मीनाकुमारी : एक शोकांतिका

मीनाकुमारी : एक शोकांतिका

आधुनिक केसरी 

बऱ्याचदा खुलताबादला जाण्याचा योग आला आणि जेंव्हा जेंव्हा खुलताबादला आलो तेव्हा तेव्हा मीनाकुमारी आणि पाकिजा चित्रपट समोर उभा ठाकायचा. कारण पाकिजाचे काही चित्रीकरण खुलताबादच्या कब्रस्थानाचे व गावातील काही भागाचे झालेले आहे. कब्रस्थानाच्या ज्या भागाचे चित्रीकरण झालेले आहे, तो अजूनही तसाच आहे, गाव मात्र बदलेलं आहे. कब्रस्थानाला लागून शासकीय विश्रामगृह आहे, निझामकालीन भव्य अशी वास्तू आहे. सांगितलं जातं की इथे मीनाकुमारी अधूनमधून राहायला येत असत. या परिसरात कमालीची शांतता आहे. इथं मन खूप रमतं. लेखनासाठी खूप सुंदर जागा आहे. म्हणूनच बहुतेक मीनाकुमारीला ही जागा आवडत असावी, आयुष्याच्या उत्तराधार्थ त्या एकाकी पडल्या होत्या आणि लेखणीशी त्यांची जवळीक निर्माण झाली होती. मी बरेच दिवस झाले यावर लिहावं म्हणत होतो पण वेळ मिळत नव्हता, पण १ ऑगस्ट मीनाकुमारीच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने दोन शब्द व्यक्त होत आहे.

चंदेरी दुनियेत प्रसिध्दीच्या शिखरावर असताना अवघ्या ३९ वर्षी जगाचा निरोप घ्यावा, ते ही अशा करुण अवस्थेत, हे मनाला चटका लावून जाणारी घटना आहे. रील लाईफमध्ये आयुष्यभर त्यांनी ट्रजेडी क्वीनच्या भूमिका केल्या आणि रिअल लाईफ मध्येही ट्रजेडी क्वीन म्हणूनच जगल्या. म्हणून मीनाकुमारीला 'ट्रजेडी क्वीन' ही म्हंटलं जातं. इथं मला ऱ्होन्डा ब्रिनी यांच्या 'द सिक्रेट' मधली 'लॉ ऑफ अट्रक्शन' चा  सिद्धांत आठवतो.

बालपण

मीनाकुमारी ह्या रवींद्रनाथ टागोर कुटुंबातील होत्या, हे फार कमी लोकांना माहिती असेल. रवींद्रनाथ टागोर यांची भावजय ह्या बालविधवा होत्या. त्यांनी बालविधवा प्रथेस कडवा विरोध करून इसाई धर्म स्वीकारला आणि मेरठ येथे प्यारेलाल यांच्याशी विवाह केला. त्यांना प्रभावती नावाची गुणी मुलगी झाली. तिचा आवाज खूप गोड होता म्हणून तिने मुंबई गाठले तिथे तिची भेट संगीतकार अलिबक्षशी झाली. नंतर विवाहात रूपांतर झाले आणि प्रभावतीची इकबाल बानो झाली. या जोडप्याला तीन मुली झाल्या. पहिली खुर्शीद लग्नानंतर पाकिस्तानात गेली. दुसरी मधू हास्य कलाकार 'महेमुद' ची पत्नी आणि सगळ्यात लहान महजबी म्हणजेच मीनाकुमारी.

