विशेष लेख : साने गुरुजी शिक्षक म्हणून कसे होते…

विशेष लेख : साने गुरुजी शिक्षक म्हणून कसे होते…

१७ जून : साने गुरुजी शिक्षक होण्याला आज १०० वर्ष होत आहेत.  महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी आजचा महत्वाचा प्रेरक दिवस.        
             
 आधुनिक केसरी 

हेरंब कुलकर्णी

               साने आणि गुरुजी हे दोन्ही शब्द अगदी समानार्थी असावेत अशी महाराष्ट्रात अजूनही स्थिती आहे. याबाबत नानासाहेब गोरे म्हणत "गुरुजी या सामान्य नामाचे आपल्या गुणविशेषांनी त्यांनी विशेषणनाम बनविले "
                    तेव्हा गुरुजींची पहिली ओळख ही शिक्षक म्हणून आहे. गुरुजींच्या प्रेरणेने अनेक प्रतिभावंत महाराष्ट्रात शिक्षक झाले. 
                   पण इतके असूनही साने गुरुजींनी शिक्षक म्हणून काय काम केले ? हे फारसे पोहोचले नाही.गुरुजीच्या व्यक्तिमत्वाला अनेकविध पैलू असल्याने इतर पैलुमुळे त्यांच्या शिक्षक असण्याची फार चर्चा झाली नाही. गुरुजी एक चांगले शिक्षक होते याबाबत आदर आहे पण त्याविषयी फार माहिती नाही असे झाले.  
                    त्यामुळे साने गुरुजी शिक्षक म्हणून कसे होते ?शिक्षक समुदायाला त्यांचे शिक्षक असणे नक्कीच प्रेरणादायक ठरणार आहे.    
              गुरुजींच्या हयातीचा अर्धशतकाचा कालखंड हा टिळक अण्णासाहेब विजापूरकर महर्षि कर्वे ,कर्मवीर भाऊराव पाटील,पंजाबराव देशमुख हे सारे   प्रवृतीने शिक्षक व शैक्षणिक तत्वज्ञ होते.महात्मा फुलेंनी त्यापूर्वी वंचितांच्या शिक्षणाची मांडणी आणि कृती केलेली होती.  
            आई व शिक्षक हे गुरुजींच्या शैक्षणिक व्यूहातील कळीचे घटक होते . 


 *शिक्षक म्हणून गुरुजींनी नेमके कसे काम केले* ? 
 
    खानदेश एज्युकेशन सोसायटीच्या हायस्कूलमध्ये *१७ जून १९२४ ला साने गुरुजी शिक्षक झाले* अनेक नामवंत शिक्षक गुरुजींसोबत त्याकाळात होते.कवी माधव ज्युलियन ही त्यांच्यासोबत दोन वर्षे सोबत शिक्षक होते. साने हे कितपत चांगले शिक्षक होतील याची शंका अशासाठी होती की त्यांचा स्वभाव संकोची होता. पुन्हा ते एम. ए. होते त्यामुळे यांच्याकडे शिक्षण शास्त्राची पदवी नाही. त्यामुळे हे कसे शिकवणार हा प्रश्न होता .गरीब स्वभावामुळे ते मुलांवर छाप टाकू शकतील का ? मुलांनाही दरारा नसलेले व्यक्तिमत्व नसल्यामुळे मुलांना ही ते प्रभावी शिक्षक वाटत नव्हते. सुरवातीला त्यांचा तास सुरू असताना मुले उठून जात येऊन बसत पण गुरुजी त्यांना काहीच बोलत नसत पण अतिशय तळमळीने बोलत. त्याचा परिणाम होत गेला आणि गुरुजी एक प्रभावी शिक्षक झाले..मुलांवर प्रभाव वाढत गेला.

        काळी टोपी,ओठावर ठसठशीत मिशा,गळ्याभोवती गुंडाळलेले उपरणे आणि त्याचे लोंबते सोगे,काळा गळाबंद,लांब कोट,पायघोळ धोतर,पायात पुणेरी जोडा व हातात पुस्तक असा एकूण गुरुजींचा पेहराव असायचा.सुरवातीला ते ५ वीला इंग्रजी व संस्कृत आणि ६ वीला मराठी शिकवत.पुढे मॅट्रिकला इतिहास व मराठी शिकवत. 

