राजुरावासी तरुणाच्या हाती सत्ता सोपवण्याची चिन्हे; देवराव भोंगळे यांच्या उमेदवारीचे शहरात जल्लोषात स्वागत
आधुनिक केसरी न्यूज
माहाराष्ट्राच्या विधानसभेच्या रणधुमाळीत अतिशय नाट्यमय घडामोडी घडताना दिसून येत आहेत. राज्यातील राष्ट्रीय स्तरावरील पक्षाच्या फुटी नंतर महाराष्ट्राची ही विधानसभा निवडणूक होऊ घातलेली आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये विविध पक्षांमध्ये अतिशय नाट्यमय घडामोडी घडत आहेत. आणि दर तासाला नवीन नाव उमेदवारीसाठी समोर येत आहे. तर सबंध महाराष्ट्रामध्ये नेत्यांचे पक्षांतराचे वारेही अत्यंत जोरात वाहत आहेत. अशातच राजुरा विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपातर्फे एडवोकेट संजय धोटे यांचे नाव अंतिम असल्याचे सगळ्यांना माहीत झाल्यानंतर घडलेल्या नाट्यमय घडामोडीमुळे देवराव भोंगळे यांना ही उमेदवारी जाहीर झाली आणि राजुरांमध्ये देवराव भोंगळे च्या उमेदवारीचे युवकांनी अत्यंत जल्लोषात स्वागत केले. राजूरा विधानसभा अंतर्गत गडचांदूर, गोडपिपरी, जिवती, कोरपणा, राजुरा अशा पाच तालुक्यांचा समावेश होतो. शिवाय ही विधानसभा कुणबी बहुल मतदार म्हणून ओळखली जाते. त्यामुळे इथे सर्वच पक्षांद्वारे उमेदवारी देत असताना कुणबी फॅक्टर हा अत्यंत महत्त्वाचा ठरत असतो. या विधानसभेमध्ये 2009 मध्ये काँग्रेसच्या सुभाष धोटे यांनी स्वभाप चे एडवोकेट संजय धोटे यांचा तब्बल 16,087 मतांनी पराभव केला होता. तर 2014 मध्ये ऍडव्होकेट संजय धोटे यांनी भाजपा तर्फे निवडणूक लढवीत 66 हजार 223 मते घेतली आणि काँग्रेसचे सुभाष धोटे यांचा 2278 मतांनी पराभव केला होता. 2019 च्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा सुभाष धोटे यांनी काँग्रेस तर्फे आपली उमेदवारी लढत 60228 मते घेतली आणि स्वतंत्र भारत पक्षातर्फे लढणारे एडवोकेट वामनराव चटप यांचा 2501 मतांनी पराभव केला होता. राजूरा विधानसभेमध्ये कधीही एक हाती सत्ता कोणत्याही पक्षाला राखता आली नाही हे चित्र यावरून स्पष्ट होते. शिवाय आमदारही बदलले आहेत.
2024 ची निवडणूक ही मात्र अत्यंत वेगळ्या घडामोडींनी घडते आहे. त्यामुळे यावेळेस मला शेवटची संधी द्या असे म्हणत स्वतंत्र भारत पक्षाचे एडवोकेट वामनराव चटप यांनी राजुरावासीयांना भावनिक साद घातली आहे. परंतु साहेब आता तरी थांबा असे म्हणत राजुरा वासियांनी वामनराव चटप यांच्या उमेदवारीला हवा तेवढा प्रतिसाद दिलेला दिसत नाही. दुसऱ्या बाजूला सुभाष धोटे हे चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष असून मागच्या 2019 च्या निवडणुकीमध्ये त्यांनी अवघ्या 2501 मतांनी विजय मिळविला होता. त्यामुळे यावेळेस पुन्हा सुभाष धोटे ही विधानसभा जिंकणार का? याबाबत साशंकता करता व्यक्त करण्यात येत आहे. सुभाष धोटे आणि वामनराव चटप हे दोन्ही उमेदवार आता साठी ओलांडलेले उमेदवार आहेत. यादरम्यान भारतीय जनता पार्टीने देवराव भोंगळे या तरुण रक्ताच्या उमेदवाराला राजुरा विधानसभेमधून संधी दिलेली आहे. त्यामुळे विधानसभेच्या 2024 च्या निवडणुकीमध्ये राजुरावासीय हे तरुणाच्या हाती नेतृत्व सोपवतील का? याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. देवराव भोंगळे यांनी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पदाचा कार्यभार अत्यंत उत्तम पद्धतीने चालविलेला होता. शिवाय देवराव भोंगळे हे सुधीर मुनगंटीवार यांचे अत्यंत विश्वासू म्हणूनही ओळखले जातात. शिवाय गेल्या काही वर्षांपासून देवराव भोंगळे यांनी हा संपूर्ण परिसर पिंजून काढला असून ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून ते मतदारांपर्यंत पोहोचलेले आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले असून एक नवीन आश्वासक तरुण चेहरा म्हणून देवराव भोंगळे यांना 2024 च्या निवडणुकीमध्ये पाचही तालुक्यातील तरुणाईचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. काँग्रेसचे सुभाष धोटे स्वतंत्र भारत पक्षाचे एडवोकेट वामनराव चटप आणि भाजपाचे देवराव भोंगळे अशा या तिरंगी लढतीमध्ये आता मतदार कोणाच्या पारड्यात आपली मते टाकणार? येथील तरुणाईची साथ कुणाला मिळणार? आणि नेहमीप्रमाणे याही निवडणुकीत राजुरा विधानसभेत परिवर्तन होणार का? याकडे आता राजुरा वासियांचे लक्ष लागले आहे.
Comment List