'अलिबक्ष'ची परिस्थिती कामं नसल्याने खूपच दयनीय होती.  ज्या दिवशी काम त्याच दिवशी पोटाला मिळायचं. दोन मुली नंतर तिसरी मुलगी असह्य होती म्हणून 'महजबी' ला 'मीनाकुमारी' ला अनाथ आश्रमात टाकावं लागलं पण कुठं तरी ममता जागृत झाली आणि परत तिला घरी आणण्यात आलं. घरची परिस्थिती खूपच वाईट होती. अली बक्ष आणि इकबाल बानो दोघे ही कामाकरिता बाहेर पडायचे. 'महजबी' ची शिक्षणात आवड होती पण घरच्या दरिद्रीमुळे तिन्ही मुलींनाही बाल कलाकार म्हणून कामाला लावले.  त्यामुळे सगळेच कामासाठी बाहेर पडल्याने स्वयंपाक एकदाच बनायचा कारण घरी येण्याची कुठलीच वेळ नियोजित नव्हती. त्यामुळे शिळ्या जेवणाची सवय नंतर आवड 'मीना कुमारी' ला  शेवटपर्यंत राहिली. शिळी भाकर, ठेचा आणि कांदा ती आवडीने खायची. घरच्या हालक्याच्या परिस्थिती मुळे घरात रोजच भांडणे व्हायची. त्यामुळे मीनाकुमारी मध्ये लहानपणापासूनच एकाकीपणा आला होता ती खडे गोळा करायची आणि ती खड्याशी गप्पा मारायची आणि ही सवय तिची शेवटपर्यंत राहिली. शिळी भाकर आणि एकांता मधले खडे. अवघ्या चौथ्या वर्षी 'महजबी' ला पोटासाठी कॅमेऱ्यासमोर उभं राहावं लागलं. तो चित्रपट होता विजय भट्ट दिग्दर्शित ' लेदर फेस' ( १९३९ ) या चित्रपटाच्या वेळी 'महजबी'चं वय फक्त चार वर्षे होतं. या चित्रपटासाठी 'महजबी' ला २५ रुपये भेटले होते आणि घरची चूल पेटली होती. आठव्या आणि नवव्या वर्षी तिला 'एक ही भूल' 'पूजा' चित्रपट भेटला. बाल कलाकार म्हणून भरपूर कामे मिळू लागली.  'महजबी' आवाज ही गोड होता यातून ही  तिला पैसे मिळाय लागले आणि घर चालायला लागले आता 'महजबी' बाल वयातच घर चालविणारी मशीन बनली होती. 'महजबी' मुळे घरात प्रसन्नता अली होती. 'महजबी' पैसा कमविणारी मशीन बनली होती, शिकलेली मशीन जास्त पैसा कामावेल म्हणून अली बक्ष ने 'महजबी' ला हिंदी, इंग्लिश आणि उर्दू ची शिकवणी लावली. टीचर घरी येऊन शिकवायचे. अशा वेळातच 'महजबी' च्या आई चं निधन झालं, हा खूप मोठा धक्का 'महजबी' ला होता. नवव्या वर्षी सर्व प्रथम संगीतकार अनिल बिस्वास यांनी 'महजबी' ला गायनाची संधी दिली 'बहेन' (१९४१ ) चित्रपटात. पुढे 'पिया घर आजा' चित्रपटात सगळेच 'मीनाकुमारी'नी गायली. १४ व्या वर्षी 'बच्चो का खेल' चित्रपटाने 'महजबी' चे नामकरण 'मीनाकुमारी' केलं आणि इथून 'मीनाकुमारी' नावाचा प्रवास सुरु झाला.

प्रेम आणि विवाह

१४ व्या वर्षी 'बच्चो का खेल' चित्रपटाने 'महजबी' चे नामकरण 'मीनाकुमारी' केलं आणि इथून 'मीनाकुमारी' नावाचा प्रवास सुरू झाला. मीनाकुमारीच्या अभिनयाची प्रशंसा व्हायची पण चित्रपट थर्ड ग्रेडचे असायचे. ह्या काळात होमी वाडिया च्या 'लक्ष्मी नारायण' पौराणिक चित्रपटात 'लक्ष्मी' ची भूमिका मिळाली. या चित्रपटामुळे ओळीने 'हनुमान पाताल विजय', 'गणेश महिती' असे पौराणिक चित्रपट मिळाले आणि मीनाकुमारीला लोकप्रियता मिळाली. होमी वाडीया सोबतच्या शेवटच्या चित्रपटात ' अल्लादिन का चिराग' ( १९५२ ) साठी मीनाकुमारीला मिळाले होते, दहा हजार रुपये. त्या पैशातून आलिशान सेकंड हँड कार खरेदी केली आणि ड्रायव्हिंग ही शिकली.

