Breaking News : विदर्भात पावसाचे उन्हाळी अधिवेशन सुरू
आधुनिक केसरी न्यूज
प्रा.शाम हेडाऊ
चंद्रपूर : एकीकडे निवडणुकीच्या पहिल्या टप्पायातील मतदान जवळ येत असल्यामुळे तापमान वाढायला सुरुवात झाली असतानाच दुसरीकडे पावसाने मात्र विदर्भामध्ये आपले उन्हाळी अधिवेशन सुरू केले आहे .
शेतकरी , निवडणूक व मतदार या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी गेल्या आठवड्याभरापासून विदर्भात सुरू झालेल्या या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करत दिल्ली येथे झालेल्या आंदोलनाची गंभीर दखल घेत पावसाने शेतकऱ्यांना जबर तडाखा देणे सुरू केले आहे . तर दुसऱ्या बाजूला निवडणूक विषयाची चर्चा करतांना राजकारण्यांना मात्र ऊरात धडकी भरवलेली आहे . मोठमोठ्या सभांचे आयोजन करत असताना मेघगर्जनेसह गारपीट करत पाऊस मतदारांच्या भेटीला येणार तर नाही ना ? या भीतीने पावसाच्या उन्हाळी अधिवेशननाने राजकारण्यांच्या उरात धडकी भरवली असून त्यामुळे राजकारण्यांना भव्य पेंडॉलवर खर्च करण्यास भाग पाडले आहे . यात उमेदवारांचा खर्च वाढीस लागल्यामुळे 95 लाखांची मर्यादा वाढवून देण्यात यावी अशी मागणी आता उमेदवाराने निवडणूक आयोगाकडे केलेली आहे . तर शेतकऱ्यांनी पावसाने विदर्भात सुरू केलेले उन्हाळी अधिवेशन रद्द करावे अशी मागणी सरकारकडे केलेली आहे .
गेल्या आठवडाभरापासून विदर्भात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस तर काही ठिकाणी प्रचंड गारपिटीने शेतकरी हवालदिल झाला आहे. हाती आलेलं पीक डोळ्यासमोर आडव होताना पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आले आहेत . तर दुसऱ्या बाजूला निवडणुकीच्या रणसंग्रामामध्ये वातावरणात प्रचंड उकाडा निर्माण झाला असून या उकाड्यात आपसामध्ये संघर्ष होऊन वाद पेटू नये म्हणून संपूर्ण विदर्भात पावसाने पहिल्या टप्प्यातील मतदान जवळ येत असताना वातावरणात गारवा निर्माण केला आहे . पावसाने विदर्भामध्ये अनपेक्षितपणे व तातडीने सुरू केलेल्या या अधिवेशनामुळे कोणीच खुश दिसत नाहीये . एकीकडे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तर उमेदवारांच्या डोळ्यात सुद्धा खर्च वाढत चालल्यामुळे डोक्यावर ताण पडत चाललेला आहे . शिवाय प्रचाराला कधी निघायचे आणि मधात पावसाने गाठल्यास काय करायचे ? असा प्रश्नही आता उमेदवारांना पडायला लागला आहे. शिवाय वातावरणात निर्माण झालेला गारवा आणि प्रचाराचा क्षीण घालविण्यासाठी आता उमेदवाराला कार्यकर्त्यांच्या " बसण्याची " व्यवस्था करावी लागत असल्यानेही खर्चात अचानक वाढ झाली आहे .
यासर्व पार्शवभूमीवर मतदार मात्र शांतपणे आपल्या घरी बसला असून तो आपल्या परिवारासह पावसाचा आनंद घेत आहे . कडी , भजे , गरमगरम पिठलं करण्यात गृहिणी व्यस्त असून सध्या त्यांना देशात कोणाचे सरकार यावे यावर परिवारासह विचारमंथन करण्यास बराच वेळ मिळत आहे .
एकूणच पावसाने विदर्भात सुरू केलेले उन्हाळी अधिवेशन हे कही खुशी कही गम असे दिसते आहे .
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List