मुख्यमंत्र्यांनी केले पूजा देऊरकर यांचे अभिनंदन ; आमदार जोरगेवार यांनी घडवून आणली भेट
आधुनिक केसरी न्यूज
मुंबई : 16/6/2026 जागतिक मंचावर भारताचा तिरंगा अभिमानाने फडकावणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे राहणाऱ्या डॉ. ज्योती उर्फ पूजा देवराव देऊरकर यांची आमदार किशोर जोरगेवार यांनी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी भेट घडवून आणली. यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अभिनंदन केले. पहिल्या वर्ल्ड योगासन चॅम्पियनशिपमध्ये ३५ ते ४५ वयोगटातील ट्विस्टींग बॉडी इव्हेंटमध्ये सुवर्णपदक पटकावत पूजा देऊरकर यांनी भारताचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या ऐतिहासिक यशामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह चंद्रपूर जिल्ह्याचा गौरव वाढला असून, त्यांच्या भावी वाटचालीसाठी मुख्यमंत्री महोदयांनी शुभेच्छा दिल्या. पूजा देऊरकर यांच्या प्रतिभेला आणि कर्तृत्वाला योग्य व्यासपीठ मिळावे तसेच भविष्यातील वाटचालीसाठी आवश्यक ती सर्व मदत करण्यास मी सदैव तत्पर असल्याचेही यावेळी मुख्यमंत्र्यानी नमूद केले. अशा कर्तृत्ववान मुली आपल्या समाजासाठी प्रेरणादायी असून, त्यांच्या यशाचा आम्हा सर्वांना अभिमान आहे. आमदार जोरगेवार यांच्या तत्परतेने घेतलेल्या मुख्यमंत्री महोदयांच्या या भेटीने पूजा देऊरकर यांनी मनस्वी आभार मानले आहेत. पूजा देऊरकर यांनी मिळविलेल्या या दैदीप्यमान यशाबद्दल त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे.