शिकवताना गुरुजी खुर्चीवर बसत नसत तर टेबलाला खेटून उभे राहत. त्यांना शिकवताना पुस्तक लागत नसे. ५ वीला Tales of Shakespeare ते शिकवत.  

  
  गुरुजी शाळेत वेळ अजिबात वाया घालवत नसत. तास जेव्हा नसे तेव्हा ते थेट सरळ वाचनालयात जात आणि उभ्या उभ्याच पुस्तके चाळत आणि वाचत.ते दररोज पाच पंचवीस पुस्तके आपल्या नावावर घेत असत आणि वाचून परत करीत “सुटीच्या दिवशी ते अमळनेर हून रेल्वेने भुसावळ किंवा चाळीसगावपर्यन्त जायचे आणि रेल्वेत येता जाता वाचन करायचे. तेथील रेल्वेच्या वेटिंग रूम मध्ये ते वाचत बसत.  

                   इतिहास हा विषय गुरुजी खूप छान शिकवत. अनेक वेगवेगळी माहिती ते देत असत. त्यासाठी ते खूप वाचन करीत. या वेळी मातृभूमीवरील भक्ति उचंबळून येत असे. पाठयपुस्तकाव्यतिरिक्त किती तरी अवांतर माहिती ते विद्यार्थ्यांना देत असत. त्यांच्या इतिहासाच्या तासाला बसता येत नाही म्हणून इतर शिक्षक त्यांचा तास दाराच्या बाहेर लपून ऐकत असत.. 
              
   शाळेतील एका शिक्षकाने पाठ घेवून दाखवायचा उपक्रम होता . इतर शिक्षक एकदा त्यांच्या पाठाला बसले होते.गुरुजींनी मराठी पद्य केकावलीतील काही श्लोक हा विषय घेतला. योग्य उदाहरणे घेवून विषय स्पष्ट करण्याची हातोटी अमोघ वक्तृत्व तळमळ इत्यादि गुणांनी त्यांनी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना भारावून टाकले. कित्येकांच्या डोळ्यांत अश्रु आले.त्यांची वाणी अंत:करणाची पकड घेणारी होती.

गुरुजी जरी शिक्षणशास्त्र शिकलेले नव्हते तरी त्यांनी त्यांच्या स्वत:चेच तंत्र बनविले होते.ते आजच्या भाषेत ज्ञानरचनावादी होते .मुलांना ते खूप प्रश्न विचारून सतत विचार करायला भाग पाडत असत. विषयाविषयी किंवा शिक्षकाविषयी मुलामध्ये उगाचच ते भय निर्माण करीत नसत.पुस्तक परीक्षेच्या पलीकडे जाऊन ते शिकवत असत.  
 
 पण अधिकारी गुरुजींना समजू शकत नव्हते. एकदा मराठीचा तास असताना ते संस्कृत शिकवत होते .वास्तविक दोन्ही विषय तेच शिकवत असल्याने ते कधीही काही घेऊ शकत होते . तेव्हा भेट दिलेल्या अधिकार्‍याने गोखले सराकडे ही त्रुटी म्हणून दाखवली होती. एकदा इतर माहिती देत असताना इन्स्पेक्टर वर्गात आले आणि अभ्यासक्रमाविषयी शिकविण्याविषयी काहीतरी बोलले तेव्हा गुरुजी “इतिहास हा फक्त राजांच्या जन्म मरणाचा आहे का ? आजूबाजूला काही घडत नाही का ? असे म्हणून पुस्तक टाकून गुरुजी निघून गेले होते. 
 

एक दिवस एका गुलाबाला कळी लागली. त्या रात्री छात्रालयातील मुलांना घेऊन बगीच्यात बसून गुरुजींनी त्या गुलाबाच्या फुलाचा जन्मोत्सव साजरा केला. त्या रोपट्याला रंगीबेरंगी कापडाच्या तुकड्यांनी गुरुजींनी सजविले.मुलांनी गाणी म्हटली.बासरी वाजवली. यातून मुलांना निसर्गविषयी वेगळेच प्रेम निर्माण झाले. गुरुजी एकदा शिकवत होते .तेवढ्यात पाऊस सुरू झाला.गुरुजींनी शिकविणे थांबविले आणि म्हणाले “बाहेर पाऊस पडताना मी का शिकवत बसू ? आणि वर्ग सोडून दिला. 
              

