मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे साधला अम्माशी संवाद ; डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने होणार अम्माचा सत्कार
आधुनिक केसरी न्यूज
प्रा.शाम हेडाऊ
चंद्रपूर : आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्री गंगुबाई उर्फ अम्मा यांच्या वतीने "अम्मा का टिफिन" उपक्रम राबविला जात आहे. सदर उपक्रमाची दखल राज्यपातळीवर घेतली गेली असून, या उपक्रमाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अम्माशी संवाद साधत उपक्रमाला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच अम्माच्या या सेवाभावी उपक्रमाबद्दल डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने नव दुर्गा पुरस्काराने अम्माचा सत्कार केला जाणार असून या सत्कार सोहळ्याचे आमंत्रण मुख्यमंत्री यांनी अम्माला दिले आहे.
आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून चंद्रपूरात सुरू असलेल्या "अम्मा का टिफिन" उपक्रमाची सर्वत्र चर्चा होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री जयंत पाठील, सिनेमा दिग्दर्शक नागराज मंजुळे, युकेचे जनरल सेक्रेटरी जॉन एम निकेल यांच्यासह अनेक सामाजिक संस्थांनी या उपक्रमाला भेट देऊन कौतुक केले आहे.
सदर उपक्रमांतर्गत अत्यंत गरजू व्यक्तींना दररोज जेवणाचा टिफिन घरपोच पोहोचविला जातो. विशेष म्हणजे, आमदार किशोर जोरगेवार यांच्या निवासस्थानी सदर टिफिन तयार केला जातो. त्यानंतर गरजूंच्या घरी पोहोचविला जातो. आज या उपक्रमाला तीन वर्षे पूर्ण झाली असून या सेवेत एकदाही खंड पडलेला नाही, हे या उपक्रमाचे वैशिष्ट्य आहे. या उपक्रमाच्या नियोजनबद्धतेचे अनेकांकडून कौतुक करण्यात आले आहे.
महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेल्या एकनाथ शिंदे यांनी अम्माशी दूरध्वनीवरून संपर्क साधत आशीर्वाद घेतला होता. तसेच यावेळी त्यांनी "अम्मा का टिफिन" उपक्रमाबद्दलही माहिती जाणून घेतली होती. त्यानंतर आज रविवारी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून अम्माशी संवाद साधत मुंबई येण्याचे आमंत्रण दिले आहे. सोबतच डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने अम्माचा सत्कार केला जाणार असल्याचे जाहीर करत अम्माला निमंत्रण दिले आहे. सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक आणि विकासात्मक उपक्रमांद्वारे समाजाच्या गरजू घटकांची सेवा करण्याचे काम डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने केले जात आहे. सोबतच समाजात उत्तम काम करणाऱ्या महिलांचा सत्कारही या फाउंडेशनच्या वतीने केला जातो. यंदा सदर पुरस्कार गंगुबाई उर्फ अम्मा यांना घोषित करण्यात आला असून अम्माला नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. सेवाभावी उपक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रोत्साहन देत असतात. आमच्या उपक्रमाची मुख्यमंत्री यांनी दखल घेतली ही आमच्या "अम्मा का टिफिन" टीमसाठी गौरवाची बाब आहे. यामुळे आमचा उत्साह वाढला असून पुढे हे काम आणखी गतीने करत गरजूंना त्यांच्या हक्काची भाकर देण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळाले असल्याची प्रतिक्रिया अम्मा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बोलल्यानंतर दिली आहे.
Comment List