कमळाची हॅटट्रिक : गडचिरोली जिल्ह्यात तीनही नगरपालिकांवर भाजपचा निर्विवाद झेंडा
आधुनिक केसरी न्यूज
चंद्रकांत पतरंगे
गडचिरोली : जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात भारतीय जनता पक्षाने इतिहास घडवत जोरदार मुसंडी मारली आहे. गडचिरोली, आरमोरी आणि देसाईगंज या तीनही नगरपालिकांमध्ये नगराध्यक्षपदासह सभागृहावर स्पष्ट बहुमत मिळवत भाजपने जिल्ह्यावर आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या दणदणीत यशामुळे संपूर्ण जिल्हा “भाजपमय” झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
गडचिरोली नगरपरिषदेत स्पष्ट कौल गडचिरोली नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या अॅड. प्रणोती निंबोरकर यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. एकूण २७ जागांपैकी भाजपने १५ जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. काँग्रेसला ६, राष्ट्रवादी काँग्रेसला ५ तर १ जागा अपक्षाकडे गेली असली तरी सत्ता मात्र पूर्णतः भाजपच्या ताब्यात गेली आहे. शहराच्या विकासाला आता वेग मिळेल, अशी आशा नागरिक व्यक्त करत आहेत. आरमोरीत भाजपची एकतर्फी आघाडी आरमोरी नगरपरिषदेत भाजपचे रुपेश पुणेकर यांनी नगराध्यक्षपदावर विजय मिळवला. येथे एकूण २० जागांपैकी तब्बल १५ जागा भाजपने जिंकत निर्विवाद बहुमत सिद्ध केले आहे. काँग्रेसला ४ तर शिवसेना (शिंदे गट) ला १ जागेवर समाधान मानावे लागले. संघटनात्मक ताकद आणि विकासाभिमुख अजेंड्यामुळे भाजपला मोठे यश मिळाल्याचे बोलले जात आहे.
देसाईगंजमध्ये महिला नेतृत्वाला संधी देसाईगंज नगरपालिकेत भाजपच्या लता सुंदरकर यांनी नगराध्यक्षपदी विजय मिळवत महिला नेतृत्वाला नवे बळ दिले आहे. एकूण २१ जागांपैकी भाजपने १२ जागा जिंकून बहुमत मिळवले. काँग्रेसला ७ तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ला २ जागा मिळाल्या आहेत. या विजयामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्हाभर जल्लोष, विकासाचा विश्वास तीनही नगरपालिकांमध्ये नगराध्यक्षपद आणि सभागृहावर बहुमत मिळाल्याने भाजप कार्यकर्त्यांनी जिल्हाभर जल्लोष साजरा केला. विजयी उमेदवारांनी जनतेचे आभार मानत पारदर्शक प्रशासन, सर्वसमावेशक विकास आणि जनहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या निकालामुळे आगामी काळात गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था भाजपच्या नेतृत्वाखाली अधिक सक्षम आणि प्रभावीपणे कार्य करतील, असा विश्वास राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
चंद्रकांत पतरंगे आधुनिक केसरी न्यूज
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List