याच काळात देविका राणी सोबत हिट चित्रपट देणारे अशोक कुमार यांनी 'तमाशा' चित्रपटासाठी  मीनाकुमारी ला वेगळ्या प्रकारची भूमिका दिली. हा चित्रपट तर चालला नाही पण या चित्रपटाच्या सेट वर मीनाकुमारीच्या 'सपनाचा राजकुमार' 'कमाल अमरोही' शी भेट झाली. चित्रपट 'पुकार' च्या यशस्वी दिग्दर्शनानंतर आगामी फिल्मसाठी मीनाकुमारीला त्यांनी पसंद केलं होतं पण ते काही जुळून आलं नव्हतं, पण मीना कमाल अमरोहीच्या प्रेमात पडली. त्यावेळी मीनाकुमारी फक्त आठ वर्षाची होती. कमाल अमरोहीचं व्यक्तिमत्त्व रुबाबदार होतं तसेच त्याकाळातले सर्वात महागडे दिग्दर्शक होते. 'महल' चित्रपटासाठी त्यांनी त्याकाळी सर्वात जास्त एक लाख रुपये घेतले होते. सांगितलं जातं, त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर फिदा होऊन 'मधुबाला' ने सुद्धा स्वतः हुन लग्नाचं प्रपोजल दिलं होतं. मीनाकुमारी वयाच्या आठव्या वर्षांपासून त्यांच्या प्रेमात होती. घरात कमाल अमरोहीचे असंख्य फोटो मीनाकुमारी लावलेले होते. 'तमाशा' चित्रपटाच्या सेटवर दहा वर्षांनी मीनाकुमारीची कमाल अमरोही ची भेट झाली होती. दहा वर्षांपूर्वी मीना बाल तर आता ती तरुण होती. कमाल अमरोही मीनाकुमारी पेक्षा १५ वर्षांनी मोठे व विवाहित होते.

'मीनाकुमारी' ला अमरोही सोबत काम करण्याची आणि भेटायची इच्छा खूप असायची. ती मनातल्या मनात  अमरोही वर खूप प्रेम करायच्या. एकेदिवशी अचानक कमाल अमरोहीने सेक्रेटरी बाकर अली जवळ 'अनारकली' चित्रपटाचा प्रसाव पाठविला होता, हा प्रस्ताव ऐकून मीनाकुमारी खूप खुश झाली. 'अनारकली' चे निर्माते मखनलाल मीनाकुमारी ला तीन हजार देऊ इच्छित होते. मागची फिल्म 'अल्लादिन का चिराग' ला मीनाला दहा हजार मिळाले होते. त्यामुळे मिनाचे वडील अली बक्ष या प्रस्तावास तयार नव्हते शेवटी अमरोहीने मध्यस्थी करून पंधरा हजार रुपये ठरविले. यावेळेस अमरोही च्या मनात मिनाबद्दल  प्रेम नव्हतं. मीनाकुमारीचं एकतर्फी प्रेम होतं. 'अनारकली' साठी लोकशन पाहण्यासाठी अमरोही आग्र्याला गेले. इकडे मीनाकुमारी आनंदोत्सव साजरा करण्यासाठी महाबळेश्वरला गेली होती, परतीच्या वेळी तिच्या मोटारीला मोठा अपघात झाला आणि तिला पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. ही बातमी वृत्तपत्रात अमरोही यांनी वाचली त्यावेळी 'अनारकली' च्या लोकेशन साठी आलेल्या दिल्लीच्या हॉटेलमध्ये होते. ते तातडीने पुण्याला मीनाकुमारीला भेटायला पुण्याला आले. यावेळी मीनाकुमारीला खूप आनंद झाला. चार महिने हॉस्पिटलमध्ये होती. रोज दोघांच्या भेटी व्हायला लागल्या आता अमरोही ही मीनाच्या प्रेमात पडले होते. पण इकडे अनारकली चित्रपट डब्ब्यात गेला असला तरी याच काळात मीनाकुमारी ला 'बैजू बावरा (१९५३) व फुटपाथ (१९५३) हे ब्लॉकबस्टर मिळाले आणि मीना लोकप्रियेतेच्या शिखरावर पोहचली. इकडं अमरोही आणि मीना ने लग्न करायचं ठरवलं होतं पण अडचण मीनाचे वडील अली बक्ष होते कारण मीना सोन्याची अंडी देणारी कोंबडी होती. त्यामुळे ते विरोध करणारे होते. तरीही या दोघांनी लपून लग्न केलं आणि काही नाही झाले अशा पद्धतीने घरी आपआपल्या घरी राहिले. मीनाने विचार केला की दोन लाख आले की वडिलांना द्यावं आणि लग्नाबद्दल सांगावं पण त्याआधीच तिच्या वडिलांना कळलं आणि मीनाला अमरोहीला तलाक दे म्हणून तकादा लावला. अमरोही सोबत काम करण्यास मज्जाव केला आणि ज्यादिवशी तू अमरोही सोबत काम करशील त्यादिवशी माझ्या घरचे दरवाजे तुझ्यासाठी बंद होतील, अस अली बक्ष नी सुनावलं पण मिनाकडून हे शक्य नाही झाले आणि ते घर मिनासाठी बंद झाले. अमरोही नी पालिहिल ला घर घेतलं आणि दोघे सुखाने राहू लागले.

