांनी घेतली. इरई नदीच्या पहाणी दौऱ्यात पालकमंत्र्यांनी पत्रकारांना दूर सारण्याच कारण मात्र गुलदस्तात आहे. पालकमंत्र्यांनी मीट द प्रेस मध्ये सर्वांसमोर जिल्हा माहिती अधिकाऱ्यांना पत्रकारांना सोबत घेण्याचे निर्देश दिले असताना सुद्धा अशा प्रकारे पत्रकारांना दूर ठेवण्याच्या पाठीमागे नेमके कोणाचे हितसंबंध गुंतले आहेत? याची चर्चा आता पत्रकार वर्तुळात होत आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List