 साने गुरुजी प्रेमळ म्हणून प्रसिद्ध असले तरी पदाचा रुबाब कुणी केला की ते तो अन्याय किंवा चुका सहन करीत नसत.पालक आणि शिक्षक नात्याविषयी त्यांची भूमिका स्पष्ट होती. अमळनेर च्या शाळेत मामलेदारांचा मुलगा शिकायला होता.तो अभ्यास करीत नसे .गुरुजींनी त्याच्या वहीवर weak in studies असा शेरा मारला.मामंलेदारांना ते फारच झोंबले.त्यांनी “मुलगा शाळेत येतो तर ,शिक्षक काय करतात ?” असा प्रश्न विचारला. तेव्हा गुरुजींनी उलटे उत्तर दिले “मुलगा फक्त सहा तास शाळेत असतो,बाकी १८ तास घरीच असतो.तेव्हा पालक काय करतात ?”

                या शाळेचे मुख्याध्यापक गोखले गुरुजीना साने गुरुजींचा स्वभाव आणि जीवनप्रेरणा खूप चांगल्या रितीने समजल्या होत्या. 

        शाळेने १९१८ सालापासून मुलांसाठी छात्रालय वसतिगृह सुरू केले होते. हे छात्रालयाचे काम साने गुरुजींनी बघावे असे गोखले गुरुजींनी सुचविले.त्याप्रमाणे गुरुजी ते काम बघू लागले.फक्त हिशोबाचे काम तुम्ही माझ्याकडे देवू नका असे गुरुजी म्हणाले. 

वात्सल्याशिवाय आणि प्रेमाशिवाय सद्गुणसंवर्धन करणे केवळ अशक्य असते यावर दोघांचेही एकमत होते. 

त्यांच्या येण्याने छात्रालयाचे अनाथपण गेले. मुलांचे उदास चेहरे फुलून गेले. मुले सतत त्यांच्या आजूबाजूला असत. शिस्तीतून मुलांना ते बदलावण्यापेक्षा ते प्रेमाने मुलांना बदलावण्याचा प्रयत्न करीत. 
इथून मागचे अधिक्षक हे मुलांना आरडाओरडा करुन, मारून उठवत..पण गुरुजी आल्यावर ते गोड प्रार्थना म्हणून गीते म्हणून मुलांना उठवत. ‘जागिये रघुनाथ कुवर ,पंछी बन बोले’ अशी गाणी म्हणत गुरुजी मुलांना उठवत.मुले म्हणत की साने सर उठवायला आले की झोप कशी पटकन पळून जाते. प्रार्थना मंदिरात प्रार्थना होई. मुले तिथे फुले आणून ठेवीत.उदबत्त्या लावत. सुरेल आवाजात गीत व भजने म्हटली जात. 
 कधी गंमत तर कधी विनोद यातून सवयी  शिस्त लावली जाई. गुरुजींनी कोरडेच रुक्ष उपदेशाचे घुटके उठता बसता त्या बाल जीवांना पाजण्याऐवजी वात्सल्यपूर्ण कृतीचा आश्रय केला. 
             छात्रालयात मुले कपडे धूत नसत .खोल्या स्वच्छ ठेवत नसत. पुस्तके,सामान इकडे तिकडे पडलेले असे. कंदिलाच्या काचा स्वच्छ केलेल्या नसत .कंदिलाच्या वाती कातरलेल्या नसत पण गुरुजी त्यावरून मुलांवर चिडण्यापेक्षा ती कामे गुरुजी स्वत:च करीत. मुले शाळेत गेली की साने गुरुजी गुपचुप मुलांच्या कपड्याच्या घड्या घालत,कंदिलाच्या काचा पुसून ठेवत.मुलांचे कपडे धुवून ठेवत. मुलांना हे समजत नव्हते.एक दिवस एक मुलगा आजारी होता म्हणून तो छात्रालयातच झोपलेला होता.गुरुजी खोलीत येताच त्याने झोपण्याचे नाटक केले. गुरुजी काय काय कामे करतात हे त्याने बघितले.गुरुजींनी सर्व कपड्यांच्या घड्या केल्या.खराब कपडे धुवायला घेतले...
 त्या मुलाने संध्याकाळी सर्व मुले शाळेतून आल्यावर इतर मुलांना सांगितले. मुलांनी ते ऐकल्यावर मुले लज्जित झाली. मुले म्हणायची “आम्हाला लाजविण्यासाठी करता की काय ?” 
  तेव्हा ते म्हणायचे “ अरे आई का मुलाला लाजविण्यासाठी का हे सारे करत असते ? 
मुलांना उपरती झाली.मुले अंतर्मुख झाली. 
मुले कपडे धुवू झाली. कपड्यांच्या घड्या घातल्या. कंदिलाच्या काचा पुसून ठेवू लागले. मुलांना कोणताही उपदेश न करता किंवा मुलांना न रागावता हे गुरुजींनी घडवून दाखविले. कुणाला लागले खुपले ताप आला तर गुरुजी आई होऊन सेवा सुश्रुषा करायचे. शाळेव्यतिरिक्त मुले त्यांच्या पाठीमागेच फिरायची. काही मुले शौचालय दूर होते म्हणून रात्रीच्या वेळी व्हरांड्यातच संडास करीत .मुलांनी घाण केली की गुरुजी लगेच ती स्वस्छ करीत.ते म्हणत “माझ्या हातांना सेवेची भूक आहे. घाण दूर करावी,अश्रु पुसावे ह्याची या माझ्या हातांना असोशी आहे .मी घाण शोधीत जातो. 
           मुलांची गुरुजींना टोकाची काळजी असे.कृष्णा परळीकर हा विद्यार्थी आजारी पडला आणि गावाकडे गेला. गावाकडून तो पत्र पाठवायचा. पुढे पत्र येणे बंद झाले. तेव्हा गुरुजी त्याच्या गावाला गेले. त्याला विषमज्वर झालेला होता. गुरुजी तिथेच राहिले आणि त्याची सेवासुश्रुषा केली. 
                  यशवंत पवार हा विद्यार्थी श्रीमंत कुटुंबातील मुलगा  खोली झाडत नसे.गुरुजी त्याची खोली झाडू लागले ,तो ही खोली झाडू लागला. 
आपले पदार्थ इतरांना द्यावे हा उपदेश गुरुजी स्वत: ही पाळत असत. 