चित्रपट प्रवास व एक गुणी अभिनेत्री

बैजू बावरा व  नंतर फुटपाथ नंतर तिने मागे वळून पाहिले नाही. 'बैजू बावरा' (१९५३) ला पहिला फिल्मफेअर पुरस्कार पटकाविला. लागलीच दुसऱ्या वर्षी ही  'परिणिता' साठी मीनाकुमारी ने फिल्मफेअर पुरस्कार पटकाविला. कमाल अमरोही ने दोघांच्या प्रेमकहाणी वर 'दायरा' चित्रपट निर्माण केला तो ही सुपर हिट ठरला. 

आपल्या ३४ वर्षाच्या रजतपटीय आयुष्यात अभिनय सम्राट अशोककुमार पासून ते 'मेरे अपने' विनोद खन्ना पर्यंत कितीतरी अभिनेत्याशी जुगलबंदी तिला खेळावी लागली. पण मीनाकुमारी कुठेच कमी पडली नाही. मीनाकुमारीला आव्हानात्मक भूमिका मिळत गेल्या करण ती पेलविण्याची ताकत तिच्यात होती. म्हणून ती अजोड होती. मीनाकुमारीने अभिनयाचे कधीही अभिनयाची ट्रेनिंग घेतली नाही. ती स्वतः च अभिनयाची विद्यापीठ होती. 'साहेब बिवी और गुलाम' तिच्यातला 'अभिनय साम्राज्ञी' समोर आणते. अभिनयाचे सर्व आव्हाने तिने स्वीकारले. संवाद फेकीत ती अजोड होती. तिचे संवाद लेखकाच्या आत्म्याशी समरस व्हायची. तिचे डोळे कारुण्याचे गुलाम होते. निर्मलतेचे धनी होते. या डोळ्यांनी कधी ग्लिसरीन चा उपयोग ही केला नाही. अशी ही प्रगल्भ अभिनेत्री. भूमिकेच्या अंतरंगात शिरून तिचे सर्व पैलू पडद्यावर सादर करण्याची करण्याची क्षमता तिच्यात होती. क्षमते बरोबरच काही शिकण्याची ही तिची वृत्ती होती. मीनाकुमारीच्या अभिनयाचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे तिचा पेहराव बोलत नसे, भूमिकेत शिरताना तिच्या सर्वांगावर परिणाम दिसत असे.

मीनाकुमारीला तिच्या छोट्याशा कारकिर्दीत चार फिल्मफेअर पुरस्कार मिळाली आहेत. तिचा ' साहिब, बिवी और गुलाम' हा चित्रपट बर्लिन फेस्टिव्हल मध्ये नामांकित झाला होता. मीनाकुमारीने एकूण ९१ चित्रपटात भूमिका केल्या. यापैकी सर्वाधिक म्हणजे १४ चित्रपटात तिच्याबरोबर अशोक कुमार मुख्य भूमिकेत होता. ७ चित्रपटात धर्मेंद्र बरोबर. राज कुमार, राजकपूर, दिलीपकुमार, राजेंद्र कुमार, राजेश खन्ना, विनोद खन्ना अशा दिगग्ज कलाकारांसोबत काम केलेलं आहे नव्हे उलट या दिगग्ज अभिनेत्री सोबत या कलाकारांनी काम केलेलं आहे.

मीनाकुमारी परीस होती, ज्याला ही तिने स्पर्श केलं ते सोनं झालं. धर्मेंद्रला मोठं बनविण्यात तिचा मोठा हात आहे. तिचे को -स्टार तिच्या प्रभावाने मोठी व्हायची. महेमुदला ही तिनेच हात दिला नाहीतर महेमुदचे 'पेइंग गेस्ट' असलेले अमिताभ बच्चन आणि शत्रुघ्न सिन्हा आज या ठिकाणी कदाचित नसते. कारण या दोघांना ब्रेक महेमुदने दिला होता.

वैवाहिक जीवन

तीन -चार वर्षांच्या सुखी संसारानंतर या सुखी संसाराला ग्रहण लागायला चालू झाले. एकिकडे चित्रपट हिट वर हिट होत असताना रिअल लाईफचा चित्रपट फ्लॉप होत होता. तिचे चित्रपट जरी हिट होत असले तरी ती सुखी नव्हती. अमरोही आणि तिचे खटके उडायला लागले होते. या नात्यात दुरावा येण्याचं कारण सांगितलं जातं की,  मीनाकुमारीची आपल्या को - स्टारशी जवळीक. दुसरं कारण अमरोहीचा पझेसिव्हनेसपणा. असं ही सांगितलं जातं की कमाल अमरोही बाबतीत तिचे को - स्टार मिसगाईड करायचे आणि तिच्या एकटेपणाचा फायदा घ्यायचे. यामुळे कमाल अमरोहीने तिच्यावर काही बंधने आणली. तीन अटी तिच्यावर लादल्या गेल्या म्हणजे आता अटीवर त्यांचा संसार चालू होता. त्या तीन अटी अशा होत्या. 

१. मीनाकुमारीने बरोबर संध्याकाळी साडे सहा वाजता घरी यावे आणि दोघे एकमेकांना वेळ द्यावा.

२. आपल्या मेकअप रूम मध्ये आपल्या को - स्टारला किंवा इतर कुणालाही प्रवेश करू देता कामा नये. सांगितले जाते की यासाठी अमरोही ने पाळतीवर आपली माणसं ही ठेवली होती. या काळात मीनाकुमारीची गुलजार शी जवळीक वाढली होती आणि गुलजार आणि मीनाकुमारी मेकअप रूम मध्ये तासनतास बसायचे. म्हणून ही अट.

३. कुठं जायचं असेल तर आपल्याच गाडीतुन जायचं, दुसऱ्याच्या गाडीत बसायचं नाही. सांगितलं जातं की मीनाकुमारीने एकदा आपली गाडी असतानाही प्रदीप कुमारच्या गाडीत प्रवास केला होता.

एकीकडे मीनाकुमारी यशाच्या शिखरावर राज्य करीत होती तर एकीकडे तिची मानसिक घुसमट चालू होती. आणि ह्या अमरोहीच्या अटी तिला पाळणं जड झालं आणि वाद वाढतंच गेला. सांगितलं जात तिचे को - स्टार, मित्र किंवा नातेवाईक ह्या दोघांची समजूत न काढता उलट आगीत तेल ओतण्याचे काम केलं. जेव्हा कायमच घर सोडून मीनाकुमारी आपले जिजा महेमुद कडे आली तेव्हा अमरोही मीनाकुमारीची समजूत काढण्यासाठी घरी होते खरंतर महेमुद नी मीनाकुमारीची समजूत काढून अमरोही सोबत पाठवायला हवे होते पण त्यांनी तसं नाही केला कारण मीनाकुमारी ही परीस होती तिची सर्वानाच गरज होती. पण स्वतः मीनाकुमारीचं वाटोळं होत गेलं. त्यामुळे मीनाकुमारी कमाल अमरोही पासून दूर दूर होत गेली. सांगितलं जातं पाकिजा मध्ये आधी धर्मेंद्र होता पण धर्मेंद्रशी मीनाकुमारीशी जवळीक पाहून अमरोहीने धर्मेंद्रला पाकिजातून काढून टाकले आणि त्याचा परिणाम असा झाला की पाकिजा बंद पडला नंतर सुनील दत्तच्या हस्तक्षेपामुळे पाकिजाचे शूटिंग परत चालू झाले पण मीनाकुमारी व्यवस्थित सहकार्य करीत नव्हती. १९५४ ला सुरू केलेले पाकिजाचे शूटिंग १९७२ ला पूर्ण झाले.  आणि रिलीज झाला. पाकिजा हा चित्रपट कमाल अमरोही आणि मीनाकुमारीचा ड्रीम प्रोजेक्ट होता. हा चित्रपट मीनाकुमारीला पाहण्याची खूप इच्छा होती, चित्रपट रिलीज होऊनही ती पाकिजा चित्रपट पाहू शकली नाही कारण ती हॉस्पिटलमध्ये गंभीर आजारी होती आणि तीन महिन्यांतच ती जगाला निरोप दिला.