 सकाळ संध्याकाळच्या प्रार्थनेच्या वेळी गुरुजी खूप काही मुलांशी बोलत. जगातल्या विविध महापुरुषांची माहिती सांगत. गुरुजी येणार्‍या वर्तमानपत्रातील मुलांनी नेमके काय वाचावे यावर खुणा करुण ठेवीत. मुलांमध्ये गुरुजी विटी दांडू खेळत असत. गरीब मुलांची फी भरत. 

असे साने गुरुजी आपले सर्वांचे शिक्षक म्हणून मूळ पुरुष आहेत. त्यांच्या प्रेरणेने आपले शिक्षक होणे अधिक अर्थपूर्ण करू या...

 (वरील मजकूर ' शिक्षकांसाठी साने गुरुजी '(मनोविकास प्रकाशन ) या हेरंब कुलकर्णी यांच्या पुस्तकातील आहे. हे पुस्तक विकत हवे असल्यास 8208589195 या whatsapp वर मेसेज करावा )

Tags:
Adhunik Kesari Subscribe

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

धक्कादायक अज्ञात व्यक्तीने गोळीबार करत केली युवकाची हत्या धक्कादायक अज्ञात व्यक्तीने गोळीबार करत केली युवकाची हत्या
आधुनिक केसरी न्यूज  राजुरा : दि,२३/७/२०२४ नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील  राजुरा तालुक्यातील पंचायत समिती जवळ असलेल्या बॅक ऑफ...
22 जुलै रोजी शाळा, महाविद्यालये बंद ; जिल्हाधिका-यांनी निर्गमित केले आदेश
लोंबकळलेल्या विजतारांनी घेतला शेतकऱ्याचा जीव.; दोंदवाडे येथील दुर्घटना
जन्मदात्या वडिलांना नराधम मुलाने जिवंत जाळले ;बाळापूर येथील धक्कादायक घटना...
गुरूविना कोण दाखवील वाट..!
सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचा दर
लाचखोर प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकाने स्वीकारली पाच हजाराची लाच...