अनेक कलाकारांशी संबंध

मीनाकुमारीचे तिच्या अनेक सहकलाकारशी नेहमी नाव जोडलं गेलं. अशोक कुमार, भारतभूषण, दिलीप कुमार, धर्मेंद्र, गुलजार. गुलजार सोबतचा एक किस्सा प्रचंड गाजला होता. कमाल अमरोहीने मीना कुमारी वर बऱ्याच अटी ठेवल्या होत्या. त्यातली एक अट म्हणजे मीनाकुमारीच्या मेकअप रूम मध्ये पुरुष कलाकारास बंदी होती. पण गुलजार आणि मीनाकुमारी तासान तास मेकअप रूम मध्ये बसायचे. बाकर ने कमाल अमरोहीला ही बातमी दिली. तेंव्हा गुलजार ला सेट वरच  मारण्याचा प्लॅन झाला पण गुलजार त्यातून निसटले.

माणूसकीची मीनाकुमारी

एक माणूस म्हणून मीनाकुमारी ग्रेटच होती. अमरोहीशी लग्न होताच तिने अमरोही च्या पत्नीला व त्यांच्या मुलांना आपलंसं केलं. होतं. मीनाकुमारीला लहान मुले खूप आवडायची. चित्रपटात लहान मुलांना मारायचा सीन असला की मारल्यानंतर ती त्यांना मायेने जवळ घ्यायची आणि रडायची तिने कुणाकडून काही घेतले नाहीत, देतच राहिली. अमरोही पासून वेगळं जरी राहत असली तरी अमरोही च्या पाहुण्यांचा मान सन्मान करीत असे.अमरोही पासून वेगळं झाल्यापासून ती दारूच्या आहारी खूप गेली होती. सांगितलं जातं की धर्मेंद्र सोबतचं प्रेमभंग झाल्याने ती खूपच अल्कोहोलिक होती. अमरोही नंतर धर्मेंद्र आपल्याला आधार देईल असं मीनाकुमारीला वाटलं होतं. सांगितलं जातं की आयुष्याच्या शेवटच्या क्षणी ती धर्मेंद्रला पत्र पाठवायची की एकदा मला भेट पण धर्मेंद्र कडून तिला प्रतिसाद मिळाला नाही. मीनाकुमारीची आर्थिक परिस्थिती खूपच हालक्याची झाली होती. दारू साठी सुध्दा पैसा नसायचा. सांगितलं जातं की शेवटच्या क्षणी ती रात्र न दिवस  दारूच्या नशेत राहायची. तिचे नोकर तिला तिच्या दारू मध्ये देशी टाकून द्यायचे तरी तिला भान नसायचं, नोकर तिच्या शरीराशी खेळायचे पण तिला कसलं भान नाही असायचं. तिला जेव्हा कळलं की आपण आता जिवंत राहू शकत नाही तेंव्हा मुमताज कडून तीन लाख उसने घेतल्याची परतफेड म्हणून जुहूचा बंगला मुमताजला मरण्यापूर्वी  देऊन टाकला, कुणाचं कर्ज अंगावर घेऊन नाही गेली. तिच्या अंतविधी साठी पैसे नव्हते तेव्हा एका निर्मात्याकडे तिचा पैसा होता, त्या निर्मात्याने तो पैसा देऊ केला मग तिची अंतविधी झाली. अशाप्रकारे या अभिनय साम्राज्ञीचा ३१ मार्च १९७२ ला अंत झाला.

Minakumari_01suresh shirshikar

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

वरोड्यात रवी कमल जिनिंगला भीषण आग; अंदाजे दहा करोड रुपये नुकसानीचा अंदाज वरोड्यात रवी कमल जिनिंगला भीषण आग; अंदाजे दहा करोड रुपये नुकसानीचा अंदाज
आधुनिक केसरी न्यूज  वरोडा : शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर मार्डा रस्त्यावर असलेल्या रवी कमल कोटेक्स जिनिंग ला आज दुपारी चारच्या...
शिकारच्या शोधात वाघाचा विहीरीत पडून मृत्यू
गुरुनिष्ठेचं सर्जनशील दर्शन घडवणारा ग्रंथ : प्रा. डॉ. कैलास अंभुरे
आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता
मंठा पोलिसांची गावठी हातभट्टीवर मोठी कारवाई : ८० हजारांचा मुद्देमाल जप्त, हजारो लिटर हातभट्टी दारू नष्ट
सप्तसुरांवर अधिराज्य गाजवणाऱ्या आशाताई भोसले यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद : विजय वडेट्टीवार 
चतुरस्त्र सूर हरपला; आ.सुधीर मुनगंटीवार यांची आशाताई भोसले यांच्या निधनाबद्दल हृदयस्पर्शी शोकसंवेदना